Breaking
शहीद भगतसिंग राजकीय व सामाजिक क्रांतीचे ज्वालामुखी


प्रसाद कुलकर्णी यांचे प्रतिपादन !


इचलकरंजी ता.३० : शहीद भगतसिंग हे सामाजिक व राजकीय विचारांचे ज्वालामुखी होते. सर्वांगीण शोषणाविरुद्ध लढणारा एक लढवय्या तरुण म्हणून भगतसिंग यांचे स्थान इतिहासात, वर्तमानात आणि भविष्यातही अतिशय महत्त्वाचे आहे. वयाच्या अवघ्या चोविसाव्या वर्षी शहीद झालेले भगतसिंग म्हणजे बुद्धिप्रामाण्यवाद, मार्क्सचा शास्त्रीय समाजवाद यांचा प्रगल्भ मानबिंदू होता. गदरच्या क्रांतिकारी विचारांचा प्रभाव, मार्क्स -लेनिन यांचे विचार यातून भगतसिंगांची वैचारिक समाजवादी भूमिका तयार झाली होती. म्हणूनच ते सार्वकालिक सुसंगत असे विचारवंत ठरले असे मत समाजवादी प्रबोधिनीचे सरचिटणीस प्रसाद माधव कुलकर्णी यांनी व्यक्त केले. 

ते ऑल इंडिया यूथ फेडरेशन व ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन कोल्हापूर यांच्यावतीने आयोजित 'तीन दिवसीय ऑनलाईन बौद्धिक शिबिरात' उद्घाटन करतांना  'शहीद भगतसिंग एक विचार' या विषयावर बोलत होते. या शिबिरात प्रा. युगल रायलू, अनिल चव्हाण, गिरीश फोंडे, प्राचार्य आनंद मेणसे, जावेद तांबोळी या वक्त्यांनी विविध विषयावर मांडणी केली. 

प्रसाद कुलकर्णी पुढे म्हणाले, शहीद भगतसिंग यांना देशभक्त शेतकरी कुटुंबाची पार्श्वभूमी होती.भारतीय स्वातंत्र्य आंदोलनात त्यांच्या कुटुंबीयांचे योगदान महत्त्वाचे होते. हे बाळकडू घेऊनच ते मोठे होत होते. महाविद्यालयीन जीवनातच आजन्म अविवाहित राहून देशसेवेचे व्रत त्यांनी स्वीकारले. वयाच्या सोळाव्या वर्षी ते 'हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन 'या संघटनेत सहभागी झाले होते. पुढे चंद्रशेखर आझाद, सुखदेव, बटुकेश्वर दत्त, भागवतीचरण वर्मा आदी अनेक सहकाऱ्यांच्या  सहकार्याने 'नौजवान भारत सभा' ही संघटना त्यांनी काढली. आणि क्रांतिकार्याला सुरूवात केली. 

माणसा - माणसातील शोषण दूर करणे आणि किसान व कामगारांचे राज्य आणणे हे तिचे उद्दिष्ट होते. या सभेच्या जाहीरनाम्यात राजकीय तत्त्वज्ञान होते. जनतेसाठी जनते कडून क्रांती घडवून आणणे हा उद्देश होता. त्यांची तत्त्वनिष्ठा व साम्राज्यवाद विरोधी भूमिका प्रखर होती. मानवाकडून मानवाचे शोषण होऊ नये आणि खऱ्याखुऱ्या स्वातंत्र्यप्राप्तीसाठी आपण बलिदान देऊ ही त्यांची भूमिका होती. त्यातूनच त्यांनी  दिल्लीच्या केंद्रीय विधानसभेत'  इन्कलाब जिंदाबाद 'अशी घोषणा देऊन' ट्रेड डीसपुट बिल व पब्लिक सेफ्टी बिल' च्या विरोधात कोणालाही इजा होणार नाही असे आवाज करणारे बॉम्ब टाकले. देशासाठी बलिदान दिले.

प्रसाद कुलकर्णी यांनी आपल्या भाषणातून भगतसिंग यांची संपूर्ण विचारधारा आणि तिच्या समकालीन संदर्भ याची सविस्तर मांडणी केली. या शिबिराचे आयोजन धीरज कठारे, जावेद तांबोळी, हरीश कांबळे, आरती रेडेकर, राम करे आदींनी केले आहे. जावेद तांबोळी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्रशांत आंबी यांनी आभार मानले व सुत्रसंचालन केले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा