Breakingडहाणूमध्ये निषेध दिवस पाळून दिल्लीतील आंदोलनकर्ते शेतकऱ्यांना पाठींबाआ. विनोद निकोले यांनी केला पंतप्रधान मोदी व भाजप सरकारचा निषेध


डहाणू : संयुक्त किसान मोर्च्याच्या वतीने २६ मे हा ‘निषेध दिवस’ म्हणून पाळण्याच्या हाकेला डहाणू, जि.पालघर मध्ये माकप आमदार कॉम्रेड विनोद निकोले यांच्या नेतृत्वाखाली पंतप्रधान मोदी व भाजप सरकारचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे. २६ मे रोजी शेतकरी आंदोलनाचे ६ महिने आणि मोदी सरकारच्या ७ वर्षे पूर्ण होत आहेत, त्यामुळे निषेध दिनाची देशव्यापी हाक देण्यात आली होती.


यावेळी आमदार निकोले म्हणाले की, कोरोनामुळे जे हजारो लोक मरण पावले त्यास मोदी सरकारची गुन्हेगारी धोरणेच जबाबदार आहेत. काळे कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणी संदर्भात सबंध देशातील ५०० हून अधिक किसान संघटना एकवटून ‘संयुक्त किसान मोर्चा’ द्वारे २६ मे हा ‘निषेध दिवस’ पाळण्याच्या हाकेच्या अनुषंगाने डहाणू रेल्वे स्थानकाजवळ कोरोना नियमावलीचे पालन करून काळे झेंडे दाखवून आम्ही काळे कृषी कायदे रद्द व्हावे म्हणून दिल्ली येथे ठाण मांडून बसलेल्या शेतकऱ्यांना पाठींबा देण्यासाठी या ठिकाणी जमलो आहोत. केंद्र सरकारने शेतकरी जिथे बसले आहेत तिथे खिळे ठोकणे, धुर कांड्या सोडणे, पाण्याचा फवारा मारणे असा अमानुष छळ सुरू केला होता. तर दुसरीकडे मोदी सरकार अंबानी - अदानी सारख्या कॉर्पोरेट्सना आणखी गर्भश्रीमंत करण्यासाठी शेतकरी - शेतमजूर - कामगारांवर हल्ले चढवीत आहे आणि खासगीकरणाद्वारे त्यांनी सारा देश विकायला काढला आहे. त्यात रेल्वेच्या ट्रॅकवर अदानीच्या नावाने रेल्वे चालते ही किती मोठी घातक गोष्ट आपल्या देशासाठी आहे, याचा विचार आपण सर्वांनी करायला हवा. आपण सर्व शेतकऱ्यांची पोरं दिल्लीतील आंदोलनकर्ते शेतकऱ्यांना पाठींबा दिला पाहिजे. शेतकऱ्यांबरोबर केंद्र सरकारने चर्चा करून शेतकऱ्यांना न्याय दिला पाहिजे. शेतकरी चालला तर संपूर्ण देश चालतो हे आपल्या सर्वांना माहीत आहे. दरम्यान लोकांना धान्य मिळावे, वनाधिकार मिळावा, पाणी मिळावे अशा जनहितार्थ मागण्यांसाठी आम्ही लढत आहोत. भारत देश लोकशाहीला मानणारा देश असून दडपशाहीला कदापि बळी पडणार नाही, असे आमदार निकोले यांनी नमूद केले.


आंदोलनाच्या वेळी पोलीस फौज फाटा मोठा होता. पंतप्रधान मोदींच्या निषेध कार्यक्रमाला सागर लॉज ते डहाणू रेल्वे स्थानकापर्यंत रॅली काढून निषेध कार्यक्रम करण्यात आला. या आंदोलनात आमदार कॉम्रेड विनोद निकोले, माकप जिल्हा कमिटी सदस्य कॉ. चंद्रकांत गोरखना, कॉ. धनेश अक्रे, कॉ. राजेश दळवी, डॉ. आदित्य अहिरे, रेईस मिरजा, रूपाली राठोड, भरत कान्हात आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा