Breaking
तळेघर ; वैद्यकीय अधिकाऱ्यांची सातत्याने गैरहजेरी


तळेघर (दि.१२) :
आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे . अशी परिस्थिती असताना या परिसरातील एकमेव असलेल्या तळेघर प्राथमिक आरोग्य केंद्रातील मुख्य वैद्यकीय अधिकारी गैरहजर राहत असल्याने रुग्णांची हेळसांड होत आहे त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.


आदिवासी बांधवांचा आरोग्य विषयी चा प्रश्न कायमचा मिटावा यासाठी तळेकर या मध्यवर्ती ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्यात आले. यामुळे येथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न कायमचा सुटेल अशी आशा निर्माण झाली होती, परंतु या केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अनागोंदी कारभारामुळे या भागांमध्ये आरोग्य सुविधांचा बोजवारा उडाला आहे. संबंधित अधिकारी हे स्वतः वेळेवर दवाखान्यात उपस्थित न राहता मनमानी करत आपल्या सोयीनुसार केव्हाही ये-जा करत आहेत. त्यामुळे रुग्णांना सायंकाळपर्यंत ताटकळत त्यांची वाट बघावी लागत आहे.


सकाळी दहा वाजता चालू होणारी ओपीडी दुपारी एक वाजता चालू होते. वैद्यकीय अधिकारी मुख्यालयी राहत नाहीत. त्यांच्या अशा कारभारामुळे रुग्णांना वेळेत उपचार न मिळाल्याने अनेक निष्पाप आदिवासी माता बांधवांचे जीवही जात आहेत. याबाबत आदिवासी बांधवांनी व अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने अनेक आंदोलने व निवेदनही दिली गेली. मात्र संबंधित अधिकाऱ्यांवर कोणतीही कारवाई होत नसल्याचे आदिवासी बांधव सांगत आहेत.


सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सुविधा अत्यंत जबाबदारीने देण्याऐवजी संबंधित अधिकारी कोरोना योद्धा नावाखाली कामांमध्ये कुचराई करत असल्याचे दिसून येत आहे, तरी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी.अन्यथा ग्रामस्थ आंदोलन करतील. असा इशारा शंकर मोहंडूळे, चंद्रकांत उगले,अशोक पेकारी, विजय आढारी,रामदास लोहकरे, कृष्णा वडेकर ,नंदाताई मोरमारे यांनी दिला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा