Breakingरामदेवबाबा विधान मागे घ्या, केंद्रीय मंत्र्यांने सुनावले; 'आयएमएन'चा आक्रमक पवित्रा


नवी दिल्ली : योगगुरू बाबा रामदेव आणि इंडियन मेडिकल असोसिएशन यांच्यात अ‍ॅलोपॅथी थेरपीच्या संदर्भात दिलेल्या निवेदनावरून आता केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी हस्तक्षेप केला आहे. यासंदर्भात त्यांनी योगगुरू रामदेवबाबा यांना पत्र लिहलं आहे, तसंच त्यांनी रामदेव बाबांना वादग्रस्त विधान मागं घेण्यास सांगितलं आहे. योगगुरु रामदेव यांनी अ‍ॅलोपॅथी आणि डॉक्टरांवर केलेल्या वक्तव्यामुळं वाद वाढत चालला आहे. रामदेव यांच्या वक्तव्याविरोधात आयएमएनं आता आक्रमक पवित्रा घेतला आहे.


रामदेव यांना लिहिलेल्या दोन पानांच्या पत्रात डॉ. हर्षवर्धन यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, अ‍ॅलोपॅथी औषधं आणि डॉक्टरांवर टीका करणं दुर्दैवी आहे. आपल्या वक्तव्यामुळे देशवासीय खूप दु:खी झाले आहेत. करोनाविरोधात दिवसरात्र काम करणारे डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी जणू देवदूत आहेत. अशा वेळेत आपण करोना योद्ध्यांचा अपमान केल्यानं खूप दु:ख झालंय. आपण जे स्पष्टीकरण दिलंय तेवढ्यानं वेदना, दु:ख शमणार नाही. तुम्ही ते वक्तव्य मागे घ्या,असा इशारा केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ.हर्षवर्धन यांनी दिला आहे.

डॉ. हर्षवर्धन यांनी म्हटलं आहे की, तुमच्याकडून कोरोनावरील उपचारातील अ‍ॅलोपॅथी थेरपिस्टना 'तमाशा', 'फालतू' आणि 'दिवाळखोर' म्हणणं दुर्दैवी आहे. आजच्य घडीला कोट्यवधी लोक कोरोना आजारातून बरे होऊन घरी जात आहेत. देशात कोरोनाचा मृत्यू दर फक्त 1.13 टक्के आहे आणि रुग्ण बरे होण्याचा दर 88 टक्क्यांपेक्षा जास्त असेल तर त्यामागे अ‍ॅलोपॅथी आणि सर्व डॉक्टरांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. आरोग्यमंत्र्यांनी लिहिलं आहे की, योगगुरु रामदेव यांचे समाजामध्ये नाव आहे, सामाजिक कामात त्यांचे योगदान असते, अशा व्यक्तीच्या एखाद्या वक्तव्याचा प्रभाव लोकांवर पडत असतो. त्यामुळे त्यांनी अशी वक्तव्ये करताना वेळ, काळ पाहून विचारपूर्वक बोलायला हवं. त्यांच्या वक्तव्यामुळं डॉक्टरांच्या क्षमता आणि कर्तृत्वावर प्रश्नचिन्ह उभं राहू शकतं. कोरोनाविरूद्धचा आपला लढा कमकुवत होऊ शकतो.

काय आहे प्रकरण?

योगगुरु रामदेव यांनी कोरोना मृत्यूमागे अ‍ॅलोपॅथी औषधोपचार कारण असल्याचं सार्वजनिकरित्या सांगितलं आहे. कोरोना रुग्णांवर अ‍ॅलोपॅथी औषधांचा मारा केल्यानेच त्यांचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप त्यांनी केलाय. त्यांच्या या विधानामुळे कोरोनाकाळात रुग्णांची सेवा करण्याऱ्या डॉक्टरांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. आयएमएनं आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर पंतजली योगपीठने योगगुरु रामदेव यांचं तशी भावना नसल्याचं सांगितलं आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा