Breakingसीटू चे जेष्ठ नेते कॉम्रेड बापू कवर यांचे दु:खद निधन !


मुंबई सीटू चे जेष्ठ नेते कॉ. बापू कवर यांचे वयाच्या ७८ व्या वर्षी दु:खद निधन झाले. आज शनिवार दि.१२ जून २०२१ रोजी हृदय विकाराने केईएम रूग्णालय येथे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.


बापू कवर यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात शेतकरी कुटुंबात झाला. नोकरीसाठी मुंबईत आल्यावर ते उमेदीच्या काळात तोडी इंडस्ट्री मध्ये कामगार होते. तेथे सीटूच्या नेतृत्वाखाली व बापूंच्या पुढाकाराने कंपनीत संप आंदोलन झाले. व्यवस्थापनाने संप मोडून काढण्यासाठी भाडोत्री गुंडांकडून हल्ले केले, त्याला त्यांनी तोंड दिले. या कृतीचा बदला म्हणून व्यवस्थापनाने बापूंना बडतर्फ केले. तेव्हापासूनच ते सीटूचे पूर्णवेळ कार्यकर्ते झाले.

पुढे १९७३ सालापासून ते मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचेही सभासद झाले .सीटू संलग्न इंजिनियर वर्कर्स, इंडस्ट्रियल वर्कर्स, हॉटेल आणि बेकरी वर्कर्स युनियन अशा अनेक संघटनांचे कामकाज कॉ.कृष्णन व त्यांनी बरेच वर्षे सांभाळले.

कॉ.कृष्णन यांच्या सोबत ते अनेक वेळा औद्योगिक न्यायालयातही जायचे, त्यांनी अनेक लवादामध्ये कामगारांच्या बाजूने निर्णय लागण्यामध्ये कॉ.कृष्णन यांना सहकार्य केले आहे. ते सीटूचे राज्य कमिटी सदस्य व मुंबई कमिटीचे खजिनदार तसेच मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे मध्य मुंबई तालुका कमिटीचे सदस्य होते. 

सीटू चे कामकाज त्यांनी सुरूवातीला दादर व नंतर शेवटपर्यंत आझाद मैदान येथील कार्यालयातून सांभाळले. फोर्ट सेंटरचे तर ते आधार स्तंभच होते. आझाद मैदानावर आयोजित मोर्चाच्या आयोजनात त्यांचा सिंहाचा वाटा असायचा. या आंदोलनांची पोलीस परवानगी, स्टेज, साऊंड व पिण्याच्या पाण्याचे व्यवस्थापन तेच पार पाडायचे. ऐतिहासिक किसान लाँग मार्च, जमसंच्या राष्ट्रीय अधिवेशनाची रॕली व सभा, याच वर्षी २५ जानेवारीची कामगार-शेतकरी ऐक्याची विशाल सभा अशा कितीतरी लढ्यांत व कार्यक्रमांत त्यांचे प्रचंड योगदान होते.

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षात तरूणांचा सहभाग वाढावा असे नेहमी त्यांना वाटायचे. शेवटपर्यंत मार्क्सवादावर त्यांची अढळ निष्ठा होती. 

बापू यांच्या निधनाने मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे, सीटूचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी वासंती, चार मुली सुकन्या, मिनाक्षी, प्रतिका, प्रशांती, तर जावई अवधूत व महेश, नातू स्वराज असा परिवार आहे.

अंत्ययात्रेत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे, सीटू या कामगार संघटनेचे तसेच संलग्न संघटनांचे पदाधिकारी सहभागी होते. यामध्ये कॉ.महेंद्र सिंह, कॉ.डॉ.विवेक माँटेरो, कॉ.सोन्या गील, ॲड.आरमायटी ईराणी, कॉ. नारायणन, कॉ. प्रविण मांजलकर, कॉ.जॉय झेवियर, कॉ.मनोज यादव, कॉ.डॉ.रविंद्र मदने, कॉ.तृप्ती निकाळजे, कॉ.दिपक पवार, कॉ.प्रविण काजरोळकर, कॉ.तडके, कॉ.चंद्रकांत अहिरे, कॉ.विवेक निमसे, कॉ.सुशिल देवरूखकर आदीसह सहभागी झाले होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा