Breaking

शासकीय कर्तव्य बजावत असताना आदिवासी कर्मचारीस मारहाण, गुन्हेगार नगरसेवकास अटक करण्याची मागणी


नाशिक, दि.७ : शासकीय कर्तव्य बजावत असतांना आदिवासी महिला कर्मचारीस जातीवाचक शिविगाळ करून अमानुष मारहाण करणा-या नंदुरबार येथील  गौरव चौधरी ह्या दोषी नगरसेवकाला तात्काळ अटक करून कठोर शिक्षा करावे, रेती वाहतूक परवाना व नगरसेवक पद कायमस्वरूप रद्द करावे, अशी मागणी कणसरा ग्रुप फाऊंडेशन मयुर गांगोडे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, आदिवासी विकास मंञी के सी पाडवी, जिल्हाधिकारी नंदुरबार, पोलीस अधिक्षक नंदुरबार व पोलीस निरीक्षक नंदुरबार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. 


निवेदनात म्हटले आहे की, दिनांक 05 जून  2021 रोजी आदिवासी समाजाची महिला तलाठी सौ.निशा पावरा ह्या आपले शासकीय कर्तव्य बजावत असतांना नंदुरबार येथील भाजपा नगरसेवक गौरव चौधरी यांनी जातीवाचक शिविगाळ करून अमानुष मारहाण केली आहे. ही घटना अत्यंत निंदनीय असून  माणूसकीला काळीमा फासणारी आहे. 

अवैध्य गौण खनिज नियंत्रण पथकातील आदिवासी महिला शासकीय कर्मचारी शासकीय कर्तव्य बजावत असतांना निशा पावरा यांना नंदुरबार येथील भाजपा नगरसेवक गौरव चौधरी यांनी जातीवाचक शिविगाळ करत मारहाण केली आहे. केस ओढून फरफटत ढकलून दिले आहे, आदिवासी बाई तुला मी सोडणार नाही, नंदुरबार मध्ये नोकरी कशी काय करते? ते बघतो, तहसीलदार मी खिशात घेऊन फिरतो, तुला पाहून घेईन हरामखोर, तुझा पाटा पाडीन, तू स्वतः ला कलेक्टर समजते का? मी नगरसेवक आहे तुला बघून घेईन, अशी धमकी दिली आहे. दिल्याचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. 

आरोपी नगरसेवकावर शासकीय कामात अडथळा निर्माण करणे, शासकीय कर्तव्य बजावत असतांना महिला कर्मचारीस मारहाण करणे, शासकीय कर्मचारीस धमकी व दमदाटी करणे, जमावबंदी आदेश असताना जमाव जमवून शासकीय कर्मचारीस धाक देणे, दबाव आणणे, महिलेचा विनयभंग करणे, महिलेस लज्जा येईल अशा अश्लील भाषेत शिविगाळ करणे या गुन्हाअंतर्गत तसेच अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात यावेत व आरोपीस तात्काळ अटक करून कठोर शिक्षा करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

तसेच सदर नगरसेवकाचे पद व त्याचे रेती वाहतूक परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात यावा. घटनेत आरोपी नगरसेवकाच्या गैरकृत्यात शामिल असणा-या व आरोपीस साथ देणा-या ट्रक-डंपर ड्रायव्हर व इतर संबंधित आरोपींवरही कायदेशीर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा