Breaking
म्युकर मायकोसिस ला आटोक्यात आणण्यासाठी पंचसुत्री


बार्शीचे सूक्ष्मजीव शास्रज्ञ डॉ. सुहास कुलकर्णी यांनी सुचवली पंचसुत्री


बार्शी (सोलापूर) : म्यूकर मायकोसिस हा रोग प्रामुख्याने कोविड रुग्णांना होत असल्याचे पुढे आले आहे. प्रतिकारशक्ती कमी झालेले व मधुमेहा़ची व्याधी असलेले रुग्ण म्युकर मायकोसिस चे शिकार होत आहेत. शासनाने नुकतेच म्युकर मायकोसिस या रोगाची साथीच्या रोगाच्या यादीत वर्णी लावली आहे. साथीच्या काळात रोगकारक जंतूंची संसर्ग क्षमता वाढलेली असल्याने सहव्याधी असलेल्या रुग्णांना म्युकर मायकोसिस ची शक्यता जास्त असते. अशा परिस्थितीत म्युकर मायकोसिस पासून बचाव करण्यासाठी बार्शी येथील सूक्ष्मजीव शास्रज्ञ डॉ सुहास कुलकर्णी यांनी पंचसुत्री सुचविली आहे  या पंचसुत्रीत, शिरकावला अटकाव,शुगर नियंत्रण, स्टिरॉइड्स चा मर्यादित वापर, लवकर निदान व त्वरित योग्य उपचार यांचा अंतर्भाव करण्यात आला आहे.

अशी आहे पंचसूत्री : 

१. बुरशींच्या शिरकावलाच अटकाव : म्युकर मायकोसिस हा बुरशीजन्य रोग असून या बुरशीचे अतिसुक्ष्म स्पोअर्स नाकातून प्रवेश करतात. नंतर नाकातून सायनस मार्गे डोळ्याच्या रेटिना पर्यंत तसेच मेंदूत शिरण्याची दाट शक्यता असल्याने योग्य मास्क वापरून बुरशीच्या नाकातल्या शिरकावलाच अटकाव केला तर रुग्णाच्या डोळ्याची व मेंदूची हानी टाळता येईल. दर वेळी नवीन किंवा व्यवस्थित धुतलेले दोन  मास्क वापरणे गरजेचे आहे 

२. शुगर नियंत्रण : भारतामध्ये मधुमेही रुग्णाची संख्या जास्त आहे.मधुमेही रुग्णात असलेली किंवा वाढलेली शुगर ही म्युकर मायकोसिस साठी पोषक असल्याने त्याची लागण होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे मधुमेही रुग्णांनी शुगर पातळीवर नजर ठेवून शुगर नेहमी नियंत्रणात ठेवणे अत्यंत महत्वाचे आहे. दवाखान्यात ही डॉक्टरांनी रुग्णाच्या शुगर नियंत्रणाला प्राधान्य देऊन उपचार करावेत.

३. स्टिरॉइड्स चा योग्य वापर : आतापर्यंत समोर आलेल्या माहिती नुसार, भारतात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून कोविड रुग्णासाठी स्टिरॉइड्स चा वापर अति प्रमाणात व गरजेपेक्षा लवकर केल्याने रुग्णाची शुगर वाढल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे स्टिरॉइड्स चा वापर गरजे नुसार योग्य प्रमाणात च करणे आवश्यक आहे.

४. लवकर निदान : म्युकर मायकोसिस चे निदान जेवढे लवकर होईल तेवढे फायद्याचे असल्याने रुग्णांनी स्वतः जागरूक असणे ही काळाची गरज आहे. श्वासाला होणार थोडा त्रास, नाकात जाणवणारी लहान खपली व दुखणे याकडे रुग्णांनी स्वतः लक्ष द्यावे. रुग्ण रुग्णालयात दाखल असताना दर २ ते ३ दिवसांनी तज्ञ डॉक्टरांमार्फत रुग्णाच्या नाकाची तपासणी अनिवार्य करावी जेणे करून रुग्णामध्ये होऊ घातलेल्या म्युकर मायकोसिस च्या लागणीला नाकातच अटकाव करून बुरशीचा पुढील  शिरकाव टाळता येईल.

५. त्वरित व योग्य उपचार : अर्लीयेस्ट दि बेस्ट या उक्ती प्रमाणे त्वरित उपचार सुरु करणे अनिवार्य करावे.या रोगाची थोडी जरी लक्षणे दिसली तरी टेस्ट रिपोर्ट ची वाट न बघता त्वरित व योग्य उपचार चालू केले तर रुग्णाच्या डोळ्याची व मेंदूची हानी टाळता येऊन रुग्ण वाचू शकतो.

वाढत्या म्युकर मायकोसिस ची शक्यता व त्यापासून होणारी हानी लक्षात घेऊन शासनाने या पंचसुत्रीचा स्वीकार करून अधिकृपणे ही पंचसुत्री जाहीर करावी असे, सूक्ष्मजीव शास्त्रज्ञ डॉ सुहास कुलकर्णी यांनी आवर्जून सांगितले.


कोण आहेत संशोधक :

डॉ. सुहास कुलकर्णी हे निवृत्त प्रोफेसर असून सूक्ष्मजीवशास्रज्ञ व दोन विद्यापीठांचे सूक्ष्मजीवशास्त्र विषयाचे मार्गदर्शक आहेत. दोन संशोधकांची एम फील,सात जणांची पीएचडी, १४ पुस्तकातील लिखाण, ५० पेक्षा अधिक रिसर्च पेपर्स व १५   शोध त्यांच्या नावावर जमा आहेत 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा