Breaking


जुन्नर : देवराम लांडे यांची होणार पुन्हा घरवापसी ? दिले पक्ष बदलाचे संकेत !


जुन्नर (पुणे) : मोडक्या घरातून, हक्काच्या घरात घर वापसी करण्याचा शिवसेनेचे देवराम लांडे यांनी सूचक संकेत दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून देवराम लांडे राष्ट्रवादी कॉग्रेसच्या कार्यकर्त्यांसोबत फिरत आहेत, त्यामुळे देवराम लांडे हे राष्ट्रवादी कॉग्रेसच्या वाटेवर असल्याची चर्चा होत असताना या चर्चेला आता त्यांनीच दुजोरा दिला आहे. 


देवळे (दरेवाडी) या ठिकाणी महावितरणच्या विजेचे उद्घाटन करण्यासाठी दि.१७ रोजी तालुक्याचे आमदार अतुल बेनके हे उपस्थितीत होते, या उद्घाटन प्रसंगी बोलताना जिल्हा परिषद सदस्य देवराम लांडे यांनी तालुक्यात अनेक विकास कामे केली असून त्यासाठी निधी आणला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. त्यात देवळे हे माझ्या प्रेमाचं गाव या गावच्या विकासासाठी मी कुठं कमी पडणार नाही, यासाठी मी आ. बेनके यांच्या सोबत आहे, असेही ते म्हणाले.


तसेच, "मी आदिवासी समाजाच्या विकासासाठी मी पक्षाचा विचार करणार नाही. मी नेहमी पक्ष बदल केला आहे, आज हि ठाम पणे सांगतो मी पडक्या घरातून हक्काच्या घरात पदार्पण करणार आहे, कोण काय बोलतो याच्याकडे मी लक्ष देत नाही", असे परखड मत उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले. त्यामुळे हेच तर पक्ष बदलाचे संकेत नाहीत ना?


आजपर्यंत अनेक पक्ष बदलले


देवराम लांडे यांनी आजपर्यंत अनेक पक्ष बदलले आहे. सत्ता तिकडे देवराम लांडे अशीही चर्चा होताना दिसत आहे. परंतु लांडे म्हणतात, मी कोणत्याही पक्षाचा नाही, समाजाचा आहे. देवराम लांडे हे शिवसेनेत असताना त्यांचा मुलगा अमोल लांडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला आहे तसेच ते राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राज्य सरचिटणीस पदावर आहेत.


येत्या वर्षभरात पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणूका होत असल्याने देवराम लांडे हे त्यांच्या मुलाच्या राजकीय भविष्यासाठी राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची देखील चर्चा राजकीय वर्तुळात आहे.


पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणूकाची समीकरणे बदलणार !


पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणूका वर्षभराने होत आहेत. देवराम लांडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्यानंतर पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणूकांची समीकरणे बदलणार असून, पंचायत समितीसाठी अमोल लांडे तयारी करत असल्याचे देखील सुत्रांकडून समजते. तर देवराम लांडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्यानंतर जिल्हा परिषदेचे तिकीट दिले जाणार का ? हा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे.


बाप - लेकाला पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणूकांमध्ये संधी दिल्यास राष्ट्रवादीचे खंदे समर्थक माजी जिल्हा परिषद सदस्य भाऊ देवाडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते निलेश रावते नाराज होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे वेळच ठरवेल की येणाऱ्या निवडणूकीतील समीकरणे कशी असतील, तुर्तास तरी देवराम लांडे यांची घरवापसी होणार असल्याची शक्यता नाकारता येत नाही.

1 टिप्पणी: