Breaking
कोरोना काळातील शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची संपूर्ण फी माफ करण्याची एआयएसएफची (AISF) मागणीउस्मानाबाद : कोरोना काळातील शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची संपूर्ण फी माफी करा, महाराष्ट्र विनाअनुदानित खासगी व्यावसायिक शैक्षणिक संस्था (प्रवेश व शुल्क यांचे नियमन) कायदा २०१५ तील विद्यार्थी विरोधी तरतुदी दुरुस्त करा, अशा मागण्यांसाठी ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन (aisf) उस्मानाबाद जिल्हा कौन्सिल यांनी राज्यव्यापी आंदोलनात भाग घेत जिल्हाधिकाऱ्यांद्वारे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांना निवेदन देण्यात आले आहे.


मागण्या : 

१) राज्यातील शाळा, व्यावसायिक तसेच गैर व्यावसायिक अभ्यासक्रम चालविणाऱ्या सर्व महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांची ७०% फी माफ करण्याचे आदेश राज्य सरकारने काढावेत, उर्वरित ३०% फी ही शासनाने महाविद्यालयांना ग्रांट म्हणून द्यावी तसेच राज्यातील २४ मार्च २०२० पासून विद्यार्थ्यांकडून वसूल करण्यात आलेली संपूर्ण फी विद्यार्थ्यांना तात्काळ परत करावी.


२) ऑनलाईन शिक्षण सुविधेच्या अभावापोटी विद्यार्थ्यांच्या गळतीचे प्रमाण थांबविण्यासाठी इतर राज्यांनी केलेल्या तरतुदींप्रमाणे शालेय विद्यार्थ्यांना मोफत टॅबलेट तसेच इयत्ता दहावीच्या वरील सर्व विद्यार्थ्यांसाठी मोफत लॅपटॉप प्रशासनाने उपलब्ध करून द्यावेत.


३) फडणवीस सरकारने पारित केलेल्या खासगी शिक्षणसंस्थांचे खिसे भरणाऱ्या महाराष्ट्र विनाअनुदानित खासगी व्यावसायिक शैक्षणिक संस्था (प्रवेश व शुल्क यांचे नियमन) कायदा २०१५ तील विद्यार्थी विरोधी तसेच कॅपिटेशन फी प्रतिबंधात्मक कायदा १९८७ शी विसंगत तरतुदींना तात्काळ दुरुस्त करा.


४) सामाजिक न्याय विभागातर्फे कार्यरत सर्व शिष्यवृत्ती योजनांची मदत विद्यार्थ्यांच्या खात्यावर तात्काळ जमा करा.


५) विनोद तावडे शिक्षणमंत्री असतांना रद्द केलेली OBC, SC व ST प्रवर्गासाठीची फ्रीशिप योजना १००% विद्यार्थ्यांसाठी लागू करा.


६) राज्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू असेपर्यंत विद्यापीठांनी परीक्षा शुल्क सरसकट माफ करण्याचे आदेश प्रशासनाने काढावेत तसेच २४ मार्च २०२० पासून वसूल करण्यात आलेले शैक्षणिक शुल्क विद्यार्थ्यांना परत मिळावे.


७) विद्यार्थ्यांचे शैक्षणिक कर्ज सरसकट माफ करावे आणि कोविड पार्श्वभूमीवर शैक्षणिक कर्ज वाटपात २५ % वाढ देण्याचे आदेश बँकांना द्यावेत.


आदी मागण्या करण्यात आल्या आहेत, तसेच मागण्या मान्य न केल्यास ऑल इंडिया स्टुडंटस् फेडरेशनच्या नेतृत्वाखाली राज्यभरातील विद्यार्थी ५ जुलै २०२१ रोजी मुंबई मंत्रालयावर धडकतील असा इशारा देखील निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. 


यावेळी AISF राज्य सहसचिव सुजित चंदनशिवे, AISF शहर अध्यक्ष स्वप्नील घोडेराव, अश्वजित सोनवणे, भूषण गंगावणे, विश्वदीप, अनिकेत देशमुख, धीरज कठारे उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा