Breaking

सांगली : आशा व गटप्रवर्तकांचा एल्गार; 21 जूनला पालकमंत्र्यांच्या कार्यालयासमोर निदर्शने


सांगली
, दि. १९ : आशा व गटप्रवर्तकांचे पालक मंत्र्यांच्या कार्यालयासमोर 21 तारखेला निदर्शने करण्यात येणार असल्याची माहिती लाल बावटा आशा व गटप्रवर्तक युनियन चे मिना कोळी यांनी सांगितले. 

आशा व गटप्रवर्तक यांचा गेल्या 15 जून पासुन बेमुदत संप चालु आहे. याबाबत राज्य शासनाने समाधानकारक तोडगा न काढल्याने आंदोलन आधिक तीव्र करण्याचा निर्णय युनियनने घेतला आहे. त्या आंदोलनाचा भाग म्हणुन सोमवार दि. 21 जुन 2021 रोजी सांगली जिल्ह्याचे पालक मंत्री जयंत पाटील यांच्या सांंगली येथील कार्यालयासमोर निदर्शने करण्यात येणार आहेत.

सरकारने कोविड काळात आशा व गटप्रवर्तकांकडून त्यांचा जीव धोक्यात घालुन कामे करून घेतली. मात्र या कामाचा कोणताही अतिरिक्त मोबदला दिला नाही. माझे कुटुंब माझी जबाबदारी या सर्वे चे कामही अतिरिक्त मोबदला न देता करून घेण्यात आले. आता रॅपिड अँटीजेन टेस्ट घरोघरी जाऊन करण्याची जबाबदारीही आशांवर टाकण्यात येत आहे. कोविड काळात जीवाची पर्वा न करता लढणाऱ्या राज्यभरातील आशा व गट प्रवर्तकांवर होणारा अन्याय सहन करणे अशक्य असल्याने सिटू व समविचारी कामगार संघटनांनी बेमुदत संप सुरू आहे.

कोविड काळातील कामाचा अतिरिक्त मोबदला द्या, माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेचा स्वतंत्र मोबदला द्या, आशा व गटप्रवर्तकांना कायम नियुक्तीची पत्रे द्या, आशा व गटप्रवर्तक यांच्या नियमित वेतनात भरीव वाढ करा या प्रमुख मागण्यांसाठी हा संप होत आहे.

सरकारने कृती समितीच्या नेत्यांबरोबर चर्चा करुन योग्य तोडगा काढावा अशीही मागणी केली आहे. सोमवारी होणाऱ्या या आंदोलनात जिल्ह्यातील आशा व गटप्रवर्तकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवहान करण्यात आले आहे. प्रसिद्धी पत्रकारावर उमेश देशमुख, मिना कोळी, वर्षा ढोबळे, सुरेखा जाधव, हणमंत कोळी, विमल जाधव, अंजु नदाफ, शबाना आगा, लता जाधव, सुवर्णा सणगर, मंजुषा साळुंखे यांनी सांगितले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा