Breaking


सिंधुदुर्ग : आशा व गटप्रवर्तकांंचे जिल्हाभरात विविध ठिकाणी निदर्शने


सिंधुदुर्ग, दि. १७ : आशा व गटप्रवर्तकांंचे जिल्हाभरात विविध ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्हा आशा वर्कर्स युनियन (CITU संलग्न) च्या वतीने निदर्शने करण्यात आली.


आशा व गटप्रवर्तक यांच्या प्रलंबित न्याय मागण्यांसाठी १५ जूनपासून सुरू झालेल्या राज्यस्तरीय बेमुदत संपामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व आशा वर्कर्स व गटप्रवर्तक सहभागी झाले आहेत. आज आशानी आपली एकजूट दाखवत १५ जूनपेक्षा मोठ्या संख्येने निदर्शने आंदोलनात सामान्य जनतेलाही सहभागी करून घेतले. तसेच आज १७ जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात सुरू असलेल्या शेतकर्‍यांच्या व सर्वसामान्य जनतेच्या आंदोलनाला आपला पाठिंबा व्यक्त केला. सर्वसामान्य जनतेच्या मागण्यांचे फलकसुद्धा तयार करून निदर्शनात आशांनी घेऊन मागण्या मांडल्या.


सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज दिवसभर मुसळधार पाऊस असतानासुद्धा जिल्ह्यातील आशानी नागरिकांना सोबत घेऊन आपापल्या वाडी वस्तीवर, तसेच कार्यक्षेत्रातील ग्रामपंचायत कार्यालय, उपकेंद्र कार्यालय, प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यालय, अशा अनेक ठिकाणी एकत्र येत, आपल्या व जनतेच्या मागण्यांचे फलक हातात घेत निदर्शने आंदोलन केले. 

आजच्या आंदोलनामध्ये एकूण ४३ वेगवेगळ्या ठिकाणी बांदा, इळे, उंबर्डे, मळेवाड, कळसुली, निरवडे, साटेली, मसुरे, माणगाव, मोरगाव, वरवडे, सांगेली, आडेली इत्यादी पीएचसीतील आशानी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपली एकजूट दाखवून दिली. तसेच इतर पीएचसी मधील आशानी सुद्धा आपल्या कुटुंबियांसोबत छोट्या गटागटाने आंदोलनात सहभाग घेतला. सर्वच आशानी कोविड नियमांचे पालन करत आंदोलन केले. 
आंदोलन यशस्वी होण्यासाठी नम्रता वळंजू, अर्चना धुरी, कॉ. विजयाराणी पाटील व जिल्हा व तालुका कमिटीच्या सर्व सदस्यांनी प्रयत्न केले.

■ आंदोलनाच्या मागण्या पुढीलप्रमाणे : 

1. सार्वजनिक आरोग्य व्यवस्था मजबूत करा. 

2. आशा व गटप्रवर्तकाना आरोग्य कर्मचारी म्हणून केले पाहिजे.

3. आशाना १८, ००० रू. व गटप्रवर्तकाना २२, ००० रू. वेतन मिळाले पाहिजे. 


4. आशा व गटप्रवर्तकाना प्रतिदिन ३०० रू. कोविड भत्ता मिळाला पाहिजे.

5. आरोग्य कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यास 50 लाखाचा विमा कवच आहे, त्यामध्ये आशा व गटप्रवर्तक यांचा स्पष्ट उल्लेख करावा.

6. लॉकडाउन काळातील वीज बिल माफ झाले पाहिजे.

7. डिझेल पेट्रोल व गॅसचे दर कमी करा. 

8. शेतकऱ्यांना खते व बियाणे सवलतीच्या दराने पूरवा.


9. नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना पीकविमा संरक्षण द्या. 

10. वृद्ध, अपंग, निराधार, विधवा, परित्यक्ता यांना तीन हजार रुपये अनुदान द्या. 

11. सर्व नागरिकांचे कोवीड लसीकरण त्वरित पूर्ण करा. 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा