Breaking
सोबेराना क्युबा : लस संशोधनाचा क्यूबन पर्याय


क्युबा हा आपल्या भारताच्या एकूण क्षेत्रफळाच्या तुलनेत फक्त साडे तीन टक्के जमीन (109,884 वर्ग किमी) आणि फक्त 1.10 कोटी अशी दिल्ली इतकी लोकसंख्या असलेला कम्युनिस्ट देश आहे. हा देश आज कोरोनाच्या 5 लसी तयार करणाच्या मार्गावर आहे. ही पहिली क्यूबन आणि लॅटिन अमेरिकन लस आहे. एकाच वेळी 5 लसी विकसित करण्याच्या तयारीत असलेला हा जगातला एकमेव देश आहे. जगात सर्वात मोठी लोकसंख्या, क्षेत्रफळ, अर्थव्यवस्था व सैन्यशक्ती असलेल्या देशांना जे जमले नाही ते ह्या छोट्या देशाने साध्य केले आहे. स्वतःच्या लसी विकसित करून क्युबाने आपली सार्वजनिक आरोग्य व्यवस्था आणि बायोटेक क्षेत्रातली आपली शक्ती सर्वांना दाखवून दिली आहे. आज, क्युबा त्या काही निवडक विकसनशील देशांसोबत उभा आहे ज्याची स्वतःची लस तयार करण्याची आणि निर्यात करण्याची क्षमता आहे.


क्युबाने औषध निर्मिती किंवा किंवा अन्न विकत घेण्यासाठी वापरल्या जाणार्‍या पैशांमधला एकही पैसा कोविड लस तयार करण्यासाठी वळविण्यात आला नाही. इतर प्रकल्पांसाठी त्यांच्याकडे असलेली सर्व संसाधने सर्जनशील पद्धतीने या दिशेनं वळवण्यात आली. तिथल्या वैज्ञानिकांना फारच कमी गोष्टीत कामं करण्याची सवय आहे, ती यावेळी ही उपयोगी पडली. 

कोविड आणि क्युबा

मागच्या वर्षी कोविड आजार देशात आला तेव्हा क्युबाच्या 28,000 हून अधिक वैद्यकीय विद्यार्थ्यांनी सक्रिय स्क्रीनिंग प्रोग्राम आखून देशातल्या 90 लाख म्हणजेच जवळपास संपूर्ण लोकसंख्येपर्यन्त पोहोचले. देशाच्या सीमा बंद केल्या गेल्या आणि पृथक्करण केंद्रे आणि चाचणी आणि शोध काढण्याची एक प्रभावी प्रणाली स्थापित केली. देशाची जीडीपी 11 टक्क्यांनी घसरली. दरवर्षी येणारे 40 लाख पर्यटक रोडावून फक्त 80 हजार राहिले.  पण त्यामुळे अगोदरच कमकुवत असलेली आणि पर्यटनवर अवलंबून असलेली अर्थव्यवस्था गडगडली. अमेरिकेने घातलेल्या निर्बंधांमुळे आर्थिक उपाय योजना करता येणं शक्य नव्हतं. कोरोनाचा आजार या देशाला चांगलाच महागात पडला. बिकट आर्थिक परिस्थितिमुळेच बहुराष्ट्रीय औषधी कंपन्यांकडून कोविड लस खरेदी करणे किंवा जागतिक आरोग्य संघटनेच्या जागतिक कॉव्हॅक्स लस सामायिकरण उपक्रमासाठी साइन अप करणे त्याने निवडले नाही.

कोरोनाव्हायरशी झुंज देत असताना आणि देशभर अन्न व औषधांच्या गंभीर टंचाईला तोंड देत असलेल्या कम्युनिस्ट देश क्युबाने कोविडच्या लक्षणांवर उपचार करण्यासाठी तब्बल 13 विविध औषधे तयार केली. आता पाच कोरोनाव्हायरस लस तयार होण्याच्या प्रक्रियेत असल्याची घोषणा करत संपूर्ण जगाला एका प्रकारे धक्का दिला आहे. त्यापैकी दोन लसी अंतिम टप्प्यात आहेत. गेल्या महिन्यात, हवानाच्या फिन्ले इन्स्टिट्यूटच्या संशोधकांनी घोषित केले की त्यांची सोबेराना 2 लस अत्यंत प्रभावी आहे आणि ती क्लिनिकल चाचण्यांच्या अंतिम टप्प्यात प्रवेश करीत आहे. जर चाचण्या यशस्वी झाल्या तर क्युबा स्वतःचा कोरोनाव्हायरस लस विकसित करणारा एकमेव लॅटिन अमेरिकन देश बनेल. आंतर्राष्ट्रीय पर्यटनात मोठी घट झाल्याने भयंकर मंदीतून जात असेलेला या लसींमुळे आपल्या स्वत:च्या लोकसंख्येला या प्राणघातक आजारापासून तर वाचवणारच पण हयातून क्युबाला आपली अर्थव्यवस्था पुनरुज्जीवित करण्यास देखील मदत होईल. सोबेराना -२ यशस्वी झाल्यास, लसीकरणाचे राष्ट्रीय प्रयत्न संपल्यानंतर क्युबाने कमी किंमतीत ती निर्यात करण्याची योजना आखली आहे. ज्याने या देशाच्या अर्थव्यवस्थेत थोडीफार सुधारणा होऊ शकेल. 


लसींच्या नावात काय आहे?

क्युबाचं इतिहास आणि चिवटपणा या लसींच्या नावातही दिसून येतो. दोन लसींना ‘सोबेराना’ I व II असे नाव आहे.  तिसरी लस सोबेराना प्लस आहे. ह्या स्पॅनिश शब्दाचा अर्थ ‘सार्वभौमत्व’ असा होतो. पहिल्या सोबेराना चाचणीची घोषणा केल्यानंतर लोकांना हे नाव इतके आवडले की ते बदलणे अशक्य झाले. हा नाव क्युबामध्ये इतक्या अभिमानाने घेण्यात आलं की सरकारकडे लससाठी सोबेराना हा नाव ठेवण्याशिवाय पर्याय उरला नाही. क्युबाच्या क्रांतीचा नायक जोस मार्ती यांनी लिहिलेल्या काव्यानंतर आणखी एकाचे नाव ‘अब्दाला’ ठेवण्यात आले. स्पॅनिश वसाहतवादाविरूद्ध स्वातंत्र्यासाठी लढा दिलेल्या एका क्युबन क्रांतिकारकच्या नावावर पाचव्या लसचं नाव ‘मंबिसा’ असं आहे. अब्दाला व मंबिसा ह्या दोन्ही लसी नाकातून स्प्रेच्या माध्यमातून घ्यायच्या आहेत. सोबेराना 2 आणि अब्दाला चाचणीच्या तिसर्‍या व शेवटच्या टप्प्यात आहेत. गेल्या महिन्यात सोबेराना 2 साठी क्लिनिकल चाचण्यांचा अंतिम टप्पा सुरू झाला. या लसीच्या शेवटच्या चाचणीत 44,000 पेक्षा जास्त लोक भाग घेत आहेत. क्युबातील 1,24,000 आरोग्य सेवा कामगारांना यापूर्वीच अब्दाला लस देण्यात आली आहे. इराण आणि व्हेनेझुएलासह संबंधित देशांमध्येही या लसीची चाचण्या घेण्यात येत आहेत. 

सोबेराना २ आणि अब्दाला या दोन्ही लस पारंपारिक संयुग्मक लस आहेत, ज्याचा अर्थ असा होतो की कोरोनाव्हायरस स्पाइक प्रोटीनचा एक भाग कॅरिअर रेणूसह एकत्रित केला जातो ज्यामुळे कार्यक्षमता आणि स्थिरता दोन्हीला चालना मिळते. कोणत्याही विशेष रेफ्रिजरेशन आवश्यकतेशिवाय कित्येक आठवडे टिकून राहतील आणि 46.4 डिग्री तापमानापेक्षा जास्त काळ तापमानात दीर्घकाळ साठवले जाऊ शकण्याच्या दर्ज्यावर लक्ष दिले जात आहे. असं झालं तर हे कोल्ड स्टोरेज साखळी नसणार्‍या गरीब उष्ण कटिबंधीय देशांसाठी वरदान ठरेल. पाश्चिमात्य बहुराष्ट्रीय औषध कंपन्यांकडून लस खरेदी करण्यासाठी संघर्ष करणार्‍या विकसनशील देशांना हा व्यवहार्य पर्याय ठरू शकेल. क्युबाच्या आरोग्य व्यवस्थेवर पूर्ण विश्वास असल्याने काही देशांनी 10 कोटी डोस खरेदी करण्यासाठी सरकारकडे संपर्क साधला आहे. युनायटेड स्टेट्स आणि इतर पाश्चात्य देशांमध्ये निर्मीत लशी परवडणार्‍या नसल्याने अनेक गरीब देश आता क्यूबाकडे अधिक परवडणार्‍या लसींसाठी वळत आहेत. मेक्सिको आणि अर्जेंटिनाने क्युबाच्या लसमध्ये रस दर्शविला आहे. सध्या दरवर्षी 1 कोटी लस तयार करण्याची क्युबाची क्षमता आहे. म्हणून वाढत्या मागण्यांमुळे क्युबाच्या लस निर्मिती क्षेत्रालास संजीवनी मिळेल. व्हेनेझुएला आपल्या देशातच अब्दाला लस तयार करेल, असे सरकारने या महिन्याच्या सुरूवातीला जाहीर केले.
हे सध्या करणे क्युबासाठी किती अवघड आहे त्याची आपल्याला कल्पना देखील नाही. 

ऐतिहासिक क्युबन क्रांती :

एकेकाळी अमेरिकेसाठी अय्यशीचा आणि लूटीचा अड्डा बनलेल्या क्युबात अमेरिकेच्या हातातली बाहुली असलेल्या फुलजेनसिओ बटिस्टाच्या सैनिकी हुकूमशाहीची सत्ता होती. फिदेल कॅस्ट्रो आणि चे ग्वेरा या क्रांतिकारकांनी जुलै 1953 ते डिसेंबर 1958 या 5 वर्षांच्या दरम्यान ह्या हुकूमशाहीविरूद्ध सशस्त्र बंड करत अत्यंत प्रतिकूल आणि साधनहीन परिस्थितीत चिवट झुंझ आणि बलिदान देऊन बतिस्ताला हद्दपार केले. मार्क्सवाद – लेनिनवादाच्या क्रांतिकारक विचारसरणीने प्रभावित या क्रांतिकारकांनी आपल्या पक्षाला ऑक्टोबर 1965 मध्ये क्युबा कम्युनिस्ट पार्टी असे नाव दिले. तो भांडवलशाही अमेरिका आणि साम्यवादी रशिया दरम्यान शीतयुद्धाचा काळ होता. अमेरिकेच्या फ्लॉरिडा राज्यापासून क्युबा फक्त 165 किमीच्या अंतरावर म्हणजे मुंबई ते नाशिक इतक्याच अंतरावर आहे. शक्तिशाली अमेरिकेच्या नाकावर टिच्चून क्रांति झालेला क्युबा त्याच्या मर्मस्थानी बसलेली आजवर न भरून येणारी जखम बनली. 

क्युबा बर्बाद करण्यासाठी निर्बंध :

क्रांतीनंतर महाकाय अमेरिकेने या लहान गरीब देशावर प्रतिबंधांचे हत्यार उपसले. क्युबातले उसाचे मळे, कारखाने, शहरं यांच्यावर बॉम्ब हल्ले करण्यात आले. फिदेल कॅस्ट्रो आणि चे ग्वेरा यांची हत्या करण्यासाठी सीआयए ने जे काही शक्य होते ते सर्व काही केले. क्युबाविरूद्ध अमेरिकेने लावलेलं प्रतिबंध मागच्या 60 वर्षांच्या इतिहासात सर्वात दीर्घ काळापर्यंत लागू असलेला प्रतिबंध आहे. 

अमेरिकन व्यवसायिकांना व व्यवसायांना क्युबासह व्यापार करण्यास प्रतिबंधित लावले गेले. क्युबाला शस्त्रांच्या विक्रीवर बंदी घातली. ऑक्टोबर 1960मध्ये अमेरिकेने सरकारने क्युबाने गुडघे टेकावे म्हणून तिथे तेल निर्यात करण्यास नकार दिला, क्युबा सोव्हिएट रशियाच्या कच्च्या तेलावर अवलंबित झाला तेव्हा क्युबामधील अमेरिकन कंपन्यांनी तो कच्चा तेल परिष्कृत करण्यास नकार दिला. शेवटी क्यूबाने अमेरिकन-मालकीच्या क्यूबान ऑईल रिफायनरीजचे राष्ट्रीयकरण केले. याने चवताळलेल्या अमेरिकेने क्युबाच्या जवळपास सर्व निर्यातीवर बंदी घातली. अमेरिकेने क्यूबाबरोबर इतर देशांनी खाद्यपदार्थांचा व्यापार केल्यास त्यांना देण्यात येणारी आर्थिक मदत बंद करण्याची धमकी दिली आणि काही ठिकाणी अंमलातही आणली. संयुक्त राष्ट्र महासभेत या क्रूरतेवर टीका करण्यात आली. यूएसच्या कंपन्या किंवा अमेरिकन भागीदारी असलेल्या कंपन्यांना क्युबामध्ये व्यापार केल्यास ते त्यांनी निर्बंधांच्या जोखमीवर करावा असे जाहीर करण्यात आले. तथापि, सर्व आयातींसाठी क्युबाला रोख रक्कम देणे बंधनकारक करण्यात आले. पत किंवा कर्जाची त्यांना परवानगी नाही. दोषी व्यक्तींना 10 वर्षांच्या बंदिवासाची शिक्षा होऊ शकते. 1962 साली जॉन एफ. केनेडी यांच्या अध्यक्षीय काळात व्यापार निर्बंधांची व्याप्ती अजून कडक करण्यात आली. क्युबात बनलेल्या उत्पादनांवर बंदी होतीच पण आता ती वाढवून क्युबा बाहेर असेंबल किंवा एकत्रीकरण करून बनवण्यात आलेल्या सर्व क्युबन उत्पादनांवर तो निर्बंध वाढवण्यात आला. क्युबाला मदत पुरविणार्‍या कोणत्याही देशाच्या मदतीस प्रतिबंध करण्यात आले. कॅनेडीने अन्न आणि औषधांच्या विना-अनुदानित विक्री वगळता सर्व क्युबाच्या व्यापरांवर बंदी घातली गेली.  केनेडीने 1963 मध्ये प्रवासी निर्बंध घातले आणि अमेरिकेत क्युबाची मालमत्ता गोठविली गेली. क्युबात ये जा करणार्‍या प्रवाशांना विमानतळावर जगभर लागू विमान प्रवास तिकिट कर भरणे देखील या अमेरिकेने त्यांच्या कायद्याने गुन्हा ठरवल्याने क्युबाचे पर्यटन मोडकडीस आले. 

सोवियतच्या मदतीने तग धरलेल्या क्युबाला सोवियत रशिया कोसळल्याने मोठा धक्का पोहोचला. क्युबाची जीडीपी 34 टक्के घसरली आणि व्यापार निम्मे झाले. रशियासोबतचे आयात निर्यात 60 ते 75 टक्के घसरले आणि अर्थव्यवस्था भयंकर कोंडीत सापडली. या क्षणाची अतुरतेने वाट पाहत असलेल्या अमेरिकेच्या हाती तेव्हाही काही लागले नाही. फिडेल कॅस्ट्रो यांच्यावर क्युबन जनतेचा विश्वास निढळ राहिला. 1992 मध्ये क्युबामध्ये व्यवसाय करणार्‍या इतर देशांमधल्या परदेशी कंपन्यांना अमेरिकेत व्यवसाय करण्यापासून रोखून दंड आकारला जाऊ लागला. 1996 मध्ये या कायद्यात अजून कठोरला आणून क्युबा सोबत व्यापार करण्यार्‍या इतर देशांच्या कंपन्यांना अमेरिकेत बंदी घालण्यात आली. हा कायदा रद्द करणे उठवणे ओबामा यांनाही जमले नाही. हे निर्बंध सागरी वाहतुकीस देखील लागू होते, कारण क्युबा बंदरांवर थांबून आलेल्या जहाजांना अमेरिकन बंदरांवर सहा महिन्यांपर्यन्त गोदीत घेण्याची परवानगी नाही. ही साखळी 2000 सालीच थोडी सैल झाली जेव्हा ‘मानवतेच्या’ कारणास्तव क्युबाला शेतीमाल व औषध विक्रीस सीमित प्रमाणात परवानगी देण्यात आली. मात्र अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कारकीर्दीत 60 वर्षे क्युबाची सामग्री विक्री करणार्‍या कंपन्या घाबरल्या आणि उत्तर अमेरिकेबरोबरचा आपला व्यापार बंद पडण्याची भीती असल्याने क्युबासोबतचे व्यवसाय बंद केले. केवळ 2020 या एका वर्षातच  अमेरिकेने शोधून-शोधून क्युबावर 100 हून अधिक नवीन निर्बंध लादले गेले आहेत.


धडपड आणि प्राथमिकता :

अनेक दशकांपासून अमेरिकेने लावलेल्या निर्बंधांमुळे क्युबाच्या अर्थव्यवस्थेला अमाप हानी झाली. या कडक निर्बंधांमुळे क्युबाच्या आर्थिक विकासाला खीळ बसली. त्यातून मार्ग काढण्यासाठी कॅस्ट्रोने मजबूत सार्वजनिक शिक्षण व आरोग्य व्यवस्था तयार केली ज्यात खासगी संस्थांवर बंदी घातली गेली. शालेय व उच्च शिक्षण मोफत आणि अनिवार्य करण्यात आले. क्युबाच्या कम्युनिस्ट सरकारने ठामपणे सार्वत्रिक आरोग्य सेवा ही राज्य नियोजनाची प्राथमिकता म्हणून ठरवली आणि याचा विस्तार ग्रामीण भागांपर्यंत करण्यात आला. मोठ्या प्रमाणात राज्य-नियंत्रित नियोजित अर्थव्यवस्था व  समाजवादी तत्त्वांचे पालन करण्यात येते. उत्पादनाची बहुतेक साधने ही सरकारच्या मालकीची आणि सार्वजनिक संपत्ती म्हणून चालविली जातात आणि 75 टक्के रोजगार सार्वजनिक क्षेत्रात आहे. 

क्युबाचे माजी नेते फिदेल कॅस्ट्रो यांनी शिक्षण, आरोग्य क्षेत्र सरकारच्या हातात ठेवून ते सर्वांना मोफत उपलब्ध करून दिले. अमेरिकेच्या बंदीमुळे उद्भवलेल्या समस्यांतून मार्ग काढण्याच्या धडपडीतच क्युबात बायोटेक्नॉलजी वर लक्ष केन्द्रित करण्यात आले. देशात एक शक्तिशाली आरोग्य क्षेत्र निर्माण करून बहुतांश औषधे व लस निर्माण करू शकतील अश्या अत्याधुनिक जैवतंत्रज्ञान आणि इम्यूनोलॉजी क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली. क्युबाकडे पर्यायही नव्हता.  

क्रांतिनंतरच्या काळातली वैद्यकीय आव्हाने :
 
1959 साली क्रांति झाल्यानंतर सरकारच्या नवीन उपायांमध्ये प्रणालीच्या सर्व स्तरांकरिता एकात्मिक नियामक चौकट तैयार करण्यात आली. त्या वेळी, वैद्यकीय संगठना देशातील सर्वात शक्तिशाली संघटना होत्या.  राजकीय आणि आर्थिक या दोन्ही कारणांमुळे या क्षेत्राच्या मनाप्रमाणे कायदे बनत असत. बदल व क्रांतिकारी विचारांशी असहमत असल्याने आणि पूर्वीसारखा गडगंज नफा कमवता येणार नाही हे लक्ष्यात आल्याने आणि असुरक्षिततेच्या भीतीने ग्रस्त क्युबातले निम्मे उच्च प्रशिक्षित डॉक्टर्स हे देश सोडून चालले गेले. सरकारी नियमन नसल्याने तोपर्यंत परदेसी कंपन्या त्यांच्या उत्पादनांसाठी उंच किंमती निश्चित करण्यास स्वतंत्र होत्या. वैद्यकीय क्षेत्रातील प्रयोगशाळा, किरकोळ विक्रेते आणि त्यांच्याशी संबंधित वैद्यकीय कर्मचारी यांची साखळी या कामात अग्रेसर होती. पण क्रांतीनंतर सरकारकडून बंधने घातल्याने अनेक विदेशी कंपन्यांनी काढता पाय घेतला. अमेरिकेशी होत असलेल्या संघर्षामुळे बर्‍याच कंपन्या बंद पडल्या आणि पुरवठा संकट निर्माण झालं. क्रांतिपूर्वी अस्तित्वात असलेल्या 1929 मध्ये तयार कर्करोग संस्था, आणि 1937 मध्ये स्थापन ट्रॉपिकल मेडिसिन संस्था अश्या संशोधन संस्थांचे प्रमुख क्रांतिनंतर वैचारिक मतभेदांमुळे देश सोडून चालले गेले. 1959 ते 1967 पर्यंत, 60 लाख लोकसंख्येच्या क्युबातल्या 6300 डॉक्टर्सपैकी 3000 डॉक्टर्स देश सोडून चालले गेले. वैद्यकीय शिक्षणाची परिस्थिति इतकी केविलवाणी झाली की मागे उरले ते फक्त एक मेडिकल कॉलेज आणि एकूण 22 वैद्यकीय प्राध्यापक शाळा. एक अगदी लहान, तज्ञांचा गट उरलेला होता. त्यांनी, नवीन सरकारबद्दल सहानुभूती असलेले तरुण, अनुभवहीन प्राध्यापक तसेच शिकवण्यास आमंत्रित केलेल्या परदेशी तज्ञांनी क्युबामधील वैज्ञानिक अवकाश पुन्हा तयार करण्यास मदत केली. 


वैचारिक बांधिलकीतून आव्हान पेलण्यास सुरुवात :

1960 मध्ये शिक्षण व आरोग्य क्षेत्राचे राष्ट्रीयकरण झाले. क्रांति नंतर अमाप नफ्याचे केंद्र असलेले खाजगी दवाखाने आणि रुग्णालयांमध्ये सरकारने हस्तक्षेप करीत वैद्यकीय शिक्षण आणि त्याचे देशासाठीचे तत्वज्ञान बदलण्या सरकारने प्रोत्साहन दिले. सरकारने त्याचे पूर्ण लक्ष्य सार्वजनिक गुंतवणुकीतून सर्वसमावेशक प्राथमिक आरोग्य प्रणाली आणि डॉक्टरांना प्रशिक्षण देताना प्राधान्यक्रमाने प्रतिबंधक औषधांवर लक्ष केंद्रित केले गेले. वैद्यकीय पदवीधरांना ग्रामीण भागांमध्ये वैद्यकीय सुविधा व सेवा देण्यासाठी आणि खासगी प्रॅक्टिसमध्ये भाग न घेण्यासाठी त्यांच्या शिक्षण अभ्याक्रमातूनच प्रशिक्षित करण्यात आले. नवीन खाजगी दवाखाने उघडण्यास मनाई केली गेली आणि 1970 पर्यन्त जवळपास सर्व खाजगी रुग्णालये सार्वजनिक मालकीची करण्यात आली. सार्वत्रिक वैद्यकीय सुविधा पुरवण्यासाठी सहकारी तत्वावर दवाखाने व रुग्णालयांना परवानगी देण्यात आली. काहींनी खासगी क्लिनिकमध्ये जाण्याचा किंवा चांगल्या-कमाईच्या पदांवर जाण्याचा निर्णय घेतला, परंतु वैचारिक प्रशिक्षणामुळे बहुतेकांनी नागरी किंवा दुर्गम ग्रामीण भागात सेवा देण्याचे ठरविले.

त्या काळाच्या संदर्भात आणि वैचारिक संघर्षाच्या वातावरणामध्ये पाहिले गेले तर क्रांति ने भारावलेले अनेक जणांनी चांगले वेतन आणि अधिक आरामदायक जीवनाला तिलांजली देऊन उच्च आदर्शांसाठी हा मार्ग निवडला. याचं श्रेय अर्थातच शोषणमुक्त व समानतेवर आधारित साम्यवाद- समाजवादाच्या विचारधारेला यशस्वीपणे युवकांमध्ये पेरण्यात यशस्वी झालेल्या तरुण क्रांतीकारकांना द्यावे लागेल. म्हणूनच भौतिक श्रीमंती आणि प्रतिष्ठेला बाजूने सारून ते अंतर्भूत प्रेरणेने लोकांसाठी आपलं जीवन समर्पित करत होते. 

क्युबाने ज्ञान सामायिकरण आणि सहकार्याचे मुक्त वातावरण तयार केले. एका केंद्रीकृत, देशव्यापी प्रणालीच्या माध्यमातून आरोग्य क्षेत्रात वेळ आणि पैसा दोनही वाचविण्यात यश आले. ही ‘केंद्रीकृत’ पद्धत म्हणजे सर्वांना एकसारखी दर्जेदार आणि प्रमाणित वैद्यकीय सुविधा मिळवण्याचे नियोजन ज्यात सामुदायिक दवाखाने आणि रुग्णालये यांच्या ‘विकेंद्रीकृत’ नेटवर्कच्या माध्यमाने स्थानिक लोकांच्या वैद्यकीय गरजा भागविण्यात येत होत्या. 

याव्यतिरिक्त, प्राथमिक आरोग्य सेवेवर लक्ष केंद्रित केल्याने लोकसंख्येचे आरोग्य आणि रोगाच्या नमुन्यांविषयी समुदाय-आधारित माहिती संकलित आणि संश्लेषित केली जाऊ लागली. हा डेटा संग्रह पुढे जाऊन मोठ्या प्रकल्पांसाठी उपयोगी पडला. क्युबाची सर्वसमावेशक, एकात्मिक राष्ट्रीय वैद्यकीय रेकॉर्ड सिस्टम हे ठरवते की समाजात सर्वात मोठा आरोग्याचा धोका कोठे आहे, ज्यामुळे सरकार अधिक कार्यक्षमतेने संसाधनांचे वाटप करू शकते. या संरचनेमुळे औषधांचा खर्च देखील कमी कमी करता आला कारण क्लिनिकल चाचण्यांमध्ये माहिती-संमती नोंदणीला वेग मिळाला. यातून औषध आणि उपचारांच्या विकासाची एक पद्धत तयार होत गेली. सरकारने हेतुपुरस्सर प्रणालीची आखणी पुढील संस्थात्मक शिक्षण आणि सामाजिक कार्यक्षमता यासाठी केली.

यशाच्या कथेचा पाया रचला तो सरकारच्या नियोजनबद्ध इच्छाशक्ती ने. गंभीर आर्थिक परिस्थिति असूनही नागरिकांसाठी उच्च शिक्षण आणि वैज्ञानिक संशोधनाच्या बाजूने ती खंबीरपणे उभी राहीली. परिणामी देशाला नाविन्यपूर्ण, जागतिक-स्तरीय उत्पादनांबद्दलचे ज्ञान आत्मसात करण्याची आणि त्यावर संशोधन आणि सुधारणा करण्याचा उत्साह वाढत गेला. नव्या संस्था बांधण्यात आल्या. 1960 साली विज्ञानासाठी करण्यात आलेल्या अथक प्रयत्नांना 1980 पासून फळे लगायला सुरुवात झाली. वैज्ञानिक संशोधनाचे एकत्रीकरण सरकारच्या सार्वजनिक आरोग्य सेवा धोरणात करण्यात आले. 

क्युबाचे वेगळेपण या वस्तुस्थितीत आहे की मजबूत आर्थिक निर्बंधांना भीक न घालता धीटपणे त्याच्या सामना करणारा संपूर्ण राज्य-नियंत्रित अर्थव्यवस्थेसह (अगदी अलिकडेपर्यंत) कम्युनिस्ट-समाजवादी देश आहे. क्रांतिपूर्व काळी हा देश औषध व आरोग्य यंत्रणांसाठी ज्या प्रकारच्या व्यवस्थेवर अवलंबून होता त्यात परदेशी सहाय्यक कंपन्या 50% बाजारावर नियंत्रण ठेवत, आयातदार 20% आणि उर्वरित 30% स्थानिक उत्पादकांच्या हाती होते. क्रांतिकारक सरकारच्या या क्षेत्रात उतरण्यापूर्वी वैद्यकीय उत्पादनाचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात न्यूनगंडात होता. 60च्या दशकात सरकारने खासगी स्थानिक उत्पादकांचे अधिग्रहण केले आणि परदेशी उत्पादकांनी आयात कमी केले. 1970च्या दशकात अमेरिकेच्या निर्बंधावरील परिणाम कमी करण्यासाठी सरकारने फार्मास्युटिकल उत्पादन प्रकल्पात पहिली गुंतवणूक सुरू केली. सुरुवातीला, पश्चिम आणि पूर्व युरोप या दोन्ही देशांतून झालेल्या औषधांच्या खरेदीने हे प्रयत्न सुरू झाले आणि नंतर जैव तंत्रज्ञान आले.

क्यूबाच्या बायोफार्मा क्षेत्राची सुरुवात :

क्युबाचा बायोफार्मा उद्योग गेल्या चार दशकांत वेगाने विकसित झाला आहे. त्या कालावधीत त्याच्या विकासाचा मागोवा घेतल्यास क्युबा सरकार आणि बेटाच्या शास्त्रज्ञांची संसाधनात्मक समज आणि वैचारिक प्रतिबद्धता दिसून येते. 1965मध्ये जन्मलेली, सेंट्रो नासिओनाल डी इन्व्हेस्टिगेशन्स सिन्टिफॅन्स (सीएनआयसी) ही संस्था स्थापन झाली. क्युबामधील औषधी उद्योगातील अग्रगण्य लोकांनी त्यांचे पहिले वैज्ञानिक प्रशिक्षण सीएनआयसीमध्ये प्राप्त केले, यात बायोमेडिकल संशोधनात स्वत: ला समर्पित करण्याच्या सरकारच्या आवाहनाला या डॉक्टरांनी प्रतिसाद देत नफा न घेता काम करणार्‍या डॉक्टरांचा एक चमू ही होता. सीएनआयसीने केमिस्ट आणि भिन्न वैशिष्ट्यांचे अभियंते देखील सोबत घेतले. पदवीधर विद्यार्थी किंवा संशोधक असलेल्या या लोकांची आकर्षक मोबदला आणि प्रशिक्षण देण्याची मागणी नव्हती तर केवळ विज्ञानाची आवड असणारी आणि ही जबाबदारी पार पाडण्याच्या कौशल्यानुसारच सीएनआयसीमधील या लोकांची निवड करण्यात आली होती. त्या पहिल्या वर्षी प्रशिक्षण घेण्यासाठी केवळ 13 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. अशा एका शास्त्रज्ञाने प्रशिक्षणात प्रवेश घेण्यापूर्वी सहायक प्रोफेसर म्हणून 600 क्यूबन पेसोचे वेतन नाकारले आणि विज्ञानावरील प्रेम व निस्सीम भक्तीमुळे मायक्रोबायोलॉजी विभागात केवळ 200 पेसो काम करत होता. 

सीएनआयसी ही पदव्युत्तर शिक्षण संथा उच्च स्तरीय वैज्ञानिक तयार करण्यासाठी निर्मित करण्यात आलेली होती. याचे पहिल्या काही वर्षांचे मुख्य लक्ष्य तरुण वैद्यकीय पदवीधरांचे विज्ञान आणि गणिताचे ज्ञान वाढविणे आणि त्यांना संशोधन कार्यात प्रोत्साहित करणे होते. त्यासाठी सीएनआयसीने क्युबा आणि परदेशी प्राध्यापकांनी शिकवलेल्या अनेक अभ्यासक्रमांची सुरुवात तिथे केली. हे कोर्स केल्यानंतर, अनेक तरुण संशोधकांनी पाश्चात्य आणि पूर्व युरोपियन देशांमध्ये अभ्यास करण्यासाठी पदव्योत्तर शिष्यवृत्ती मिळवली. ज्यामुळे त्यांना त्यांच्या क्षेत्रातील आधुनिक संशोधनाची संधि मिळवता आली. पाश्चर इन्स्टिट्यूट, हार्वर्ड विद्यापीठ, हीडलबर्ग विद्यापीठ आणि ज्यूरिख विद्यापीठ यासारख्या संस्थामध्ये सीएनआयसीचे अनेक संशोधक दाखल झाले. विचारधारेवरील निष्ठा आणि देशप्रेम यामुळे यांनीच परदेशातल्या संधि नाकारून परत येऊन क्युबात अनुवांशिक अभियांत्रिकी तंत्रज्ञानाच्या अभ्यासाचा आणि संशोधनांचा पाया रचला. क्युबाच्या बायोटेक उद्योगाची सुरूवात खर्‍या अर्थाने तिथून झाली. 

1970-75च्या दरम्यान सीएनआयसी ही एक बहु-विभागीय संस्था रसायन आणि जैविक प्रयोगात्मक संशोधनाचे केंद्र बनली. क्युबाचे इतर वैज्ञानिक संस्थांची ही जननी बनली. उदाहरणार्थ, 1978च्या सुरुवातीच्या काळात सीएनआयसीच्या सूक्ष्मजीव आनुवंशिक विभागातील संशोधकांना जेनेटिक पुनर्सन्योजनाच्या फायद्यांची माहिती होती आणि ते आधीपासूनच सूक्ष्मजीवांच्या अनुवंशशास्त्रावर आणि आण्विक (मॉलिक्यूलर) जीवशास्त्रावर कार्य करीत होते. सोप्या भाषेत, यात पुनर्संचयनात (रिकोंबिंनेशन) विविध जीवांकडून आनुवंशिक सामग्रीचे मिश्रण (किंवा संयोजन) करून नवीन नवीन अनुवांशिक सामग्री (डीएनए रेणू) तयार करणे समाविष्ट आहे. 1986 मध्ये, यू.एस. आधारित बायोटेक्नॉलॉजी कंपनी चिरॉन यांनी अनुवांशिक अभियांत्रिकी (किंवा डीएनए रिकॉम्बिनंट) हेपेटायटीस बी लस मिळविण्यासाठी तंत्रज्ञान विकसित केले; त्याच वर्षी, क्यूबा रीकोम्बिनंट लस स्वस्त पद्धतीने विकसित केली गेली.

1966मध्ये सीएनआयसीमध्ये तयार केलेले एक छोटे परंतु प्रभावी न्यूरोफिजियोलॉजी युनिट 1990 मध्ये क्युबाचे न्यूरोसायन्स सेंटर बनले. या केंद्राने परिमाणात्मक पद्धतशीरपणे दोष किंवा समस्या ओळखण्यासाठी मेंदूच्या विद्युत क्रियाकलापांचे विश्लेषण करणारी एक चाचणी इलेक्ट्रोएन्सेफॅलोग्राम (क्यूईईजी) वापरण्यासाठी जगातील सर्वात पहिली सार्वजनिक आरोग्य प्रणाली बनविली. क्युबाच्या बायोफार्मा उद्योगास केंद्रबिंदू ठेवून 1990च्या दशकापासून सीएनआयसीने उत्पादनांचा विकास करण्यावर लक्ष केंद्रित करून एका कंपनीप्रमाणे काम करणे सुरू केले. ती संकल्पित भागीदारी, तंत्रज्ञान हस्तांतरण, परवाना आणि सह-विपणन करारांच्या स्वरूपात काम करू लागली. 

सायंटिफिक पोल, ज्याला वेस्ट हवाना बायोक्लस्टर म्हणून ओळखले जाते, ते अधिकृतपणे 1992 मध्ये तयार केले गेले. 1980च्या दशकात अमेरिकेच्या पहिल्या कर्करोगाच्या रुग्णालयाचे अध्यक्ष म्हणून काम करणारे ऑन्कोलॉजिस्ट रिचर्ड ली क्लार्क यांनी उत्तर अमेरिकन प्रतिनिधीसमवेत तेथे प्रवास केला आणि क्युबातील शास्त्रज्ञांनी इंटरफेरॉनवरील केलेले संशोधन पाहून थक्क झाले. त्यांनी त्याच्या भव्य संशोधनाविषयी चर्चा केली, कर्करोग बरा करण्याच्या लढाईत लवकरच क्लार्कने टेक्सास येथील ह्युस्टन येथील त्याच्या रुग्णालयात क्युबातील दोन शास्त्रज्ञांना बोलावून आपले संशोधन व कौशल्य सामायिक केले. क्युबाच्या संशोधकांनी मानवी पेशींपासून इंटरफेरॉन स्वतंत्रपणे वेगळं काढण्याच्या अभ्यास डॉ. कारी कॅन्टेल यांच्या हेलसिंकी स्थित प्रयोगशाळांमध्ये केला. तिथे ते मोठ्या प्रमाणावर इंटरफेरॉनचे पुनरुत्पादन कसे करावे हे शिकले. परत आल्यावर त्यांनी क्युबामध्ये इंटरफेरॉन तयार करण्यासाठी हवानाच्या एका छोट्या घरात खास प्रयोगशाळा स्थापन केली. त्या वर्षाच्या अखेरीस 1981 मध्ये ते यशस्वी झाले होते. अखेरीस, हे उत्पादन कर्करोगाविरूद्ध ‘वंडर ड्रग’ असल्याचे सिद्ध झाले नाही, परंतु त्याऐवजी डेंग्यू तापावर खूप फायदेशीर ठरले. 1980च्या दशकात क्युबात डेंगी आजाराने थैमान घातले होते. 

त्यानंतरच्या वर्षांमध्ये, सरकारच्या धोरणांमुळे 1981 मध्ये बायोलॉजिक फ्रंट आणि 1982 मध्ये सेंटर फॉर बायोलॉजिकल रिसर्च सारख्या नवीन आंतरशास्त्रीय कार्य गटांद्वारे चालविल्या जाणार्‍या अनेक लहान पायलट प्रकल्पांची सुरुवात करण्यात आली. जेव्हा संयुक्त राष्ट्र औद्योगिक विकास संघटना (UNIDO) ) विकसनशील देशांमध्ये बायोटेक्नॉलॉजीच्या हस्तांतरणासाठी उत्कृष्ट संस्थेची स्थापना करण्याचा निर्णय घेतला, क्यूबाने रिक्त स्थानासाठी अर्ज केला होता परंतु ती जागा भारताला मिळाली. पुढे जाण्याच्या ध्येयाने पछाडलेल्या क्यूबन सरकारने नंतर स्वत:च्या सीमित संसाधनांनी स्वत:ची संस्था तयार करण्याचा निर्णय घेतला.

1986 पर्यंत क्युबाने सीआयजीबी (सेन्ट्रो डी इंजेनिरिया जेनिटिका वा बायोटेक्नोलॉजी) चे उद्घाटन केले, जी आता देशातील सर्वात उल्लेखनीय बायोटेक्नॉलॉजी कंपन्यांपैकी एक आहे. त्यानंतर इतर महत्त्वाच्या संस्था सुरू झाल्या. यात एक म्हणजे इम्युनोसे सेंटर, जे 1987मध्ये निदान प्रणालींचे उत्पादन आणि व्यावसायीकरण करण्यासाठी बनवले गेले. फिनले इन्स्टिट्यूट 1991मध्ये अधिकृतपणे सुरू झाले आणि 1994मध्ये सेंटर फॉर मॉलिक्यूलर इम्युनोलॉजी यापैकी बर्‍याच संस्थांनी क्युबाला कोट्यवधी डॉलर्स किंमतीचे बायोफार्मास्युटिकल उत्पादने विकसित करण्यात व विकण्यास मदत केली.

विशिष्ट औषधांच्या यशामुळे उत्साहित झालेल्या क्युबाने बायोटेक क्षेत्रात अजून प्रगती करत बर्‍याच नवीन औषधे आणि लस तयार केल्या आहेत. या लेखात पूर्वी उल्लेखलेल्या फुफ्फुसाचा कर्करोग आणि एचआयबी लसांच्या व्यतिरीक्त, उसापासून तयार झालेले पॉलिकोसॅनॉल (पीपीजी) हे औषध देखील तयार केले आहे जे अथेरोस्क्लेरोटिक हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगामुळे होणारे अनेक विकार मृत्यु कमी करते. सीएनआयसीने हे उत्पादन विकसित केले होते, 1996 मध्ये या संशोधनाला जागतिक बौद्धिक संपदा संघटनेने (डब्ल्यूआयपीओ) सुवर्णपदक दिले. मधुमेहावरील पायांच्या समस्येवर उपचार करण्यासाठी सेंटर फॉर जेनेटिक इंजिनिअरिंग एंड बायोटेक्नॉलॉजी (सीआयजीबी) द्वारा विकसित हेबरप्रॉट-पी याला देखील पुढे सुवर्ण पदक मिळाले. 2011मध्ये आंतरराष्ट्रीय शोध मेळ्यात बेस्ट यंग आविष्कारक व्हीआयपीओ सुवर्णपदक या औषधाला देण्यात आले. 

बर्‍याचदा क्युबामधील औषध संशोधनाला ते पात्र आहेत तितकी प्रसिद्धी मिळाली नाही. याचा सर्वात मोठा उदाहरण क्यूबाचा मेंदूत होणार्‍या घटक मेनिंजाइटिस आजाराला करणीभूत असलेल्या मेनिंजोकोकस बॅक्टीरिया विरुद्ध बनवण्यात आलेली सीरोग्रुप व्हीए-मेंगोक-बीसी®, ही जगातील पहिली उपलब्ध लस होती. लस निर्मिती करणार्‍या फिनले इन्स्टिट्यूटने विकसित केलेल्या या उत्पादनास 1989मध्ये डब्ल्यूआयपीओचे सुवर्णपदक देण्यात आले होते. तरीही या लसीकडे महाकाय फार्मास्युटिकल कंपनी स्मिथक्लिन बीचम (आता गॅलॅक्सोस्मिथक्लिनचा भाग) यांचे लक्ष जाई पर्यन्त आंतर्राष्ट्रीय माध्यमांचे लक्ष वेधले गेले नव्हते. बर्‍याच वर्षांनंतर, स्विस औषध निर्माता नोवार्टिसला चुकीच्या मार्गाने मेनिन्जायटीस बी विरुद्ध लढा देण्यासाठी आपल्या प्रकारची पहिली लस विकसित करण्याचे श्रेय दिले गेले. परंतु त्याच्या 24 वर्षांपूर्वीच क्यूबात ही लस मोठ्याप्रमाणात प्रयोगात येत होती. 

2005मध्ये हवाना विद्यापीठाच्या रसायनशास्त्राच्या विद्याशाखेशी संबंधित एक छोटी प्रयोगशाळा, सिंथेटिक अँटीजेन्स या प्रयोगशाळेला हिमोफिलस इन्फ्लूएंझा प्रकार बी (किंवा एचआयबी) विरोधात जगातील पहिला कृत्रिम लस (क्विमी-हिब) विकसित करण्यासाठी जागतिक बौद्धिक संपदा संघटनेचा (डब्ल्यूआयपीओ) सुवर्ण पदक पुरस्कार मिळाला. अलीकडेच, फुफ्फुसांच्या कर्करोगासाठी सीआयएमएव्हॅक्स-ईजीएफ या लसीची अमेरिकेतच क्लिनिकल चाचण्या करण्यासाठी अमेरिकेच्या औषध नियामकांची परवानगी मिळविणारी पहिली क्यूबाची बायोफार्मास्युटिकल उत्पादन आहे. मॉलिक्यूलर प्रतिरक्षाविज्ञान केंद्राद्वारे हे उत्पादन विकसित केले गेले होते, जे प्रतिपिंडे, कर्करोगाची औषधे आणि इतर क्षेत्रात विशेषज्ञ आहेत.


क्युबाने विकसित केलेली काही महत्वाची औषधे :

1. लहान मुलांमधील मेनिंजायटीस रोखण्यासाठी क्युबाने 1989 मध्ये ही लस विकसित केली आणि त्यांची नोंदणी केली. अमेरिकेने आपले शत्रुत्व राखत पेटेन्टची कालावधी संपल्यानंतर जेव्हा 2014 मध्ये फाईझरने ही लस बनवली तेव्हा युनायटेड स्टेट्स फूड अ‍ॅण्ड ड्रग एडमिनिस्ट्रेशनने (एफडीए) या अपवादात्मक औषधी उत्पादनाची नोंदणी केली. 

2. क्युबाच्या मॉलिक्यूलर इम्युनोलॉजीसाठी सेंटरने CimaVax-EGF ही लस क्युबात 1994 मधेच शोधण्यात आली होती. नॉन-स्मॉल सेल फुफ्फुसाच्या कर्करोगाचा (एनएससीएलसी) उपचार करण्याच्या उद्देशाने झालेल्या तपासणी अभ्यासात एनएससीएलसीच्या रुग्णांच्या जगण्यात लक्षणीय वाढ झाल्याचे आढळले. मात्र उत्पादनाच्या वीस वर्षांपेक्षा जास्त काळ गेल्यानंतर  न्यूयॉर्कमधील बफेलो येथील रोझवेल पार्क कर्करोग संस्थेने एनएससीएलसी पीडित रूग्णांच्या उपचारासाठी या लसीची कार्यक्षमता आणि सुरक्षितता तपासण्यासाठी क्लिनिकल चाचणी सुरू करण्याचा निर्णय घेतला.

3. व्हिटिलिगो ह्या आजारात त्वचा आपले रंगद्रव्य पेशी (मेलानोसाइट्स) गमावते. यामुळे त्वचा, केस आणि श्लेष्मल त्वचेसह शरीराच्या वेगवेगळ्या भागात पांढर्‍या रंगाचे मोठे ठिपके येऊ शकतात किंवा  पॅचेसमध्ये त्वचेचा रंग कमी होतो. क्युबात या रोगावर ‘मेलाजेनिना प्लस’ हा औषध मानवी नाळ (प्लासेंटा) पासून एक अल्कोहोल अर्क आधारित लोशन तयार केला. ते लावल्याने त्वचेच्या पांढर्‍या ठिपक्यांच्या भागात मेलानोसाइट्स उत्तेजित करून पुन्हा पूर्वीसारखा कातडीचा रंग मिळवता येतो. 20 वर्षांहून अधिक काळ जगभरात उपलब्ध या औषधाला ‘चमत्कारी’ त्वचारोग औषध म्हटले गेले.  

4. आईपासून मुलांमध्ये पसरणार्‍या एचआयव्ही आणि सिफलिसला थांबवणारा क्युबा हा डब्ल्यूएचओद्वारे मान्यता प्राप्त जगातील पहिला देश होता. तो पर्यन्त या करणाने हजारो मुलांचे जीव जायचे. 

5. ‘हेबरफेरॉन’ हवानाच्या सीआयजीबी (सेंटर फॉर अनुवांशिक अभियांत्रिकी आणि जैव तंत्रज्ञान) मध्ये हे औषध विकसित केले गेले. हे दोन इंटरफेरॉनचे संयोजन आहे. त्याच्या जटिल प्रक्रियेचा परिणाम म्हणजे ट्यूमर वाढ विशेषत: बेसल सेल कार्सिनोमा (सीबीसी) त्याचे आकार, स्थान आणि उपप्रकार काहीही असो थांबवली जाते. नाही. बहुतेक त्वचेच्या कर्करोगांमद्धे हे  कार्यक्षम ठरलं. 

6. ‘हेबरप्रॉट- पी’ हा इंजेक्शन 2006 साली क्युबाने शोधला. त्यानंतर आतापर्यंत 15 आणखी देशांनी त्याची नोंद केली आणि त्याहूनही अधिक जगभरातील लाखो रुग्णांनी उपचार घेतला आहे. मधुमेहाचे तीव्र अल्सर असलेल्या रूग्ण जे उपचारांच्या इतर स्वरुपाला दाद देत नाहीत आणि ज्यांना मोठ्या शस्त्रक्रियेचा धोका आहे त्यांच्यावर हेबरप्रॉट-पी हा एपिडर्मल ग्रोथ फॅक्टर (ईजीएफ) आहे आणि तो इंजेक्शनद्वारे दिला जातो.

7. 2009 साली शोधण्यात आलेली निमोटोझुमाब ही एक उत्कृष्ट अ‍ॅड-ऑन थेरपी आहे. डोके आणि मान (एससीएचएन) च्या स्क्वॅमस सेल कार्सिनोमाचे निदान झालेल्या रूग्णांना रेडिओथेरपी समवेत निमोटोझुमाबने दिल्याने केवळ रेडिओथेरपी घेतलेल्या रूग्णांच्या गटाच्या तुलनेत जगण्याचा दर तिप्पट वाढला हे स्पष्टपणे दिसून आले. 

8. सुमारे 80% ते 85% फुफ्फुसांचा कर्करोग नॉन-स्मॉल सेल फुफ्फुसांचा कर्करोग (एनएससीएलसी) आहे. 2013 साली शोधण्यात आलेल्या ‘रेकटोमोमाब’ने शेवटच्या टप्प्यावर असलेल्या एनएससीएलसी ग्रस्त रूग्णांच्या जगण्यात लक्षणीय वाढ दर्शविली. लॅटिन अमेरिकेत हे औषध मोठ्या प्रमाणात वापरले जाते. या बाबतीत अमेरिका अजूनही मागे आहे. 

रोजची आव्हाने कमी नाहीत :

क्यूबन बायोफार्मास्युटिकल उद्योगाच्या निर्यातीला दुप्पट करणे म्हणजे पाच वर्षांत दर वर्षी 1 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त गाठणे हे त्याचे स्पष्ट आणि अवघड लक्ष्य आहे. हे अमेरिकेने लादलेल्या आर्थिक निर्बंधांच्या दाबवांमुळे गुंतवणूकदार आणि संभाव्य खरेदीदार न घेतल्याने गाठणे सध्यातरी अशक्य दिसते.  

परंतु कच्चा माल मिळविणे हा एक सतत संघर्ष आहे, विशेषत: डोनाल्ड ट्रम्प यांच्या अध्यक्षतेखाली अमेरिकन निर्बंध कठोर झाल्यानंतर हे अशक्यप्राप्य बनत गेले. क्युबावरील अमेरिकेच्या बंदीमुळे बेट आयात करता येणारी वैद्यकीय उपकरणे निर्बंधित आहेत. लसींवर काम करणार्‍या क्युबाच्या वेगवेगळ्या संशोधन पथकांमध्ये फक्त एक स्पेक्ट्रोमीटर आहे जे गुणवत्ता नियंत्रण आणि लसीच्या रासायनिक संरचनेचे विश्लेषण करण्यासाठी महत्वाचे असते. स्पेक्ट्रोमीटरची ब्रिटीश निर्माता मायक्रोमास ही अमेरिकन कंपनी, वॉटरस यांनी विकत घेतल्यामुळे क्युबाला आता सुटे भाग देखील खरेदी करता येत नाही आहे. अनेक दशकांपासून पुरवठा करणार्‍या निवडक पुरवठेदारांना बंदी घातली गेली. जवळच्या अमेरिकेसारख्या शेजारच्या देशाऐवजी सुदूर चीनपासून वैद्यकीय उपकरणे मागवावी लागतात. त्यामुळे पुरवठा खूप महाग आणि गुंतगुतीचा झाला आहे.

क्युबाच्या डॉक्टरांना इतर देशांच्या तुलनेत फार कमी वेतन आहे. त्यांना दुसर्‍या देशाच्या डॉक्टरांच्या तुलनेत फार कमी म्हणजे 52 पाउंड अर्थात फक्त 5400 रुपये एवढाच वेतन मिळतो. याव्यतिरिक्त ते अद्ययावत डायग्नोस्टिक तंत्रज्ञानाच्या शिवायच काम करतात. काहीवेळा वीज किंवा पुरेश्या पाण्याशिवायही कामे करावी लागतात. रुग्णालयांमध्ये मूलभूत उपकरणे येण्यासाठी अनेक आठवडे थांबावे लागते. कर्मचारी खूपच चांगले प्रशिक्षित असूनही पायाभूत सुविधा, मशीन्स आणि उपकरणे नसल्याने त्यांच्या प्रतिभेचा वापर होत नव्हता. कधीकधी पॅरासिटामोल आणि इतर मलमपट्टी सारख्या मूलभूत औषधांचा नियमित स्टॉक नसतो. तरीही केवळ आदर्शवादी समाजवादी विचारांच्या जोरावर सर्व अडथळ्यांना आणि आव्हानांना तोंड देण्याची शक्ती मिळवत ते स्तुतीस पात्र अशी सेवा देण्यासाठी ते झटत असतात. जेनेटिक अभियांत्रिकी व जैव तंत्रज्ञान केंद्राच्या दोन लसांच्या विकासाचे प्रमुख असलेले डॉ. गेरार्डो गिलन यांचा पगार 200 पाउंड म्हणजे भारतीय रुपयांमध्ये मात्र 20,718 रुपये एवढाच आहे.त्यांच्या कुवती प्रतिभाशाली माणसाला इतर विकसित देशात यापेक्षा 100 पट आधिक पगाराची ऑफर असूनही आपल्या देशाच्या उन्नतीसाठी ते झटत आहेत. त्यांच्या शब्दांत “आम्हाला आपल्या देशाच्या विकासासाठी वचनबद्धता वाटते. आम्ही काही सीईओ लोकांना अश्लिलपणे श्रीमंत बनवण्यासाठी नव्हे तर लोकांना आरोग्यदायी बनविण्यासाठी काम करीत आहोत.” 

क्युबाच्या अनेक क्षेत्रातल्या अयशस्वितेचे क्यूबन बायोफार्मा अपवाद आहे. प्रादेशिक आणि जागतिक क्रमवारीत क्युबाची एकूण अर्थव्यवस्था मागे आहे. शीतयुद्धाच्या काळात क्युबाचा मुख्य व्यापारिक सोव्हिएत युनियन कोसळल्यामुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटाच्या नंतर क्युबामधील बर्‍याच क्षेत्रांमध्ये आंतरराष्ट्रीय स्पर्धात्मकतेच्या दृष्टीने फारच पुढे जाणे आहे.

बायोफार्माचे यश आणि फायदे :

आज 30 हून अधिक संशोधन संस्था आणि उत्पादक आहेत, जे राज्य-संचालित समूह बायोकुबा फार्माच्या अधीन काम करतात. मर्यादित स्त्रोत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये प्रवेश असूनही या लहान बेटाच्या देशाने विकसित केलेली अत्याधुनिक यंत्रणा जवळपास 1200 आंतरराष्ट्रीय पेटंट्स असून 50 पेक्षा जास्त देशांमध्ये औषध आणि उपकरणे विकतो. हा उद्योग संपूर्णपणे सार्वजनिक अर्थसहाय्य आणि व्यवस्थापित केला जातो आणि जगातील सर्वात कार्यक्षम सार्वजनिक आरोग्य सेवा प्रणालीचा हा एक मुख्य घटक आहे. सर्व लोकांच्या आरोग्याच्या सेवेसाठी धोरणात्मक महत्त्व असलेली औषधे विकसित करणे हे त्याचे लक्ष्य आहे.

क्युबामध्ये मलेरिया, पोलिओ, टिटॅनस आणि गोवर निर्मूलन झाले आहे. कोविडशी ही हा देश यशस्वीपणे लढा देत आहे त्याचे कारण मुख्यत्वे वर्षानुवर्षे प्राथमिक काळजी आणि लोकसंख्येच्या आरोग्याकडे लक्ष देण्याच्या गुंतवणूकीत आहे. 1980च्या उत्तरार्धात, क्युबाने जगातील पहिले मेनेंजाइटिस आजारची लस विकसित केली. पुढे जाऊन देशात नियमितपणे वापरल्या जाणा दहा लसींपैकी आठ तयार इथेच निर्मित होऊ लागल्या आणि कोट्यावधी डोज परदेशात निर्यात होऊ लागल्या. औषधे आयात करावी लागली नाहीत म्हणून 2014 आणि 2016 साली अनुक्रमे 1.193 बिलियन डॉलर्स आणि 1.940 बिलियन डॉलर्स या देशाने वाचवले. 

1980-90च्या दशकात या क्षेत्राचा विकास करण्यासाठी सुमारे 1 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याचा धाडसी निर्णय घेणार्‍या क्युबासाठी हे जगाने ‘बिलियन डॉलर बायोटेक जुगार’ मानले. आज हा सर्वात यशस्वी क्यूबन आर अँड डी प्रोग्राम बनला आहे, जो इतर देशांसाठी एक मॉडेल म्हणून पहिला जात आहे. आजच्या क्युबाच्या बायोटेक उद्योगातील सिंहाचा वाटा बायोकुबा फार्मामध्ये केंद्रित आहे, जो 2012मध्ये सरकारच्या आर्थिक सुधारणांसह निर्मित एक विशाल होल्डिंग आहे ज्यामध्ये 33 कंपन्यांचा समावेश आहे ज्या 21,600 पेक्षा जास्त कामगार काम करतात. त्यापैकी शेकडो अत्यंत कुशल-व्यावसायिक अनेक संशोधन-उत्पादन उपक्रमांत खोलवर रुजले आहेत. 2014 पासून विशेष वेतन वाढी करण्यात आल्या, ज्याचा फायदा चा परिणाम झाला आहे, याचा फायदा साडे चार लाख आरोग्य कर्मचार्‍यांना झाला आहे. बहुतांश लोकांचा पगार दुप्पट झाला आहे. बिझिनेस मॉनिटर इंटरनॅशनल (बीएमआय) रिसर्चच्या अंदाजानुसार 2015मध्ये 86 मिलियन डॉलर्सचे व्यवसाय 2020 पर्यन्त 119 मिलियन डॉलर्स एवढे वाढले. या क्षेत्रात अग्रगण्य राष्ट्रांच्या कामगिरीच्या तुलनेत हे निश्चितच सकारात्मक परिणाम आहेत. 

क्यूबन बायोफार्मा उद्योगाच्या यशस्वीतेचा अंदाज आपण या एका गोष्टी वरुन घेऊ शकतो की देशात वापरल्या गेलेल्या 60% पेक्षा जास्त औषधी त्या देशातच निर्मित केल्या जातात. 1995 पासून हा क्षेत्र निर्यात करून इतक्या नफ्यात राहिला आहे की त्यातून देशाच्या सार्वजनिक आरोग्य यंत्रणेत चालविलेल्या बर्‍याच कार्यक्रमांना वित्तपुरवठा करण्यास मदत मिळाली आहे. वैद्यकीय उत्पादनांची खरेदी परवडण्यामागील हे मुख्य कारण आहे. 
क्युबाच्या बायोफार्मा उद्योगाच्या दर्जेदारपणाला आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक समुदायाने मान्यता द्यायला सुरुवात केली आहे.

बायोफार्मास्युटिकल उद्योगाच्या यशोगाथे मागचे कारण :

क्युबा सारख्या गरीब, विकसनशील देशात रोखीवर चालवणारा, उच्च-तंत्रज्ञान आधारित आणि मालमत्ता हक्क, मालकी, स्पर्धा, नियमन, कॉर्पोरेट गव्हर्नन्सवर चालणारा फार्मा उद्योग यशस्वीरित्या कसा विकसित झाला हे समजणे अर्थशास्त्र आणि आर्थिक विकासाच्या पारंपारिक आख्यानांवर अवलंबून राहून शक्य नाही. बर्‍याचदा, उदारीकरण आणि खाजगीकरण हे अनिवार्य आणि नैसर्गिक पूर्वस्थिती म्हणून सादर केले जाते आणि त्या चौकटीबाहेर विश्लेषणे केली जात नाहीत. म्हणून क्युबन यशाची कहाणी महत्वाची आणि वेगळी ठरते. क्युबन जैव तंत्रज्ञान क्षेत्राच्या विश्लेषणामधून जे काही समोर येत आहे तो सर्वथा अपरिचित आहे. क्यूबन उद्योगाची योग्यरित्या तपासणी करताना, अशा अनेक सामर्थ्यवान कथा सापडतीळ ज्या मालमत्तेच्या हक्कावर आणि संशोधकांना परतावा देण्यात आल्याच पण नाविन्यपूर्णतेच्या जगभरातील बहुतेक पारंपारिक अभ्यासाच्या एकसारख्या समान स्वरूपाला आव्हान देतात. क्यूबान बायोटेक उद्योग निःसंशयपणे त्या देशाच्या आर्थिक इतिहासातील विज्ञान आणि तंत्रज्ञान धोरणाच्या सर्वात यशस्वी प्रकरणांचे प्रतिनिधित्व करतो.

क्युबाच्या आरोग्य सेवा प्रणालीची विशिष्ट अद्वितीय रचना, मोफत शिक्षण, संशोधन आणि नवकल्पना या देशातील सार्वजनिक गुंतवणूक या सर्व बायोफार्मास्युटिकल उद्योगाच्या यशोगाथे मागचे सर्वात महत्त्वपूर्ण घटक आहेत. एखाद्या संस्थेची देशाच्या जडण घडण करण्यात जी ऐतिहासिक भूमिका असू शकते त्याचं क्युबन मॉडेल एक उदाहरण आहे. संपूर्ण लोकसंख्येच्या वैद्यकीय गरजा भागविण्यासाठी डिझाइन केलेली ही देशातील सार्वजनिक आरोग्य सेवा प्रणाली क्युबाच्या बायोफार्मास्युटिकल उद्योगाच्या यशासाठी आवश्यक आहे. बायोफार्मा उद्योगाचा विकासच आर्थिक गरज आणि क्युबाच्या सार्वजनिक सेवेच्या मूल्यांसाठी परवडणारी औषधे म्हणून करण्यात आले आहे. प्रतिबंधांचा मुकाबला करण्यासाठी क्युबाच्या वैद्यकीय तत्त्वज्ञानानुसार हा गरीब देशासाठी परवडणारी सार्वत्रिक आरोग्य सेवा उपलब्ध करुन देण्याचा एकमेव व्यवहार्य मार्ग होता ज्यानुसार सार्वजनिक आरोग्य सेवा प्रणालीच्या गरजेनुसार कमी किमतीची, उच्च-गुणवत्तेची उत्पादने तयार केली जातात. आज क्युबा वैद्यकीय उत्पादनांचा, विशेषत: बायोफार्मास्युटिकल्सचा यशस्वी निर्यातदार बनला आहे.

क्युबन आरोग्य व्यवस्थेचे कीर्तिमान :

घोषित स्वरुपात नास्तिक आणि धर्मनिरपेक्ष असलेल्या क्यूबात 45 टक्के नागरिक हे निधर्मीय म्हणजे कोणत्याही धर्माला मानणारे नाहीत. क्युबाचा साक्षरता दर 99.8 टक्के आहे जो जगात सर्वाधिक असलेल्या देशांपैकी एक आहे. सरकार आरोग्यासाठी दरवर्षी प्रतीव्यक्ती सरासरी 30 हजार खर्च करते. बालमृत्यू दर दर हजार जन्मांमधे 4.2 आहे. पुरुषांचा सरासरी आयुर्मान 77 वर्षे आणि स्त्रियांचा 83 वर्षे आहे. 

क्यूबाचे डॉक्टर होणे हे पैशांसाठी नव्हे तर इतरांना मदत करण्याची गरज म्हणून आहे हे वैद्यकीय महाविद्यालयात शिकवल्या जाणार्‍या पहिल्या गोष्टींपैकी एक असते. डॉक्टर रुग्ण प्रमाण प्रती 150 लोकांवर 1 असा आहे. जो जगातल्या सर्व विकसित देशांना मागे टाकणारा आहे. यूकेचे प्रमाण प्रति 10 हजार रुग्णांवर 2.8 एवढाच आहे. रोगाचा प्रादुर्भाव कमी अधिक प्रमाणात त्वरित आढळू शकतो म्हणून ‘केअर’ नामक सार्वत्रिक व मोफत कार्यक्रमांतर्गत रूग्णांचे चार प्रकार केले जातात: वरवर पाहता निरोगी, रोगाचा धोका, रोगग्रस्त आणि पुनर्वसन झालेला किंवा बारा झालेला. ज्यांचे वजन जास्त आहे, मधुमेह आहे किंवा उच्च रक्तदाब आहे अश्यांचा ज्या रोगाचा धोका आहे त्याच्या रोकथम वर काम केले जाते. डॉक्टरांना ते ज्या लोकांमध्ये काम करत आहेत त्यांच्या आर्थिक सामाजिक संरचनेची आकडेसकट पूर्ण माहिती असते. देशामध्ये सार्वत्रिक मोफत आरोग्य सेवा आहे आणि जगातील रुग्णांच्या प्रमाणात उच्चतम अनुपतात डॉक्टर्स आहेत. तिथे प्रत्येक नागरिकाची वार्षिक नियमित तपासणी केली जाते आणि जर तो व्यक्ति रुग्णालयात गेला नाही तर त्याला शोधत डॉक्टरच त्याच्या घरी येतात. व्यवहारीकपणे समस्या ओळखून त्याच्या प्रतिबंधावर अधिक जोर दिला जात आहे. 

क्युबाच्या हेनरी रीव्ह ब्रिगेडची स्थापना 2005मध्ये करण्यात आली होती. त्यांनी आपत्ती व साथीच्या आजारांचा सामना करण्यासाठी जगभरातील आरोग्यसेवा व्यावसायिकांच्या केडर पाठवल्या आहेत. 2010च्या भूकंपानंतर कॉलराचा प्रादुर्भाव सुरू असताना क्युबियाचे डॉक्टर हैतीमध्ये बचाव कामात होते; 2013-16मधील इबोला संकटाच्या वेळी ते पश्चिम आफ्रिकेत दाखल झाले. आणि जेव्हा कोविड19 युरोपमध्ये पसरला तेव्हा दोन हेनरी रीव्ह टीम इटलीमध्ये दाखल झाल्या आणि डॉक्टररांची कमतरता कमी करण्यात हातभार लावला. एप्रिल, 2020 च्या अखेरीस 1000 पेक्षा अधिक क्युबाचे आरोग्य सेवा कामगार कोविड19चा मुकाबला करण्यासाठी जगभरातील अनेक देशांमध्ये मदत करीत होते. वैद्यकीय मिशन किंवा मेडिकल टुरिझम मधून येणारा नफा सार्वजनिक उपक्रमात वापरला जातो. 

कोणता मॉडेल योग्य :

जगभरात जैवतंत्रज्ञान क्षेत्र वित्तकेंद्रित मॉडेल आधारे विकसित करण्यात आला आहे तर त्या उलट क्युबात ही 100% सरकारी गुंतवणूकीवर उभी आहे. परंतु व्यावसायिक दृष्टीच्या पलीकडे जाऊन विचार केल्यास जगभरात  बायोफार्मास्युटिकल उद्योगात, बहुतेक देशात सरकारी गुंतवणूकीने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. अमेरिकन बायोटेकच्या निर्मितीस अमेरिकन सरकारच्या राष्ट्रीय आरोग्य संस्था (एनआयएच), किंवा जर्मन फेडरल ऑफ एज्युकेशन अँड रिसर्च मंत्रालयासारखी बरीच उदाहरणे भेटतील. त्यामुळे क्यूबन सरकारची जैव तंत्रज्ञान क्षेत्रात गुंतवणूक किंवा सहभाग हा अगदी असामान्य म्हणता येणार नाही. 

नेचर या मासिकाने 2009च्या संपादकीय मध्ये लिहिले ‘क्युबाने जगातील सर्वात स्थापित बायोटेक्नॉलॉजी उद्योगाचा विकास केला केला आहे, जो श्रीमंत देशांना पूर्वअट वाटणार्‍या उद्यम-भांडवलाच्या निधीचे मॉडेल पेक्षा वेगळं असूनही वेगाने वाढला आहे.’ क्युबाची फार्मा प्रगति एक असा प्रकरण आहे, कि ज्यावरून समाजवादी विचारांवर विश्वास असलेले सक्षम, जिद्दी व समर्पित शास्त्रज्ञ कश्याप्रकारे ही एखाद्या देशाची आर्थिक संरचना सुधारणारे निर्धारक घटक बनतात हे स्पष्ट होते. जेव्हा जैव तंत्रज्ञानाच्या नव्या क्षेत्राकडे जगातील अनेक देश शंकेने पाहत होते तेव्हा क्युबातील वैज्ञानिकांनी या क्षेत्राची क्षमता काय करू शकते ते दाखवून दिले. संशोधन आणि नव्या कल्पनांवर वेळ व पैसा खर्च करणं त्या गरीब देशासाठी धोकादायक होते आणि अजूनही आहे, परंतु आतापर्यंत त्यातून काही प्रमाणात का होईना आर्थिक विकास या देशाने केल्याचा क्युबा कडे पाहण्याचा जगाचा दृष्टीकोण या क्षेत्राने बदलत भविष्यात औद्योगिक प्रकल्पांबाबत धोरणकर्त्यांच्या निवडी फेरबदल करण्यास मदत हा क्षेत्र करणीभूत ठरेल. 

2021च्या वार्षिक बजेट मध्ये क्युबाने आपल्या एकूण 178.8 बिलियन पेसोच्या बजेटचा 24 टक्के भाग शिक्षण आणि 28 टक्के भाग आरोग्य व सामाजिक योजनांसाठी राखून ठेवला आहे. क्युबा आपल्या एकूण बजेटचा 52 टक्के भाग शिक्षण आरोग्य व सामाजिक योजनांवर खर्ची घालत आहे. म्हणून हा मुद्दा केवळ विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात प्रायोजक म्हणून सरकारच्या भूमिकेच्या वैधतेपुरता ह्या मुद्द्यावरील चर्चा मर्यादित राहत नाही. क्यूबाचे उदाहरण अनेक प्रकारे सार्वजनिक आरोग्याच्या चांगल्या बाजू आणि सक्षम सरकारी धोरण व नियोजनाचे यश दर्शविते. क्युबाचा मार्ग प्रत्येकासाठी अनिवार्य असण्याची गरज नाही, परंतु बर्‍याच जणांसाठी नक्कीच, तो वैध किंवा गरजेचे असू शकतो. सर्वसामान्य जनतेच्या शिक्षण, आरोग्य आणि जीवन मूल्यांसाठी त्यांच्या बाजूने उभे राहणे तर निश्चितच शिकण्यासारखे आहे. 

- एड. संजय पांडे


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा