Breaking
कव्हर स्टोरी : होय मास्तर, तुम्हीच जपताहेत 'मायेचा स्तर' ! शिक्षकांनी उभारला 30 ऑक्सिजन खाटांचा 'कोव्हीड कक्ष'


कोव्हीड रुग्णांचे जीव वाचवायला दिला प्राणवायूचा आधारसुरगाणा (दौलत चौधरी) : तालुक्यातील शिक्षकांना समाजासमोर एक वेगळाच आदर्श ठेवला आहे. साडेसात लाखापेक्षा  जास्त निधी जमवून कोविड निधी करीता मदत केली. या निधीतून सुरगाणा ग्रामीण रुग्णालयात सुसज्ज असा 30 ऑक्सिजन खाटांंचा कक्ष सुरु करण्यात आला आहे.

बालपणाच्या रम्य आठवणीत घेऊन जातात. एरव्ही ग्रामीण भागात गावठी शाळेतील मास्तर हिच काय ती जिल्हा परिषदेच्या शिक्षकाची गावस्तरावर असलेली ओळख पुरेशी ठरते. मायेच्या ममतेने संस्कार करुन शिकवतो तो मास्तर. आईन नंतरचे स्थान हे बालकाच्या जीवनात मास्तरलाच असते. आई सारखाच लेकरांना जपणारा  'मास्तर' खरतर अद्वितीयच. पुर्वी शिक्षकाला मास्तर म्हणून आदरातिथ्यने आणि हक्काने गाव कारभारात हाक दिली जात असे. तो काळ बदलत गेला नंतर सर आले. मास्तरची सर हि काहीशी फिकी झाली. दर्जा मात्र तोच राहीला. 

याचीच प्रचिती सुरगाणा तालुक्यातील अतिदुर्गम भागातील  शिक्षकांनी आणून देत सामाजिक वसा जपत तालुक्यात कोविड रुग्णांसाठी अत्यावश्यक  असलेली ऑक्सिजन खाटांची व्यवस्था करत मदतीचा हात पुढे केला आहे. लेकरांचे भविष्य पेरणा-या शिक्षकांना उभे ठाकलेले संकटही कळले. म्हणूनच एकवटलेल्या शिक्षकांनी प्राणवायू देण्यासाठी कोविड जननिधीस मदत करुन  नवा आदर्श घालून दिला आहे. 

या निधीतून कोविड रुग्णांसाठी स्वतंत्र 30 ऑक्सिजन बेडचा सुसज्ज कक्ष ग्रामीण रुग्णालयात सुरगाणा  येथे उभारण्यात आला आहे. याचा लाभ अतिदुर्गम  आदिवासी भागातील गुजरात सिमेलगतच्या रुग्णांना होत आहे. याची तालुक्यातील जनतेमध्ये चांगलीच चर्चा होत असून गुरुजीनी ठरविले तर काहीच अशक्य नाही. कोरोनाशी दोन हात करण्याची तयारी दर्शविली आहे. कोरोनाला हद्दपार करण्याचा शिक्षकांनी विडा उचलला असून शिक्षक रस्त्यावरील चौकीवर नाकाबंदी करीत चौकीदार, रखवालदाराची भुमिका बरोबरच लसीकरण ऑनलाइन नोंदणी, "माझे कुटूंब, माझी जबाबदारी" ऐवजी तुमचे कुटूंब माझी जबाबदारीचा विडा उचलत घरोघरी जाऊन आजार विषयक ताप, सर्दी, खोकला तसेच विविध आजाराबाबत आस्थेने, आपुलकीने चौकशी करीत आहेत. 

शालेय पोषण आहार वाटप, शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण, रेशन दुकानात धान्य वाटप, कोविड सेंटर मदतनीस लस घेण्या करीता जन जागृती, आॅनलाइन शिक्षण अशा कितीतरी जबाबदा-या शिक्षक आपला जीव मुठीत धरून पार पाडत आहेत. 

सध्याच्या कोरोना महामारीच्या भीषण परिस्थितीत तालुक्यातील कोविड रुग्णांची ऑक्सिजन बेडची गरज ओळखून तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांचे हात मदती करीता पुढे सरसावले. शिक्षकांच्या भरीव आर्थिक योगदानातून व एकजुटीच्या निर्धारातून तातडीने 7 लाख 61 हजार 216 रुपयांचा निधी जमा करण्यात आला आहे. पैकी चार लाख रकमेतून कोविड रुग्णांकरीता पंचवीस जम्बो सिलेंडरपुणे येथून खरेदी करण्यात आले असून या मधून 30 ऑक्सिजन खाटांची सुविधा निर्माण झाल्याने तात्पुरत्या स्वरूपात रुग्णांची सोय झाली आहे. उर्वरित रक्कमेतून आणखी एक सुसज्ज कक्ष तयार करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

या निधी संकलन कामी तहसिलदार किशोर मराठे, गटविकास अधिकारी चंद्रकांत भावसार, सहायक गटविकास अधिकारी रत्नाकर पगार, गट शिक्षणाधिकारी धनंजय कोळी, तालुका वैद्यकीय अधिकारी दिलीप रणवीर, कल्पेश भोये, सुरेश पांडोले, सह शिक्षण विभागाचे विस्तार अधिकारी संजय कुसाळकर, दिलीप नाईकवाडे, नरेंद्र कचवे, सुमन भरसट, डाॅ.नेहा शिरोरे, प्रमिला शेंडगे, बाबुराव महाले, भाऊसाहेब सरक, मंदोदरी पाटील, तालुक्यातील सर्व केंद्र प्रमुख, केंदनिहाय प्रतिनिधी अंलंगुणचे हरिश्चंद्र गावित, आमदाचे राजकुमार चौधरी, मालगव्हाणचे हरिराम गावित, मोहपाडाचे जयराम चव्हाण, अंबाठाचे भास्कर झिरवाळ, अंबोडेचे सुनिल अलबाड, वाघधोंडचे संजय पवार, बा-हेचे देविदासचे देशमुख, बोरगावचे गणेश गायकवाड,  बुबळीचे दिपक पवार, घागबारीचे हरिराम  गायकवाड, धुरापाडाचे सचिन राजपूत, डोल्हारेचे केशव महाले,  माणीचे प्रताप देशमुख, मनखेडचे रविंद्र  गायकवाड, सुरगाणाचे यशवंत देशमुख, पळसनचे संजय गवळी,  उंबरठाणचे राजेंद्र गावित, करंजूलचे तुळशीराम देशमुख, सालभोयेचे दिंगबर चौधरी, हस्तेचे भास्कर  बागुल, खोकरविहिरचे कृष्णा देशमुख, पांगारणेचे मनोज पवार आदींनी निधी संकलना करीता नेटबँकींगच्या ऑनलाइन डिजिटल व्यवहाराच्या माध्यमातून विशेष परिश्रम घेऊन अवघ्या चार  दिवसांंत निधी संकलन केले. 

याकरीता सेवा निवृत्त शिक्षक एन.एस.चौधरी, रतन चौधरी, पांडुरंग पवार, प्रभाकर महाले, तुकाराम भोये, भागवत धुम, मनोहर चौधरी, मोतीराम भोये, सुधाकर भोये, एस.के. चौधरी, तुकाराम अलबाड, नईम मनियार, भागवत चौधरी, विनायक भोये, शिवाजी सोनवणे, हेमराज पवार, नामदेव जोपळे, लक्ष्मण बागुल, सिताराम कडवा, शंकर बागुल, योगेश महाले, बापुराव पवार, नाना ढुमसे, दता भोये, माधव चौधरी, उत्तम वाघमारे, चिंतामण महाले, पांडुरंग वाघमारे, रामदास कोल्हे, विश्वास वाघमारे, शिक्षक पतसंस्थेचे संचालक सोमनाथ पवार, मनोहर भोये, शिक्षिका निर्मला कुमरे, पुष्पा गाढवे, सुलोचना बोरसे, रेशमा गायकवाड, हिराबाई  वाघमारे, सुनंदा गायकवाड, बीआरसी लेखनिक भास्कर पालवी सह इतर रामभाऊ थोरात, भगवान आहेर तसेच तालुक्यातील सर्व शिक्षकांकडून प्रयत्न करण्यात आले आहेत. 

उर्वरित निधीतून रुग्णांसाठी इतर उपयुक्तसाधने, साहित्य खरेदी करण्यात येत आहे. या बिकट परिस्थितीत तालुक्यातील गरजू रुग्णांना याचा लाभ मिळू शकेल या कामी सर्व शिक्षकांची समन्वय समितीचे सर्व सदस्य धोका पत्करून धावपळ करत प्रयत्न करीत आहेत. 

रुग्णांना वेळीच मदत केल्याने केवळ ऑक्सिजन खाटां इतरत्र शोधण्याकरीता होणारी धावपळ थांबली आहे. आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या कृतज्ञ संवेदनशील भावनेने शिक्षकंनी मदतीचा हात पुढे करीत निधी जमा केला आहे. इतर खात्यातील कर्मचारी वर्गाबरोबरच या कामी समाजातील इतर दानशूर व्यक्तीनी पुढे येण्याचे आवाहन शिक्षकांकडून  करण्यात आले असून या आवाहनाला प्रतिसाद देत दहा लाखांहून अधिक निधी संकलनाकडे वाटचाल  सुरु झाली आहे. त्यामुळे "देणा-याचे हात हजारो दुबळी माझी झोळी." या पंक्ती सार्थ ठरत आहेत. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा