Breaking
विशेष लेख : रमजान ईद


रमजान म्हटले कि मुस्लिम बांधवांचे चेहरे अगदी उजळून निघतात. चेहऱ्यावर एक वेगळाच तजेलदारपणा येतो. सर्व मुस्लिम समाज या महीन्याची आतुरतेने वाट पाहत असतो. रमजान महिना हा मुस्लिमांचा पवित्र महीना आहे. या महीन्याची चाहूल शाबान महीन्यातच लागते. शाबान महीना म्हणजे रमजान महीन्याच्या आधी येतो. शाबान महीन्याच्या १३, १४, १५ तारखेला रोजे म्हणजे उपवास करतात. १४ तारीखची रात्र जागरण करून नमाज पठण करतात. आपले कोणी देवाघरी गेले आहेत यांच्या साठी दुआ करतात. 


यानंतर १५ दिवसांनी चंद्र दर्शन झाले कि रमजान महिना सुरू होतो. चंद्रदर्शन घेणे हे शुभ मानले जाते. चंद्र दर्शन घेण्यासाठी सर्व जण आतूर असतात. जो तो आपापल्या छतावर जाऊन किंवा बाल्कनीत उभे राहून किंवा बाहेर दारात उभे राहून चंद्र दिसतो का ते पाहतात. संपूर्ण भारतातील कोणत्याही शहरात चंद्र दर्शन झाले कि प्रत्येक मस्जिद मधून "चंद्र दर्शन झाले आहे . आज पासून रमजान महिना सुरू झाला आहे. सर्वांना माहे रमजान मुबारक" असे सांगितले जाते. सर्व जण रमजान महीन्याचे आनंदाने स्वागत करतात. एकमेकांना रमजानच्या शुभेच्छा देतात. 

त्या रात्री पासून ईदचा चंद्र दिसेपर्यंत रात्री एक विशेष नमाज पठण करतात. त्याला तरावीह कि नमाज असे म्हणतात. या महिन्यात मस्जिदांना रंगरंगोटी करण्यात येते. महीला देखील रमजान सुरू होण्याआधीच घराची साफसफाई करून घेतात. रमजान महिन्यात ३० किंवा २९ रोजे होतात. सर्व जण अगदी मनापासून रोजे रहतात. मग तो लहान असो किंवा मोठा, स्त्री असो किंवा पुरुष  वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षापासून रोजे रहातात. रोजे रहाण्यासाठी पहाटे लवकर उठून सर्व जण सहेरी म्हणजेच काही तरी नास्ता करतात. म्हणजे अगदी काहीतरी थोडेसे खातात  सकाळची अजान होण्याआधी. मग रोजा रहाण्याचा संकल्प करतात. त्यासाठी खास दुआ असते त्याला रोजे की नीयत असे म्हणतात. सकाळच्या अजान पासून संध्याकाळच्या अजान होईपर्यंत काहीही खायचे नाही एव्हाना एक थेंब पाणी पण प्यायचे नाही. दिवसभर आपली रोजची कामे आहेतच त्याचबरोबर नमाज पठण करणे, कुराण वाचन करतात. सर्व जण अगदी भक्ती भावाने नमाज कुराण पठण करत असतो. रोजा न रहाण्याची सुट तशी कोणाला नाही पण त्यातल्या त्यात जर स्त्री गरोदर असेल आणि तिला उलट्या होत असतील तर ती रोजे राहीले नाही तरी चालतात. पण तसे शक्यतो कोणी न राहणे हे क्वचितच. यानंतर वयोवृद्ध व्यक्ती जे औषधांवर अवलंबून असतात ते देखील रोजा राहीला नाही तरी चालतो. पण जे लोक आपल्या वैद्यकीय कारणांमुळे रोजा राहू शकत नाहीत त्यांनी आपण आपल्या एका दिवसाचे जेवण दान करावे लागते. मग समजा एक महिना संपूर्ण त्याने रोजे राहीले नाही तर पूर्ण महीन्याचे अन्न दान करावे.

रमजान मध्ये घरी रोज वेगवेगळ्या प्रकारे पक्वान्न केले जाते. समोसे, भजी, पॅटीस, शामी कबाब, चिकन कबाब, पत्थर गोश, नर्गिसे कोफ्ते, खिमा कोफ्ते, कोबी पकौडा, दही वडे, गुलगुले, रूह अब्जा शरबत ते पण सब्जा घालून, लिंबू सरबत, मस्क मेलन ज्युस, लस्सी, बटाटेवडे, मेदू वडे असे वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. याच बरोबर फळे देखील खुप सारे आणले जातात. इफ्तार म्हणजे रोजा सोडणे. इफ्तार साठी घरी बनवलेले पदार्थ, फळे हे सर्व आधी आपल्या शेजारी आणि आपले नातेवाईकांना देतात. दिवसभर कामानिमित्त बाहेर गेलेले रोजा सोडण्याच्या वेळी बरोबर वेळेवर हजर राहतात. सगळे कुटुंब एकत्र येऊन रोजा सोडावा म्हणजे वर्षं भर जो तो आपापल्या कामात व्यस्त असतो आणि ज्याची त्याची जेवणाची वेळ वेगवेगळी म्हणजेच आपापल्या वेळेनुसार येऊन जेवणार म्हणूनचं  रमजान मध्ये सर्व कुटुंब एकत्र येऊन जेवण करावे हा ही एक हेतूच म्हणायचा.

खजूर खाऊन रोजा सोडतात. त्याचे कारणही तसेच आहे. अल्लाह चे प्रेषित मुहम्मद पैगंबरांना खजूर प्रिय होते. ते रोजा सोडण्यासाठी तीन खजूर खायचे. म्हणून खजूर खाण्याची प्रथा आहे. त्यांची शिकवण आहे कि तुमच्या घरी जे काही खाद्यपदार्थ बनवले जातात ते तुम्ही एकट्याने खाऊ नये. तर आधी शेजाऱ्यांना आणि तुमच्या नातलगांना द्या मग तुम्ही खा. हा महीना खुप पवित्र महीना आहे. या महिन्यात सढळ हाताने गोरगरीबांना दान करा अशी शिकवण मुहम्मद पैगंबरांनी दिली आहे. या महिन्यात सदका, जकात, खैरात आणि फितरह अशा प्रकारे दान केले जाते. आता जकात म्हणजे काय ?  तर जकात म्हणजे अल्लाहच्या नावावर देण्यात आलेले एक प्रकारचा टॅक्स म्हणा. तुमच्या धनसंपदेचा २.५ % इतकी रक्कम जकात म्हणून द्यावी लागते. ती धनसंपदा मग तुमचे दाग दागिने, घर किंवा बॅंक बॅलन्स किती आहे यावर अवलंबून असतो. सदका म्हणजे तुम्ही आपल्या वर कोणत्याही प्रकारचे संकट येऊ नये म्हणून आपल्या साठी एक सुरक्षित कवच रहावे यासाठी दिले जाते. यासारखेच खैरात पण. आता फितरह म्हणजे प्रत्येक व्यक्तीसाठी अडीच किलो गहू हे गरीबांना दान करायचे यालाच फितरह म्हणतात. 

आता जकात, सदका, खैरात हे द्यायचे झाले तर कोणाला द्यायचे यासाठीही मुहम्मद पैगंबरांनी एक शिकवण दिली आहे .कि हे द्यायचे झाले तर आधी तुम्ही तुमचे जवळचे असले नातेवाईक शोधायचे कि ज्यांची परीस्थिती चांगली नाही. ज्यांना खरोखरच मदतीची गरज आहे. तर अशा नातेवाईकांना तुम्ही जकात द्या. मग ती कोणत्याही स्वरूपात होऊ शकते. जसे पैसे, कपडे किंवा अन्नधान्य. या प्रमाणेच खैरात आणि सदका चे पण. यानंतर जर तसे तुमचे नातेवाईक नसतील तर तुमचे शेजारी पहा जे गरजू आहेत. तर त्यांना तुम्ही मदत करा. जर तसे कोणी नसतील तर जे बाहेर भीक मागणारे असतात त्यांना द्या. आता हे दान तुम्ही या संपूर्ण महिनाभर कधी ही करू शकता. पण फितरह मात्र ईदच्या दोन दिवस आधीपासून ईदच्या नमाजला जाण्याआधी द्यायचे. याचे कारण ही मुहम्मद पैगंबरांनी सांगितले आहे की तुम्ही जर फितरह आधीच दिला तर घेणारा तेव्हा लगेचच संपवून टाकेल आणि ईद दिवशी तो तसाच बसेल. मग ईद दिवशी त्याच्या घरी काही खायला बनणार नाही. आणि तो उपाशी राहील. म्हणून ईद दिवशी कोणीही उपाशी राहू नये म्हणून फितरह हा ईदच्या आधी दोन दिवस द्यायचे .

संपूर्ण महीना अगदी भक्ती भावाने नमाज कुराण पठण करुन रोजे राहून मुस्लिम बांधव अगदी मनापासून अल्लाह ची उपासना करतात. घरातील महिला पण आपली उपासना करत करत संध्याकाळी रोज वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ बनवितात. अगदी आनंदमय सुखमय वातावरण असते. दिवसभर रोजा वेळेवर नमाज, कुराण पठण करून आपला दिवस सत्कारणी लावतात. यानंतर या महिन्यातील २१,२३,२५,२७ आणि २९ वी रात्र ही जागरण रात्री असतात. या रात्री रात्रभर जागरण करून नमाज पठण करतात. कुराण पठण करतात. घरचे पुरुष मस्जिद मध्ये जागरण करतात. या रात्री तुम्ही किती उपासना कराल तितके पुण्य मिळते. महीनाभर कुराण वाचन करून त्याची सांगता करणे म्हणजे कुराण खत्म करणे असे म्हणतात . ते २७ व्या रात्री करतात. मग तेव्हा पासून खरी तयारी सुरू होते ईद ची. 

ईद साठी लागणारे साहित्य खरेदी करणे. शिरखुर्मासाठी लागणारे सुका मेवा काजू, बदाम, पिस्ता, खजूर, चारोळी, अक्रोड ,वेलची ,साखर आणि खास त्यासाठीच लागणाऱ्या बारीक शेवया. हे सर्व आणून त्यांचे बारीक तुकडे करून तुपामध्ये खमंग भाजून घेऊन ठेवतात. ईदच्या आधी जर कोणाच्या घरी मुलाचे लग्न ठरले असेल आणि ते ईद नंतर होणार असेल तर त्या येणाऱ्या नव्या सुनेला सासु कडून ईदी दिली जाते. ईदी म्हणजे सुनेला कपडे, साजशृंगाराच्या सगळ्या वस्तू, एखाद्या दागिना, मिठाईचा बॉक्स इत्यादी दिले जाते. 

चांद रात म्हणजेच ज्या रात्री चंद्र दर्शन होते ती रात्र. त्या रात्री सर्व जण आतुरतेने चंद्र दिसतो का हे पाहू लागतात. एकदा का चंद्र दिसला कि सर्व जण आकाशाकडे पाहत दुआ करतात. आणि मग एकमेकांना ईद का चांद मुबारक अशी शुभेच्छा देतात. आता खरी तयारी घरातील मुलींची. हातावर बारीक नक्षीकाम करत मेहंदी काढणे. दोन्ही हात भरून मेहंदी. मोगऱ्याचे गजरे आणून ठेवतात. 

दुसऱ्या दिवशी म्हणजेच ईद दिवशी सकाळी लवकर उठून नमाज पठण करतात. त्यानंतर आंघोळ करून घरची पुरुष मंडळी ईदची खास नमाज पठण करण्यासाठी ईदगाह ला जातात. जेव्हा संपूर्ण महीना रोजे करून ईदसाठी आंघोळ करतात तेव्हा ते असे निष्पाप निरागस होतात जसे आताच त्यांनी आईच्या पोटातून जन्म घेतला आहे. महीनाभर रोजे, उपासना करुन चेहऱ्यावर एक वेगळेच तेज आलेले असते. ईद ची खास नमाज पठण करून घरी आले कि सर्व जण एकमेकांना गळाभेट घेऊन ईद मुबारक म्हणतात. लहानांना मोठे लोक आनंदाने ईदी देतात. ईदी म्हणजे पैसे किंवा कपडे किंवा एखाददुसरा दागिना. जो तो आपल्या ऐपतीप्रमाणे ईदी देतो. त्यानंतर सर्व सहपरीवार एकत्र बसून ईदचा खास शिरखुर्मा खातात. या दिवशी वेगवेगळ्या प्रकारची बिर्याणी बनवली जाते. शिरखुर्मा तर आहेच पण त्याचबरोबर गुलाबजाम, गाजर हलवा हे देखील केले जाते. बिर्याणी सोबत दालचा, बैंगन का खट्टा, रायता, काकडीची कोशिंबीर हे देखील बनवले जाते. 

आपल्या शेजाऱ्यांना आवर्जून आमंत्रित केले जाते. आणि त्यांच्या घरी शिरखुर्मा दिला जातो. दिवसभर नातेवाईक आपापल्या नातेवाईकांच्या घरी जाऊन ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी जातात. एकंदरीत एक आनंद देणारी, सर्व धर्म समभाव मानणारी हर्ष उल्हासित करणारी ही रमजान ईद. ईदच्या निमित्ताने शत्रू ही येऊन गळाभेट घेतो. अशी ही पवित्र महीना रमजान रोजे संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी साजरी करण्यात येणारी रमजान ईद. याला ईद-उल- फित्र असे ही म्हणतात. 

परवीन कौसर, बेंगलोर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा