Breaking
राज्यात पावसाची दांडी, पहा हवामान विभाग काय म्हणतंय !


पुणे : राज्यात जून महिन्याच्या सुरुवातीलाच अनेक भागांत पावसाने हजेरी लावल्यानंतर सध्या दांडी मारल्याचे चित्र पहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांत तुरळक सरी पडण्यापलीकडे पाऊस झालेला नाही. हेच चित्र पुढील आठवडाभर कायम राहणार राहिला, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे.

पावसाचे आगमन यंदा लवकर होणार या आशेने शेतकऱ्यांचा आनंद द्विगुणित झाला होता. गेल्या वर्षी अवकाळीमुळे बहुतांश शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागले होते. परंतु आताही मान्सूनचे वारे कमकुवत असल्यामुळे पुढील सात दिवस मध्य भारत, उत्तर पश्चिम भारत, महाराष्ट्रासह दक्षिणेतील बहुतांश राज्यात मोठ्या पावसाची शक्यता नसल्याचे पुणे हवामान विभागाने जाहीर केले आहे. याच काळात उत्तरपूर्व भारतात पावसाच्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे.

सध्या मान्सूनच्या वाटचालीस अनुकूल वातावरण नाही. तसेच पश्चिम भागातील वाऱ्यांची दिशा लक्षात घेता उत्तर पश्चिम भारत, मध्य भारतात 24 ते 26 जूनच्या दरम्यान मोठ्या पावसाच्यादृष्टीने अनुकूल स्थिती नाही. अरबी समुद्राकडून येणारे वारे कमकुवत असून त्यामुळे पुढील सात दिवस फारसा पाऊस होणार नाही. कोकण, गोव्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. विदर्भातील चंद्रपूर, भंडारा, बुलढाणा, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा