Breaking
शाळेच्या दाखल्यावर धर्माचा उल्लेख करू नये, बिरसा फायटर्सची मागणी


रत्नागिरी, दि. २० : अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांच्या शाळेच्या दाखल्यावर धर्माचा उल्लेख करू नये , अशी मागणी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड व आदिवासी विकास मंत्री अॅड.के.सी.पाडवी यांच्याकडे एक निवेदनाद्वारे केली आहे.


निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभाग मंत्रालय मुंबई यांच्या दिनांक 12 जानेवारी 2000 रोजीच्या शासन परिपत्रकानूसार अनुसूचित जमातीच्या विद्यार्थांच्या जातीच्या दाखल्यामध्ये फक्त जातीचा उल्लेख करावा, धर्माचा उल्लेख करण्यात येऊ नये. असा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे. 

जून महिन्यात शाळा व महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थी व पालकांची धावपळ सुरू आहे. अनेक पालक व विद्यार्थी आपल्या सोयीनूसार नवीन प्रवेशासाठी नोंदणी करत आहेत व प्रवेश घेत आहेत. त्यासाठी जातीचा दाखला व शाळा सोडल्याचा दाखला लागतो. आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या परिपत्रकानूसार अनुसूचित जमातीच्या विद्यार्थाच्या दाखल्यावर जातीच्या पुढे कोणत्याही धर्माचा उल्लेख न करता दाखला देण्यात यावा.तशी नोंद करावी, असा स्पष्ट आदेश देण्यात आला आहे. 
 
कारण आदिवासींचे स्वतंत्र अस्तित्व आहे. आदिवासी हा निसर्गपूजक आहे. पूर्वीपासून तो निसर्गाशी संबंधीत घटकांची पूजा करत आला आहे व आता सुद्धा करत आहे. वाघदेव, बापदेव, डोंग-यादेव, जल , जंगल, जमीन, वृक्ष, प्राणी इत्यादी निसर्गाशी संबंधीत घटकांची आदिवासींमध्ये पूजा केली जाते. आदिवासी संस्कृती ही विशिष्ट संस्कृती आहे. आदिवासी संस्कृतीचा कुठल्याही धर्माशी मिळतीजुळती नाही. आदिवासींची एक स्वतंत्र संस्कृती आहे.इंग्रजांच्या काळात आदिवासींना ओबाजीनीझ, अॅनामिस्ट, ट्रायबल म्हणून ओळखले जात होते.

स्वातंञ्यानंतर भारतीय जनगणनेत आदिवासींचे अस्तित्व दाबण्यात आले. म्हणून 2021 च्या जनगणनेत आदिवासींसाठी स्वतंत्र काॅलम करण्यात यावा, अशी मागणी आम्ही राष्ट्रपती व पंतप्रधान यांच्याकडे केलेली आहे.

म्हणून शासन परिपत्रकानूसार अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांच्या शाळेच्या दाखल्यावर धर्माचा उल्लेख करू नये, अशी मागणी पावरा यांनी शासनाकडे केली आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा