Breaking


बीड : शेततळ्यात बुडून तरुणाचा मृत्यू

 


केज (बीड) : शेतातील पाईपलाईनचे झाकण बसविण्यास गेलेल्या तरुणाचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना बुधवार (३० जून) रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास आडस येथे घडली. मोरेश्वर रामचंद्र जोशी (वय २१) असे त्या मृत तरुणाचे नाव आहे.


केज तालुक्यातील आडस शिवारात असणाऱ्या कळमआंबा रस्त्यावरील सर्वे नंबर 222/4 मधील आपल्या शेतात शेततळ्यातील पाइपलाइनचे झाकण लावण्यासाठी मोरेश्वर हा गेला होता. झाकण लावताना त्याच्या शरीराचा तोल गेल्याने तो शेत तळ्यातील पाण्यात पडला. त्यास पोहता येत नसल्याने तो पाण्यात बुडाला. ही घटना जवळच शेतात काम करणाऱ्या शेतगड्यांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी त्यास वाचविण्याचा प्रयत्न केला असता तो लवकर मिळून आला नाही. तोपर्यंत घटनेची माहिती समजताच शेजारी असलेल्या शेतकऱ्यांच्या मदतीने मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला. घटनेची माहिती पोलिसांना देताच पोलीस शिपाई तेजस वाव्हळ यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात पाठविला आहे.


मयत तरुण हा पुण्यातील महाविद्यालयात वाणिज्य शाखेच्या अंतिम वर्षात शिक्षण घेत होता. कोरोनाच्या काळात महाविद्यालय बंद असल्याने तो मागील दीड वर्षांपासून गावी शेतावर आई-वडीलांसोबत राहत होता. एकुलता एक असणाऱ्या मुलाच्या अपघाती मृत्यूने आईने फोडलेला हंबरडा हा उपस्थितांचे मन हेलावून टाकणारा होता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा