Breakingआंबेगाव तालुक्यात 'घर तेथे समुपदेशन' अभियान


घोडेगाव :
आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी ठाकर वस्तीमध्ये कोविड - १९ च्या लसीकरणाचे प्रमाण वाढावे. यासाठी आदिम संस्थेच्या वतीने 'घर तेथे समुपदेशन' उपक्रम राबविण्यास सुरुवात झाली आहे.


कोविड -१९ लसीकरणाविषयी समाजामध्ये आजही विविध समज-गैरसमज आहेत. कोविड -१९ च्या संसर्गापासून बचावासाठी लसीकरण हा अत्यंत प्रभावी मार्ग आहे. त्यामुळे समाजामधील लसीकरणाविषयी चे गैरसमज दूर करणे अत्यंत गरजेचे होते. या पार्श्वभूमीवर आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागातील ठाकर वस्त्यांमध्ये लसीकरणाविषयी असलेले समज-गैरसमज दूर करणे अपेक्षित होत. यासाठी आदिम संस्कृती अभ्यास, संशोधन व मानव विकास केंद्र यांच्या पुढाकारातून आंबेगाव तालुक्यातील ठाकर वस्ती येथे घरोघरी जाऊन कोविड -१९च्या लसीकरणाविषयी चे महत्व समजून सांगण्यासाठी पुढील काही दिवस सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ,पुणे व कर्वे समाज सेवा संस्था,पुणे येथील निवडक विद्यार्थिनी घरोघरी जाऊन नागरिकांचे लसीकरण करणे विषयी त्यांच्यासोबत संवाद साधणार आहेत.


या उपक्रमाचे औपचारिक उद्घाटन दि. ०८ जून,२०२१ रोजी ग्रामीण रुग्णालय घोडेगाव या ठिकाणी पार पडले. ग्रामीण रुग्णालय घोडेगाव चे वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल जोशी, डॉ.सुवर्णा काळे,डॉ.प्रीती डामसे व घोडेगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. प्रदीप पवार यांच्या उपस्थितीत पार पडले. 


या प्रकल्पांतर्गत ठाकर आणि कातकरी समुदायात ज्यांच्याकडे आधार कार्ड नाहीत, अशा लोकांची यादी तयार करून ती प्रशासनाला सादर केली जाणार आहे. या उपक्रमाचे संयोजन आदिम संस्थेचे डॉ.अमोल वाघमारे, अनिल सुपे, अविनाश गवारी, राजु घोडे , अशोक पेकारी, प्रा. युवराज काळे हे करत आहेत. तर, प्रत्यक्ष वस्तीमध्ये जाऊन समुपदेशन करण्याचे काम नेहा बांबळे, स्नेहल साबळे,आशा लोकरे,अनुजा असवले,संचिता खेबडे व अभिषेक घोडेकर हे करत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा