Breaking
नाशिक : कामगार - शेतकरी एकजूट बळकट करूया, हाच 1 मे चा निर्धार - राजू देसलेनाशिक : आज दि.१ मे सीबीएस नाशिक येथील आयटक कामगार केंद्र येथे कामगार दिन तसेच महाराष्ट्र दिन कोविड नियमांचे पालन करून साजरा करण्यात आला. 


कामगार नेते आयटकचे राज्यसचिव कॉम्रेड राजू देसले यांच्या प्रमुख उपस्थितीतीत कामगार नेते तसेच भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे शहर सचिव कॉम्रेड महादेव खुडे यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले. 


महादेव खुडे म्हणाले, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील शहीदांना अभिवादन करत असताना कामगार शेतकऱ्यांच्या चळवळीतील पक्षाच्या अभूतपूर्व कामगिरीचे मोठे मोल आहे. मुंबई येथील गिरणी कामगारांच्या चळवळीची आठवण करून देत त्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीत बलिदानाची, तसेच चळवळीतील अग्रणी नेते कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे, अण्णाभाऊ साठे, शाहीर गव्हाणकर, शाहीर अमर शेख यांच्या योगदानाबद्दल माहिती दिली. 


सध्या कामगार व शेतकरी कायद्यातील बदल व धोरण विरोधात लढा सुरू आहे. केंद्र सरकारच्या शेतकरी कामगार विरोधी धोरण विरोधात एकत्रित लढा यापुढे लढावं लागेल. आज कंत्राटी कामगार कर्मचारी धोरण व विविध योजना कर्मचाऱ्यांना अल्प मानधन वर राबवून घेत आहेत. असंघटित कामगार ना सामाजिक सुरक्षा  मिळत नाही. या साठी संघटना मजबूत करून लढण्याचा निर्धारही केला.  कॉम्रेड खुडे यांनी भांडवलशाहीची टीका करत आज देशावर तसेच जगावर ओढवलेलं कोरोनच संकट हे नफ्यासाठी निसर्गावर भांडवलाने केलेल्या अतिक्रमणाचा परिपाक असल्याचे प्रतिपादन केले, तसेच कोरोना पश्चात समाजवादी समाजव्यवस्थेशिवाय पर्याय नसेल, असेही त्यांनी सांगितले.


कॉम्रेड राजू देसले म्हणाले, शेतकरी व कामगार लढा एकत्रित लढण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे सध्या कोविड पार्श्वभूमीवर राबणाऱ्या आशा कर्मचारी, आणि मानधन तत्वावर कार्यरत अंगणवाडी सेविका, ग्रामरोजगार सेवक, संगणक परिचालक यांच्यावर केंद्र शासनाच्या धोरणांमार्फत होणारे शोषण याविषयी रोष व्यक्त केला. त्याच बरोबर दिल्ली येथील शेतकरी आंदोलन दडपण्यासाठी केंद्र सरकार कोरोना संसर्गाचा फायदा उचलत असल्याचा आरोपही त्यांनी केला. तसेच कामगार - शेतकरी एकजूट बळकट करूया, हाच 1 मे चा निर्धार आहे, असेही देसले म्हणाले.


दिल्ली येथे सुरू असलेल्या आंदोलनात शाहिद शेतकऱ्यांना व कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांना, तसेच कॉम्रेड श्रीधर देशपांडे, सामाजिक कार्यकर्ते अनिता पगारे व कामगार चळवळीतील शहिदाना आदरांजली  अर्पण करण्यात आली.


याप्रसंगी भाकपचे जिल्हा सहसचिव कॉम्रेड दत्तू तुपे, प्रा.रामदास भोंग, AISF चे राज्याध्यक्ष कॉम्रेड विराज देवांग, AISF नाशिक जिल्हाध्यक्ष कॉम्रेड अविनाश दोंदे हे उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा