Breaking


खंडित विजपुरावठ्यामुळे चिखलीतील लघुउद्योजक हैराण, आर्थिक नुकसान लघुउद्योजकांचा आंदोलनाचा इशाराचिखली : चिखली, कुदळवाडी, पवारवस्ती येथे सूक्ष्म आणि लघु उद्योग आहेत, येथील उद्योजकांना मोठ्या कंपन्यांच्या ऑर्डर वेळेवर पुरवायच्या असतात. गेले महिनाभर येथील विजपुरवठ्यामध्ये व्यत्यय येत आहे. महावितरणचा विद्युत पुरवठा खंडित होऊन चार चार तास यंत्रे, मशीन बंद होतात. 


अंडरग्राऊंड केबल जळणे, फ्यूज जाणे, रोहित्र उडून संपूर्ण वीज पुरवठा खंडित होतो. कोट्यवधी रुपयांची दरमहा आम्ही वीज बिले भरतो, वीज पुरवठा खंडित झाला की आमच्या कामगारांना बसून राहावे लागते. असे लघु उद्योजक संघटनेचे संचालक भारत नरवडे यांनी सांगितले.संघटनेचे संचालक नवनाथ वायाळ म्हणाले की, आधीच स्टील आणि कच्च्या मालाच्या किंमती ३५ टक्क्यांनी वाढल्या आहेत. सलग दोन वर्षे लॉकडाऊनचा परिणाम आमच्या उद्योगावर झाला आहे. आम्हाला अखंडित वीजपुरवठा झाला तरच उत्पादन परवडते. वेळेत डिलिव्हरी दिली नाही की, आमची प्रतिमा खराब होते. आम्ही ११ रुपये प्रति युनिट वीज बिल भरतो, मग आम्हाला महावितरण का सेवा देत नाही.


संघटनेचे सचिव जयंत कड म्हणाले की, अचानक वीज खंडित होते, जॉब रिजेक्ट होतात, कटर, आणि किमती टूल्स तुटतात. मशिनरीचे नुकसान होते, वर्क सेटिंग, जॉब रिवर्कचा खर्च वाढतो. महावितरणला निवेदने देऊनही अधिकारी दुर्लक्ष करतात. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी आपली सेवा सुधारावी, अखंडित वीजपुरवठा करावा, अन्यथा आम्हाला आंदोलन करावे लागेल, असा इशारा भारत नरवडे यांनी दिला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा