Breaking
जुन्नर : सलून व पार्लर दुकानांवर घातलेली बंदी उठवण्याची जुन्नर तालुका ग्रामीण नाभिक विकास संस्थेची मागणी


जुन्नर (पुुणे) : पुणे जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार ग्रामीण भागात लॉकडाउन कायम ठेवण्यात आले आहे, त्यामध्ये जुन्नर तालुका देखील प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून जाहीर केल्याने अत्यावश्यक सेवा वगळता अन्य दुकाने बंद राहणार आहे, या पार्श्वभूमीवर सलून व पार्लर दुकानांवर घातलेली बंदी उठवण्याची मागणी जुन्नर तालुका ग्रामीण नाभिक विकास संस्थेने तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.


तसेच, दि. ४ जून पर्यंत सलुन व्यवसाय सुरु करण्याची परवानगी द्यावी, अन्यथा सर्व नाभिक सलुन व्यवसायिक दि. ५ जून रोजी दुकान सुरु करण्याचा इशारा देण्यात आला आहे. जर सलुन दुकानावर कायदेशीर कारवाई केल्यास, सहकुटुंब तहसिलदार कार्यालय येथे जेलभरो आंदोलन करु, असाही इशारा देण्यात आला आहे.

नाभिक विकास संस्थेने निवेदनात म्हटले आहे की, नाभिक समाज हा ९०% भुमिहिन तर १०% अल्पभुधारक आहे व सर्वच समाजाची उपजिविका ही सलुन व पार्लर या व्यवसायावर अवलंबून आहे. त्यामुळे या आदेशामुळे संपुर्ण नाभिक समाजावर उपासमारीची वेळ आली आहे. गेल्या वर्षी सुध्दा ५ महिने सलुन व्यवसाय बंद होता. त्यामुळे समाजातील २७ हुन अधिक व्यावसायिकांनी कर्जबाजारीपणामुळे भीषण उपासमारीने आत्महत्या केली असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

मागील लॉकडाऊनमुळे सलुन व्यवसायिक हे कर्जबाजारी झाले आहेत ते अजुनही यातुन सावरलेले नाहीत. त्याकाळात संपुर्ण नाभिक समाजास कुठल्याही प्रकारची आर्थिक मदत, दुकानभाडे, लाईटबील माफी, मुलांची शाळा/ कॉलेज फि माफ करण्यात आलेली नाही. त्यातच दुसरा लॉकडाऊन लावण्यात आल्यामुळे सलुन व्यावसायिकांवर अन्याय होत आहे असल्याचे म्हटले आहे. 

निवेदनावर जुन्नर तालुका ग्रामीण नाभिक विकास संस्थेचे अध्यक्ष अरुण लक्ष्मण क्षीरसागर, उपाध्यक्ष सचिन कोळेकर, कार्याध्यक्ष सुनिल खंडागळे यांंची नावे आहेत.   

तसेच सलुन व्यवसाय बंदच ठेवणार असेल तर खालील मागण्या करण्यात आल्या आहेत.

१. सर्व नाभिक व्यवसायिकांना रु. २०,००० दरमहा पॅकेज द्यावे.

२. मुलांना शाळा/कॉलेज शुल्क माफ करण्यात यावे.

३. वीजबिल माफ करण्यात यावे.

४. घरभाडे, दुकानाचे भाडे व घरपट्टी हे माफ करण्यात यावे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा