Breaking
खासदार संभाजीराजे यांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट, झाली विविध विषयांवर चर्चापुणे : मराठा आरक्षण प्रश्नी खासदार संभाजीराजे हे सध्या महाराष्ट्र दौरा करत आहेत, तसेच राज्यातील विविध क्षेत्रातील लोकांना भेटत आहे, याच पार्श्वभूमीवर आज (ता. २९) रोजी खा. संभाजीराजे यांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची पुण्यात त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली, त्यावेळी त्यांनी विविध विषयांवर चर्चा केली.


त्यांच्या भेटीनंतर प्रकाश आंबेडकर यांनी काही ट्विट करत आपली भूमिका मांडली आहे, आंबेडकर यांनी म्हटले आहे की, मराठा आरक्षणाबद्दल इथल्या राजकीय पक्षांना कधीच रस नव्हता. भाजप, शिवसेना आरक्षणविरोधीच आहेत. अनेकांना माहीत नसेल पण घटना समितीत आरक्षणाच्या मुद्द्यावर प्रचंड विरोध झाल्याने बाबासाहेबांनी राजीनामा सुद्धा दिला, पण दुसरा "घटनाकार" मिळत नाही म्हणून काँग्रेसला माघार घ्यावी लागली.


जो समाज व्यवस्थेच्या बाहेर आहे किंवा ज्याचे व्यवस्थेत उचित प्रतिनिधित्व नाही अशा समाजाला व्यवस्थेशी जोडण्याचा एक भाग आरक्षण आहे. त्याचप्रमाणे आरक्षण हे प्रशासकीय तत्वसुद्धा आहे, परंतु इथला राज्यकर्ता हे मान्य करायला तयार नाही. यामुळे न्यायालयेसुद्धा आरक्षणाविरोधात निकाल देतात, असे म्हटले आहे. 


तसेच सर्वात पहिली घटनादुरुस्ती आरक्षणाच्या मुद्द्यावर झाली. सर्वोच्च न्यायालयाने दोराईस्वामीच्या निकालात विरोधी भूमिका घेतल्यामुळे ही घटना दुरुस्ती करावी लागली. त्याचवेळी बाबासाहेबांनी म्हटले होते की येणाऱ्या सरकारांना हे त्रासदायक होणार आहे. त्याचीच प्रचिती आज आपल्याला येत आहे. न्यायालयाने दोराईस्वामीचा निकाल आरक्षण विरोधी दिल्याने आज अनेक अडचणी येत आहेत. या निकालाला पुनर्विचार याचिकेद्वारे आव्हान दिले पाहिजे होते. परंतु राजकीय इच्छाशक्ती अभावी तसे झाले नाही. त्यामुळे विविध समूहांच्या आरक्षणाचा प्रश्न सोडविण्याकरिता आता राज्यसत्ता हा एकच मार्ग उरलाय, असेही त्यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हटले आहे.


विविध समूहांचे विविध प्रश्‍न आज राज्यसत्तेशिवाय सोडवले जाऊ शकत नाही. महाराष्ट्राच्या राजकारणात शिळेपणा आलेला आहे. संभाजीराजे यांनी पुढाकार घेतला तर त्यात ताजेपणा येऊ शकतो. हा ताजेपणा आला तर महाराष्ट्राच्या विकासाची गंगा पुन्हा वाहू लागेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.


मराठा समाजाला वेठीस धरून घराण्यांची सत्ता प्रस्थापित करण्याचे राजकारण गेली ४० वर्षे महाराष्ट्रात चालू आहे. हे नेते कधीही स्पष्ट भूमिका घेत नाहीत. नेहमी नरोबा कुंजोबाच्या भूमिकेत असतात. इतर वेळी राजकारणात अशी भूमिका चालत असेल पण काही बाबतीत स्पष्ट भूमिका घेतली पाहिजे, असेही ट्विट प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.


दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या स्थानिक स्वराज्य संस्थेतील अतिरिक्त ओबीसी आरक्षण रद्दच्या निर्णयावर देखील आंबेडकरांनी आपले मत मांडले आहे, त्यांनी म्हटले आहे की, OBC समाजाचे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षण संपवण्याचा निर्णय कायद्याला धरून आहे असे मी मानत नाही. 1930 नंतर ओबीसींची जनगणना झालेली नाही. मंडल आयोगाने जनसंख्येच्या अंदाजानुसार आरक्षण दिले. त्यामुळे आता न्यायालयाने जिल्हानिहाय जनगणना नसल्याने आरक्षण रद्द करणे मी चुकीचे मानतो, असे ट्विट केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा