Breakingजुन्नर : ५० लाखांपेक्षा जास्त आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी दोन माजी सरपंचांवर गुन्हा दाखलनारायणगाव : जुन्नर तालुक्यातील नारायणगाव ग्रामपंचायतीमध्ये ५० लाख ८४ हजार ३४३ रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी नारायणगाव ग्रामपंचायतीच्या दोन माजी महिला सरपंच आणि तत्कालीन ग्रामविकास अधिकारी यांच्यावर नारायणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


नारायणगावचे तत्कालीन सरपंच जयश्री सुभाष मेहेत्रे, ज्योती प्रवीण दिवटे आणि तत्कालीन ग्रामविकास अधिकारी राजेंद्र गेनभाऊ खराडे (रा.मंगरूळ, ता.जुन्नर) यांच्यावर आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती नारायणगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिली.


दि.१ एप्रिल २०१५ ते १८ डिसेंबर २०१५ या कार्यकाळात तत्कालीन ग्राविकास अधिकारी आणि तत्कालीन दोन महिला सरपंच यांनी रेखांकित धनादेशाने (खात्याचा क्रॉस चेक) व्यवहार न करता रोखीने २ लाख ३३ हजार रक्कम अदा केली. जमा रकमेतून परस्पर खर्च करणे, दरपत्रक आणि निवेदाशिवाय ५ लाख ३१ हजार ८४२ रुपयांची खरेदी केली. सांस्कृतिक कार्यक्रमावरील मर्यादेपेक्षा जादा ४५ हजार ४१२ रुपये खर्च केला. ग्रामनिधी आणि पाणीपुरवठा निधीवर प्रमाणा पेक्षा ३ लाख ७ हजार ९९० रुपये जास्त खर्च केला. इ- निविदा कार्यप्रणाली न अवलंबिता ३५ लाख ३६ हजार ०२६ रुपयांचे सहित्य खरेदी केली. ग्रामपंचायत दप्तरात अनियमितता आणून ४ लाख ३० हजार ७३ रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार केला. भाडे वसुलीबाबत ग्रामपंचायत मुंबई अधिनियम कायद्याचा भंग करून विहित कार्यपद्धतीचा अवलंब न करता एकूण ५० लाख ८४ हजार ३४३ रुपयांचा अपहार केला आहे. या एकूण आर्थिक रक्कमेपैकी तत्कालीन सरपंच जयश्री सुभाष मेहेत्रे यांनी २१ लाख ५१ हजार ३७४ रुपये, तत्कालीन सरपंच ज्योती प्रवीण दिवटे यांनी ३ लाख ९० हजार ७९७ रुपये तर तत्कालीन ग्रामसेवक राजेंद्र गेनभाऊ खराडे यांनी २५ लाख ४२ हजार १७२ रुपये असा एकूण शासकीय निधीचा अपहार करून शासनाची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले आहे. याबाबत जुन्नर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी किसन बबन मोरे यांनी दिलेल्या फिर्यादी वरून नारायणगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मात्र अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नसल्याचेही पोलिसांनी सांगितले.


दरम्यान, नारायणगाव ग्रामपंचायतीचे दप्तर तपासणी करण्याचे आदेश तत्कालीन उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिले होते. त्यानुसार जुन्नर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी जयश्री बाजीराव बेनके आणि किसन बबन मोरे यांनी ग्रामपंचायत नारायणगाव गावच्या ग्रामपंचायतीचे कार्यालयीन दप्तर तपासणी करून दि. २० फेब्रुवारी २०१६ रोजी तत्कालीन उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परीषद पुणे यांना तपासणी अहवाल सादर केला. या अहवालावरून तत्कालीन ग्रामविकास अधिकारी राजेंद्र गेनभाऊ खराडे यांची खातेनिहाय्य चौकशी करण्यात आली असून त्यात ते दोषी असल्याचे निष्पन्न झाले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा