Breakingबिरसा क्रांती दलतर्फे 15 ठिकाणावरुन निवेदन, आरोपी नगरसेवकाचे नगरसेवक पद रद्द करून कठोर शिक्षा करण्याची मागणी


रत्नागिरी : शासकीय कर्तव्य बजावत असतांना आदिवासी महिला कर्मचारीस जातीवाचक शिविगाळ करून अमानुष मारहाण करणा-या नंदुरबार येथील  गौरव चौधरी ह्या दोषी  नगरसेवकाला तात्काळ अटक करून कठोर शिक्षा करणे, रेती वाहतूक परवाना व नगरसेवक पद कायमस्वरूपी  रद्द करावे,अशी मागणी बिरसा क्रांती दलाच्या एकूण 15 शाखांनी दिनांक 7 जून 2021 रोजी विविध ठिकाणी निवेदन देऊन केली आहे. 


निवेदन देणा-या शाखेत बिरसा क्रांती दल तालुका शाखा नवापूर, तळोदा, शहादा, शिरपूर, बागलाण, मालेगाव, दापोली व जिल्हा शाखा सांगली, रत्नागिरी, औरंगाबाद, धुळे, नंदुरबार, पुणे, रायगड व मालदा तालुका तळोदा या गाव  शाखांचा समावेश आहे.  

ही निवेदन तहसीलदार व पोलीस निरीक्षक मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे ,उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, आदिवासी विकास मंञी के सी पाडवी, जिल्हाधिकारी नंदुरबार, पोलीस अधिक्षक नंदुरबार व पोलीस निरीक्षक नंदुरबार यांच्या कडे पाठविण्यात आली आहेत. 

निवेदन देताना नवापूर तालुका अध्यक्ष राकेश वळवी, तळोदा तालुका अध्यक्ष सुभाष पावरा, शहादा तालुका अध्यक्ष संतोष पावरा, शिरपूर तालुका अध्यक्ष ईश्वर मोरे, बागलाण तालुका अध्यक्ष दादाजी बागूल, मालेगाव तालुका अध्यक्ष शरद पवार, नाशिक विभाग प्रमुख मनोज पावरा, नाशिक विभाग उपाध्यक्ष रोहित पावरा, नंदुरबार जिल्हाध्यक्ष साहेबराव कोकणी, धुळे जिल्हाध्यक्ष वसंत पावरा, औरंगाबाद जिल्हाध्यक्ष केशव पवार, सांगली जिल्हाध्यक्ष राजेंद्र पाडवी, पुणे संघटक चिंधू आढळ, रायगड जिल्हाध्यक्ष मनोज जांभोरे, रत्नागिरी जिल्हाध्यक्षा चंद्रभागा पवार, मालदा गाव शाखेचे पदाधिकारी, राज्याध्यक्ष युवा सुशिलकुमार पावरा यांच्या सह बिरसा क्रांती दलाच्या संबंधित 15 शाखांचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. 


निवेदनात म्हटले आहे की, दिनांक 05 जून  2021 रोजी आदिवासी समाजाची महिला तलाठी निशा पावरा ह्या आपले शासकीय कर्तव्य बजावत असतांना नंदुरबार येथील भाजपा नगरसेवक गौरव चौधरी यांनी जातीवाचक शिविगाळ करून अमानुष मारहाण केली आहे.ही घटना अत्यंत निंदनीय असून माणूसकीला काळीमा फासणारी आहे. 

अवैध्य गौण खनिज नियंत्रण पथकातील आदिवासी महिला शासकीय कर्मचारी शासकीय कर्तव्य बजावत असतांना निशा पावरा यांना नंदुरबार येथील भाजपा नगरसेवक गौरव चौधरी यांनी जातीवाचक शिविगाळ करत मारहाण केली आहे, केस ओढून फरफटत ढकलून दिले आहे,आदिवासी बाई तुला मी सोडणार नाही, नंदुरबार मध्ये नोकरी कशी काय करते? ते बघतो, तहसीलदार मी खिशात घेऊन फिरतो, तुला पाहून घेईन हरामखोर, तुझा पाटा पाडीन, तू स्वतः ला कलेक्टर समजते का?मी नगरसेवक आहे तुला बघून घेईन, अशी धमकी दिली आहे.

आरोपी नगरसेवकावर शासकीय कामात अडथळा निर्माण करणे, शासकीय कर्तव्य बजावत असतांना महिला कर्मचारीस मारहाण करणे, शासकीय कर्मचारीस धमकी व दमदाटी करणे, जमावबंदी आदेश असताना जमाव जमवून शासकीय कर्मचारीस धाक देणे, दबाव आणणे, महिलेचा विनयभंग करणे, महिलेस लज्जा येईल अशा अश्लील भाषेत शिविगाळ करणे, सदर महिला आदिवासी समाजाची असल्यामुळे अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात यावेत व आरोपीस तात्काळ अटक करून कठोर शिक्षा करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा