Breaking
कोल्हापूर : गझलानंदी प्रवास आजही प्रवाहीपणे सुरू - प्रसार कुलकर्णी


इचलकरंजी : शालेय वयातच मला शब्दांचा लळा लागला. तीन तपांपूर्वी म्हणजे १९८५ मध्ये मराठी  गझल विद्यापीठाचे संस्थापक कुलपती कविवर्य सुरेश भट ( दादा ) भेटले. तेंव्हापासून गझलेचा विद्यार्थी म्हणून सुरू झालेला  गझलानंदी प्रवास आजही प्रवाहीपणे सुरू आहे. या प्रवासात सहप्रवासी असलेल्या व  सहकार्य केलेल्या प्रत्येकाबद्दल मी कृतज्ञ आहे. आज मराठी गझलेचा परीघ विस्तारत चालला आहे हे सुचिन्ह आहे. सुरेश भट यांचा वसा आणि वारसा नेमकेपणे समजून घेऊन जर वाटचाल केली तर हा विस्तार संख्यात्मकतेबरोबरच अधिक गुणात्मकही होईल, असे मत ज्येष्ठ गझलकार व समाजवादी प्रबोधिनीचे सरचिटणीस प्रसाद माधव कुलकर्णी यांनी व्यक्त केले.


ते गझलमंथन साहित्य संस्थेच्या ऑनलाईन उपक्रमात 'मी गझलंकित गझलसादी' या विषयावर बोलत होते. गझलमंथन साहित्य संस्थेच्या वतीने ज्येष्ठ गझलकारा डॉ.स्नेहल कुलकर्णी यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.


प्रसाद कुलकर्णी म्हणाले, सुरेश भट भेटले त्याच दरम्यान म्हणजे १९८५ सालीच थोर स्वातंत्र्यसैनिक व विचारवंत आचार्य शांताराम गरुड यांची भेट झाली. मी तेंव्हापासून शास्त्रीय समाजवादाचे खुले ज्ञानपीठ असलेल्या समाजवादी प्रबोधिनीशी मी जोडला गेलो. त्यामुळे मी, कवी गझलकार, कथाकार, ललित लेखक याबरोबरच वृत्तपत्र पत्रलेखक, पत्रकार, वैचारिक लेखक, स्तंभलेखक, संपादक, प्रकाशक, वक्ता अशी गेली छत्तीस वर्षे विविधांगी वाटचाल एकाचवेळी करू शकलो. याचे सर्व श्रेय मला भेटलेल्या व साहाय्य करणाऱ्या प्रत्येकला, सर्व गझल आणि समाजवादी प्रबोधिनी परिवाराला आहे.


प्रसाद कुलकर्णी यांनी यावेळी आपला तीन तपांचा गझललेखनातील प्रवास सुरेश भट यांच्या पत्रांसह भेटीच्या अनेक आठवणींचा जागर केला. या प्रवासात भेटलेल्या अनेक मान्यवर व सहकाऱ्यांचा उल्लेख करत गझलांकित व गझळसाद या गझलसंग्रहाच्या नावाने संस्था निर्माण झाल्याचे सांगितले. गझलेबाबत कार्यशाळा ते सादरीकरण अशा राबविलेल्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला. गझल विस्ताराविषयी अन्य संस्था व व्यक्ती यांच्या सुरू असलेल्या कार्याचा उल्लेख केला. तसेच काही गझला व शेर सादर केले. या ऑनलाईन कार्यक्रमाला रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा