Breaking

नागपूर : आशा स्वयंसेविकांचा उद्या मोर्चा, किमान वेतन देण्याची मागणी


नागपूर, दि. १९ : किमान २२ हजार रुपये मासिक वेतन द्यावे, शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळावा, या प्रमुख मागणीसाठी सोमवारी (दि. २१ जून ) सकाळी ११ वाजता सुभाष मार्गावरील खंडोबा देवस्थान येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती आशा व गटप्रवर्तक कर्मचारी युनियनचे ( सिटू) अध्यक्ष राजेंद्र साठे यांनी शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. 


केंद्र सरकारने कोरोना काळात सेवा दिल्याने गेले तीन महिने अतिरिक्त एक हजार रुपये दिले होते. एवढीच रक्कम राज्य सरकारने द्यावी, अशी मागणी करण्यात आली होती. परंतु, ही मागणी पूर्ण करण्यास नकार दिला आहे. सध्या आशा वर्कराला फक्त १६५० रुपये मानधन मिळते. या मानधनात कुटुंब चालवून दाखवावे. यानंतरही कोरोना काळात आशा वर्करांनी महत्त्वपूर्ण काम केले. त्यांच्याकडून ८ तास कामे करवून घेतल्या जातात. केंद्र सरकारने आशा वर्कर किमान वेतन म्हणजे १८ हजार रुपये महिना देण्यात येईल, असी घोषणा केली होती. परंतु त्याची अद्यापपर्यंत अंमलबजावणी करण्यात आली नाही. किमान १८ हजार रुपये तरी वेतन द्यावे, अशी मागणी साठे यांनी केली.

आशा व गटप्रवर्तकांनी १५ जूनपासून सुरु झालेले आंदोलन तीव्र करण्याचे ठरवले आहे. मंगळवारी (२२ जून) संविधान चौकात ‘थाली बजाव' आंदोलन करण्यात येईल. राज्य सरकारकडे पैसे नसल्याने आशा स्वयंसेविका यावेळी भिक मागतील. हा गोळा झालेला पैसा राज्य सरकारला पाठवण्यात येणार असल्याचेही साठे यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला प्रीति मेश्राम, रंजना पौनिकर, कांचन बोरकर प्रामुख्याने उपस्थित होत्या.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा