Breaking'माझी वसुंधरा' स्पर्धेत कराड पालिका राज्यात दुसरी


सातारा, दि. ६ जून : माझी वसुंधरा अभियानांतर्गत सन २०२०-२१ मध्ये भूमी, वायू, अग्नी व आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्त्वांवर आधारित राज्यातील नगरपालिकांची स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेमध्ये राज्यातील २२२ नगरपालिकांमध्ये कराड नगरपालिकेने दुसरा क्रमांक मिळवला आहे. शनिवारी ऑनलाइन सन्मान पार पडला. मुख्याधिकारी रमाकांत डाके आणि नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांनी ऑनलाइन हा सन्मान स्वीकारला.


गेले वर्षभर कराडमध्ये नगरपालिका विविध पर्यावरणपूरक उपक्रम राबवत होती. नुकतेच माझी वसुंधरा संचालनालयाकडून पालिकेस पत्र प्राप्त झाले होते. यात अभियानात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या १० नगरपालिकांमध्ये कराडचा समावेश असल्याचे म्हटले होते.

त्यानंतर माझी वसुंधरा संचालनालयाच्या वतीने या दहा पालिकांच्या उपक्रमांची ऑनलाईन पाहणी करण्यात आली होती. शनिवारी "जागतिक पर्यावरण दिन" या दिवशी पर्यावरण दिनाचे औचित्य साधून दुपारी साडेबारा वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, सचिव मनीषा म्हैसकर व मान्यवरांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण झाले.

कराड पालिकेने स्वच्छ सर्वेक्षणामध्ये सलग दोन वर्षे देशात प्रथम क्रमांक मिळवला होता. शासनाचा वसुंधरा पुरस्कारही पालिकेने यापूर्वी मिळवला होता. कराड पालिकेत उपनगराध्यक्ष जयवंतराव पाटील, गटनेते राजेंद्रसिंह यादव, आरोग्य सभापती विजय वाटेगावकर, विनायक पावसकर, सौरभ पाटील यांच्यासह नगरसेवक व अधिकारी उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा