Breaking


पुणे : काँग्रेसचे सुरेश भाई सोनवणे यांचे दु:खद निधन !पिंपरी चिंचवड : पिंपरी-चिंचवडचे माजी काँग्रेस अध्यक्ष, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष आणि लोकप्रिय वक्ते सुरेश भाई सोनवणे यांचे आज( दि.21 जून ) अल्पशा आजाराने निधन झाले. ते 74 वर्षाचे होते. 


सुरेश भाई सोनवणे यांचा जन्म जळगाव जिल्ह्यात पाळधी येथे झाला. व त्यांचे शिक्षण सोलापूर सातारा व पुणे येथे झाले. महाविद्यालयीन जीवनात एक उत्कृष्ट खेळाडू म्हणून प्रसिद्ध होते. आणीबाणी नंतर झालेल्या निवडणुकीत काँग्रेसकडून अभ्यासू वक्ता म्हणून ते पुढे आले आणि युवक काँग्रेसचे काम करू लागले. रामकृष्ण मोरे, उल्हास दादा पवार यांचे ते समकालीन होते. काही काळ ते काँग्रेस भवन मध्ये राहत होते. यानंतर वसंत दादा पाटील यांच्या सल्ल्यानुसार त्यांनी आपले कार्यक्षेत्र पिंपरी-चिंचवड निवडले आणि 1986 साली ते काँग्रेसचे अध्यक्ष झाले. त्याच बरोबर खराळवाडी प्रभागातून अत्यंत चुरशीची निवडणूक त्यांनी जिंकली.


काँग्रेसचे अध्यक्ष असताना यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी-चिंचवड मध्ये कायम काँग्रेसला बहुमत असे. नगरसेवक व स्थायी समिती अध्यक्ष असताना पिंपरी-चिंचवड मध्ये वाय सी एम हॉस्पिटल, अप्पू घर, त्याचप्रमाणे चिंचवड भाजी मंडई, अशा अनेक प्रकल्प उभारण्यात त्यांची भूमिका होती.


पिंपरी चिंचवड मनपा कामगारांना पाचवा वेतन आयोग लागू करण्यामध्ये त्यांनी सभागृहांमध्ये भाषण करून आयोग लागू करण्याबाबत भूमिका घेतली होती. महानगरपालिके जवळील आंबेडकरांचा पुतळा उभारण्यासाठी त्यांनी आपल्या वॉर्डातील झोपडपट्टी उठवून त्या सर्वांना निगडी ओट्यावर पर्यायी जागा दिल्या. त्यामध्ये भाडेकरूंनाही पर्यायी जागा दिलेल्या होत्या.


महात्मा फुले यांच्याबद्दल 'सोबत' मध्ये आलेल्या  निंदनीय मजकुराला त्यावेळी सभागृहांमध्ये सुरेश भाईंनी याचा निषेध नोंदवला. पिंपरी-चिंचवड मध्ये हॉकीसाठी पॉली ग्रास ग्राउंड त्यांनी तयार केले. सुरेश भाई सोनवणे यांनी भारिप-बहुजन महासंघातर्फे आमदारकीची निवडणूक लढवली होती. परंतु ते परत काँग्रेसमध्ये आले आणि त्यानंतर राष्ट्रवादी बरोबरच ते राहिले. 


राष्ट्रवादीचे स्वीकृत सदस्य म्हणूनही, नगरसेवक म्हणून त्यांनी काम पाहिले. एक अत्यंत अभ्यासू आणि मोठा मित्रपरिवार असलेला कार्यकर्ता आणि उत्कृष्ट वक्ता आणि सर्व पक्षात मित्र असलेला कार्यकर्ता अशी त्यांची ओळख होती. धनगर समाजात जन्म घेऊन त्यांनी काँग्रेस बरोबर कायमच व्यापक राजकारण केले. त्यांच्यामागे त्यांच्या पत्नी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्या लता भिसे सोनवणे व पुत्र कबीर आहे.


सुरेश भाई काँग्रेस मधील एक विद्वान विचारवंत होते.1980 च्या दशकातील या युवा नेत्याने काँग्रेस पक्षाची मोठी संघटना बांधणी केली. सेक्टर 22 मधील आंबेडकर वसाहत उभी करून त्यांनी गोर गरिबांना घरे मिळवून देण्याचा धोरणात्मक निर्णय त्यांनी घेतला. त्यावेळी ते स्थायी समितीचे अध्यक्ष होते.

- मानव कांबळे,  नागरी हक्क सुरक्षा समिती

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा