Breaking


मराठा मोर्चा नंतर छगन भुजबळ यांच्या नेतृत्वात ओबीसी मोर्चा निघणार !मुंबई : मराठा आरक्षणासाठी आज कोल्हापुरात खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली मूक मोर्चा काढण्यात आला होता, या आंदोलनात अनेक आमदार खासदार सहभागी झाले होते, या मराठा आंदोलनानंतर आता आरक्षणासाठी ओबीसी समाजही आंदोलन करणार आहे.


ओबीसींचे राजकीय आरक्षण धोक्यात आल्याने आरक्षण वाचविण्यासाठी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री आणि समता परिषदेचे सर्वेसर्वा छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली ओबीसी समाजही आरक्षणासाठी रस्त्यावर उतरणार आहे. समता परिषदेच्या नाशिकमध्ये झालेल्या बैठकीत 'ओबीसी आरक्षण बचाव आक्रोश मोर्चा'चे आयोजन करण्यात आले आहे.


या आंदोलनाची सुरुवात उद्या (१७ जून) रोजी नाशिकच्या द्वारका परिसरातून होणार आहे, तसेच संपूर्ण नाशिक जिल्ह्यात ओबीसी आरक्षणासाठी रास्तारोको करण्यात येणार आहे, असं समता परिषदचे जिल्हाध्यक्ष दिलीप खैरे यांनी सांगितलं.


प्रसार माध्यमांशी बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, ओबीसी आरक्षणावर कोणीच काही बोलत नाही, हा मोर्चा केंद्र किंवा राज्य सरकारच्या विरोधात नाही. परंतु ओबीसी आरक्षणाचा प्रश्न केंद्र सरकार, राज्य सरकारने सोडवावा किंवा कोर्टाने मार्ग काढावा पण आरक्षण मिळालं पाहिजे, असे भुजबळ म्हणाले.


गेल्या पंचवीस वर्षांपासून राज्यात राजकीय आरक्षण आहे. शरद पवारांनी ओबीसींना आरक्षण दिलं, त्यामुळे राज्यातील साडे तीनशे लहान जातींना राजकारणात संधी मिळत होती. मात्र ४ मार्च रोजी कोर्टाने ओबीसी आरक्षणावर निकाल दिला, असे ते म्हणाले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा