Breaking

मोठी बातमी : शिवसेनेचे आमदार सरनाईक यांचा लेटर बॉम्ब आणि भाजप आमदाराचे खळबळजनक ट्विट, हे सत्ता बदलाचे संकेत ?मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्यानं राजकीय चर्चेला उधाण सुटले आहे, तर्कवितर्क लावले जात असताना आज (२० जून) रोजी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र पाठवल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. 

 

शिवसेनेचे प्रवक्ते आणि आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून नरेंद्र मोदी आणि भाजपाशी जुळवून घेण्याची विनंती केली आहे. भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी दोनच वाक्यात ट्विट करत सत्तांतराचे संकेत देणारं एक ट्विट करत खळबळ उडवून दिली आहे. त्यांनी ट्विट करून म्हटले आहे की, "महाराष्ट्रात "भगव्या" च राज्य येते आहे. हीच ती वेळ !!!," या ट्विट नंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

 


 'सरनाईक' यांनी काय म्हटलंय पत्रात ?


साहेब, आपण मुख्यमंत्री पदाला न्याय देत आहात, पण या परिस्थितीतही सत्तेत एकत्र राहून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आपलेच कार्यकर्ते फोडत असल्याचे राजकारण करत आहेत, त्यामुळे ते आपला पक्ष कमकुवत करत असेल तर या स्थितीत पुन्हा एकदा आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी जुळवून घेतलेले बरे, असे वैयक्तिक मत आहे. निदान यामुळे प्रताप सरनाईक, अनिल परब, रवींद्र वायकर या आपल्या सहकाऱ्यांना व त्यांच्या कुटुंबियांना होणारा नाहक त्रास तरी थांबेल अशी अनेक कार्यकर्त्यांची भावना आहे," राज्यात आपली युती तुटली असली तरी युतीच्या नेत्यांचे वैयक्तिक संबंध, जिव्हाळा अनेक नेत्यांमध्ये तसाच आहे. ते अजून तुटण्याआधी परत जुळवून घेतल्यास बरं होईल, भाजपशी जुळवून घेतल्यास त्याचा फायदा आमच्या सारख्या काही कार्यकर्त्यांना आणि शिवसेनेला भविष्यात होईल, असं सरनाईक यांनी आपल्या पत्रात म्हटलेलं आहे.


दरम्यान, आमदार प्रताप सरनाईक हे मागील काही महिन्यांपासून केंद्रीय यंत्रणांच्या तपासामुळे चर्चेत आहेत. त्यामुळे सरनाईक या तपासाला कंटाळून त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवले असेल अशीही चर्चा वर्तुळात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा