Breaking

गतवैभवासाठी नदी किनारी परिसरात कायमस्वरूपी लॉकडाऊन करा, कोणीतरी पहारेकरी बना रे !


जगातील 70 टक्क्यांहून अधिक मानवी वस्ती नदीच्या किनारी आहे. सर्व नद्या शतकापूर्वी अतिशय स्वछ आणि प्रवाही होत्या. मासे, बेडूक, पाणकोंबडी, साप, निसर्ग निर्मित सर्व जलचर, भूचर, पशुपक्षी, किडे मकोडे, खेकडे, जीवजंतू आणि विविध प्रकारची झाडे झुडपे, लता वल्लरी इ जीवचक्रातील व्यवस्थापन या नद्यांच्या भोवताली निसर्गाने निर्माण केले होते. वेदोक्त काळापासून नद्यांची नावे सुद्धा स्त्री संस्कृती चे प्रतीक आहेत. जगातील सर्व धर्मामध्ये नदीचे पूजन होते. 

चीन, बांगलादेश, वाळवंटातील इजिप्त, इस्रायल, इराण, इराक या देशांनी नद्या सुरक्षित ठेवल्या आहेत. आफ्रिका, गल्फमध्ये मोठी युद्धे झाली पण युद्धखोरांनी तेथील नद्यांवर हल्ले केल्याचा इतिहास नाही. आपल्या देशातील सिक्कीम, मिझोराम, अरुणाचल प्रदेश, नागालँड इ. राज्यांमध्ये झुळझुळ वाहणाऱ्या मनोवेधक नद्यांचे संवर्धन तेथील सरकार आणि जनतेने केलेले आहे. विश्व पर्यावरणाला पाण्याच्या प्रदूषणाचा मोठा धोका निर्माण झालेला आहे.


पिंपरी चिंचवड शहरात दोन नद्या आहेत. त्यातील पवना आणि इंद्रायणी म्हणजे कचरा, घाण, घातक रसायने टाकण्यासाठी वापर केला जात आहे. हयातभर या नद्या प्रदूषित व्हा !, दरवर्षी येणाऱ्या पावसाने त्या स्वच्छ होतील, पुन्हा आम्ही त्या प्रदूषित करू आणि नदी सुधार, जलपर्णी निर्मूलनाच्या आर्थिक लुटालुटीसाठी पुन्हा पुन्हा या नद्या राजकारणी मंडळीस आर्थिक लुटालुट करण्यासाठी संधी ठरत आहेत.

पुण्यातील राम नदी तर जवळ जवळ बूजवूनच टाकली आहे, तीच गत आज मुळा नदीची आहे. पवना इंद्रायणी च्या प्रदूषणामुळे शुद्ध पाणी विक्रीचा व्यवसाय तेजीत आहे. गेल्या काही वर्षात 50 हुन जास्त बाटलीबंद पाण्याचे कारखाने पिंपरी चिंचवड, पुणे लगतच्या परिसरात वाढले आहेत. हे कारखाने कोणाचे आहेत ? तीर्थक्षेत्र इंद्रायणीमध्ये भाविकांना आणि तेथील नगरवासीयांना पाणी विकत घ्यावे लागत आहे. नदीच्या पात्रामध्ये जलपर्णीची हिरवीगार चादर आहे. पाण्यात सूर्यप्रकाश पसरत नाही. शहरामध्ये मच्छर वाढले. आजार वाढले. प्रदूषण नियंत्रण मंडळ काहीच नियंत्रण करत नाही तर ती सरकारी संस्था कालबाह्य झालेली आहे.

आमचे खासदार, आमदार पुणे-पिंपरी चिंचवड मधील नदी प्रदूषणाचा प्रश्न सोडवणुकीसाठी कधी राजकारणापलिकडे जाऊन तज्ञ लोकांशी विचार विनिमय करून आराखडा तयार करत नाहीत. पुणे पिंपरी चिंचवडच्या 40 वर्षाच्या औद्योगिक आणि नागरीकरणाच्या अनेक योजनांमध्ये नदी आणि हवेचे प्रदूषण किती होईल. त्याचे परिणाम, उपाययोजना यावर राज्यकर्त्या वर्गाने कधी विचारच केला नाही. मलमूत्र, रसायने, कचरा, बांधकामाचा राडारोडा नदीमध्ये टाकला जातोय. यासाठी फौजदारी न्यायालयात कोणाला शिक्षा होऊ शकत नाही. इतका औद्योगिक विकास करून शहरामध्ये नद्या विषार होऊन फेसाळतात. पाण्यातील संपूर्ण ऑक्सिजन खाणाऱ्या जलपर्णी च्या चादरी सर्वत्र दिसतात. एकेकाळी रशिया, युरोप, आशिया खंडातील पक्षी स्थलांतर करत शहरात येत होते. आता चिमण्या, कावळे, पोपट सकाळी संध्याकाळी दर्शन द्यायचे. ते आता निघून गेले आहेत किंवा त्यांच्या प्रजाती संपल्या आहेत. शहरातील कितीतरी नैसर्गिक नाले विकासकांनी बुजवून टाकले आहेत.


नद्या प्रदूषित केल्या; आता झाडे पण तोडणार आम्ही

आपल्या शहरात उपयुक्त मोठी झाडे होती. त्यांच्या नोंदीचा इतिहास मनपा च्या पर्यावरण, वृक्ष विभागाने तपासावा. या शहरात झाडे तोडताना कुणालाही कायद्याची भीती वाटत नाही. घरात फांदी येते, स्ट्रीट लाईटला अडथळा होतो, म्हणून झाडे तोडण्याची परवानगी दिली जाते. गुगल मॅप पहिला तर देहूरोड, खडकी, पुणे कॅन्टोन्मेंट मध्ये वृक्ष दिसतील. कारण तेथे लष्कराच्या ब्रिगेडीअरच्या नियंत्रणाखाली नागरी प्रशासन काम करत असते. केंद्रातील संस्कृतीचे रक्षक सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाने अनेक नियमांमधील बदलामुळे नद्यांचे संवर्धन, वृक्ष संवर्धन याला मूठमाती दिलेली आहे.

चंगळवादी, कार्पोरेट जीवनशैली सर्व काही पैशावर मिळवू असे समजत आहे. मात्र कोरोना व्हायरसने शुद्ध हवा पाणी आणि एकंदर सर्व सृष्टीकडे बघण्यासाठी एक संधी दिली आहे. जागतिक पर्यावरण दिवस एक दिवस साजरा केला जातो. मुळात निसर्गाने नद्या, हवा, पाणी, महासागर, पर्वतराजी माणसासाठी निर्माण केलेल्या नाहीत. जगात फक्त 700 कोटी माणसे आहेत. इतर सर्व जीव कितीतरी कोटीमध्ये आहेत. कोरोना सारखे विषाणू 20 लाख असावेत.

भारतातील गंगा प्रदूषण निर्मूलनासाठी राजीव गांधींच्या काळात मंत्रालय स्थापन झाले. अग्नीहोत्र आणि नद्यांच्या आरत्याचा आता इव्हेंट होतोय. तीर्थक्षेत्र आळंदी ला शुद्ध पाणी नाही, मोरया गोसावी गणेश मंदिराच्या पवना परिसरात दुर्गंध येत आहे. जगातील सर्वात प्रदूषित शहर दिल्ली आहे, आता पिंपरी चिंचवडचा नंबर लागेल.

नद्या कोण प्रदूषित करत आहेत, कोण राडारोडा टाकत आहे. विविध गार्डन मधील झाडांना पाणी दिल जातंय का? कोणी झाडे तोडताय का? शहरातील पर्यावरण आरोग्यदायी ठेवणासाठी पुन्हा नद्यांची शास्त्रोक्त परिक्रमा करावी लागेल. पवना आणि इंद्रायणीच्या परिक्षेत्रामध्ये कायम स्वरूपी लॉक डाऊन करावे. तेथे नवे इलेक्ट्रॉनिक पहारेकरी नेमा. 

क्रांतिकुमार कडुलकर,
पिंपरी चिंचवड

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा