Breaking




मोठी बातमी : कोपरे गावाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार; मंत्रालय बैठक संपन्न !


मांडवी नदीवर तीन बंधारे बांधण्याचा प्रस्ताव तातडीने मंजुरीसाठी सादर करण्याचे निर्देश


जुन्नर (पुणे) : कोपरे गावाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. मांडवी नदीवर तीन बंधारे बांधण्याचा प्रस्ताव तातडीने मंजुरीसाठी सादर करण्याचे निर्देश राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिले.

केंद्र सरकारच्या सांसद आदर्श ग्राम योजनेत जुन्नर तालुक्यातील कोपरे गावाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. मंत्रालयात झालेल्या बैठकीस राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील, खासदार डॉ. अमोल कोल्हे, जुन्नर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अतुल बेनके, जलसंपदा सचिव अविनाश सुर्वे, कुकडी प्रकल्पाचे अधीक्षक अभियंता हेमंत धुमाळ, जलसंधारण विभागाचे मुख्य अभियंता सुनील कुशिरे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता सुभाष भुजबळ हे उपस्थित होते. 

आदर्श ग्राम योजनेत गाव दत्तक घेण्याचा विषय आला तेव्हाच मी अविकसित राहिलेल्या आदिवासी क्षेत्रातील कोपरे गावाची निवड केली. त्यामुळे या गावाचा विकास करण्याची जबाबदारी माझ्यावर होती. ही जबाबदारी पार पाडण्यासाठी आपले सतत प्रयत्न सुरू होते. या प्रयत्नांना यश मिळाल्यामुळे या गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार आहे. त्याची सुरुवात आजच्या निर्णयामुळे झाली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.


डॉ. अमोल कोल्हे, खासदार

जुन्नर तालुक्याच्या आदिवासी क्षेत्रातील कोपरे गावाची वर्षानुवर्षे पिण्याच्या पाण्याची समस्या मार्गी लावावी अशी मागणी ग्रामस्थांकडून सातत्याने केली जात होती. याबाबत "महाराष्ट्र जनभूमी" ने प्रथम वृत देऊन लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाचे लक्ष वेधले होते.

गेल्या १५ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या हळाची लामटी येथील साठवण तलावाचा प्रस्ताव जलसंपदा मंत्रालयाकडे सादर करण्यात आला आहे. त्यासाठी आवश्यक पाणी उपलब्धता प्रमाणपत्रासाठी थेट जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे खा. कोल्हे यांनी साकडे घातले. त्यानुसार मंत्रालयात बैठक संपन्न झाली.

राज्याच्या जल आराखड्यानुसार कृष्णा खोऱ्यात पाणी उपलब्ध नसल्याने प्रमाणपत्र मिळण्यात अडचणी असल्याची बाब जलसंपदा सचिवांनी स्पष्ट केली. मात्र या भागाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवायचा आहे. त्यामुळे त्यावर मार्ग काढण्याची सूचना जलसंपदा मंत्री पाटील यांनी केली. त्यानुसार मांडवी नदीवर साडेतीन एमसीएफटी क्षमतेचे बंधारे बांधण्याचा प्रस्ताव तत्काळ सादर करण्याचे आदेश जलसंधारण विभागाचे मुख्य अभियंता कुशिरे यांना दिले. 

गेल्या वर्षभरापासून कोपरे येथील हळाची लामटी साठवण तलावासाठी पाणी उपलब्धता प्रमाणपत्र मिळावे यासाठी प्रयत्न सुरू होते, असे कोल्हे म्हणाले. परंतु गतवर्षी देशात कोविड संकट आल्यामुळे हा प्रश्न रखडला होता. पाठोपाठ आलेल्या दुसऱ्या लाटेमुळे या संदर्भातील बैठक अधिक काळ लांबली. परंतु खा। कोल्हे यांनी चिकाटीने पाठपुरावा सुरू ठेवला होता. मंत्रालयात झालेल्या बैठकीत सकारात्मक निर्णय झाल्याने सामुहीक प्रयत्नांना यश मिळाले असून कोपरे, मांडवे, मुथाळणे व जांभुळशी इत्यादी गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल पुढे पडले आहे.

 ही जबाबदारी पार पाडण्यासाठी आपले सतत प्रयत्न सुरू होते. या प्रयत्नांना यश मिळाल्यामुळे या गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार आहे. त्याची सुरुवात आजच्या निर्णयामुळे झाली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा