Breakingखेड सेझ पंधरा टक्के परतावा त्वरित द्या, रयत क्रांती शेतकरी संघटनेचा आंदोलनाचा इशारा


खेड खेड सेझ पंधरा टक्के परतावा त्वरित द्या, अशी मागणी रयत क्रांती शेतकरी संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे करण्यात आली आहे. तसेच मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.


निवेदनात म्हटले आहे की, सेझ बाधित शेतकऱ्यांचा पंधरा टक्के परताव्याचा प्रश्न गेली १२ वर्ष प्रलंबित असून त्यांनी वेगवेगळ्या मार्गाने आंदोलने करून व निवेदन देऊनही त्यांना न्याय मिळाला नाही. 450 भागधारकाचे अंदाजे पंचावन्न कोटी रूपये एवढी आगाऊ रक्कम जमीन संपादनाच्या वेळेस कपात करण्यात आली .असून अद्यापपर्यंत शेतकऱ्यांना पंधरा टक्के परतावा मिळाला नाही.

याबाबत सेझबाधित शेतकऱ्यांची अशी भूमिका आहे की शासनाच्या महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्यामार्फत शेतकऱ्यांच्या जमिनीचे संपादन करण्यात आले आहे. त्यामुळे हा प्रश्न शासकीय पातळीवर सोडविला जावा. त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेऊन त्यांच्या अध्यक्षतेखाली उद्योग मंत्री, एमआयडीसीमुख्य कार्यकारी अधिकारी, केईआयपीएल प्रतिनिधी, सेझ बाधित शेतकरी प्रतिनिधी, यांची संयुक्त बैठक घेऊन हा प्रश्न त्वरित मार्गी लावावा. बाधित शेतकऱ्यांना रोख स्वरूपात परतावा मिळावा अशी भूमिका जाहीर केली आहे.

सेझ बाधित शेतकऱ्यांच्या पंधरा टक्के परतावा प्रश्नाला रयत क्रांती शेतकरी संघटना यांचा पाठिंबा असून शेतकऱ्यांना त्यांचा न्याय हक्क मिळवून देण्यासाठी यापुढे संघटना तीव्र आंदोलन सेझ बाधित शेतकऱ्यांना समवेत घेऊन करणार आहे. हा प्रश्न पूर्ण  सुटे पर्यंत संघटना सेझबाधित शेतकऱ्यांच्या पाठीशी ठाम उभी राहणार असून त्यांना त्यांचा न्याय मिळवून देणार आहे, असे रयत क्रांती शेतकरी संघटनेचे महाराष्ट्र राज्य प्रवक्ते गजानन गांडेकर इतर पदाधिकारी यांनी जाहीर केले. 

रयत क्रांती शेतकरी संघटनेचे राज्य अध्यक्ष व संस्थापक माजी कृषी राज्य मंत्री सदाभाऊ खोत यांच्या पर्यंत सेझ बाधित शेतकऱ्यांचा 15 टक्के परताव्याचा प्रश्न पोहोचविला असून त्यांच्याशी चर्चा केलेे, असल्याचेही गांंडेकर म्हणाले. तसेच निवेदन देऊनही प्रश्न सुटला नाही तर रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष/संस्थापक सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असे गांंडेकर यांनी सांगितले. 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा