Breaking

एसएफआयच्या लढ्याला यश, ऊसतोड कामगारांच्या मुलां- मुलींच्या वसतिगृहासाठी आंदोलनाच्या माध्यमातून केला पाठपुरावा


ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींसाठी वस्तीगृहे मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मंजुरी


बीड जिल्ह्यात 6 तर नगर व जालना जिल्ह्यात प्रत्येकी 2 ठिकाणी होणार वस्तीगृह


बीड , दि. ४ जून : बीड जिल्हा हा ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो, पोटाची खळगी भरण्यासाठी अनेक कामगार ऊसतोडणीसाठी परराज्यात तथा बाहेर जिल्ह्यांमध्ये जातात, अशावेळी त्यांच्या पाल्यांचा शिक्षणाचा मोठा गंभीर प्रश्न निर्माण होतो, त्यांच्या पाल्यांच्या शिक्षणात कसलाही खंड पडू नये व त्यांची पाल्य शिक्षणाच्या मुख्य प्रवाहातून दूर जाऊ नये यासाठी स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाने अनेक निवेदने, निदर्शने व मोर्चे काढून ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृहे स्थापन करण्यात यावी यासाठी गेल्या अनेक वर्षापासून लढा चालू होता. नुकतेच त्यांच्या लढ्याला यश आले आहे असून, सामाजिक न्याय विभागांतर्गत स्व. गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या संत भगवानबाबा वसतिगृह योजनेस राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. या योजने अंतर्गत ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींच्या शिक्षणासाठी तालुकास्तरावर वसतिगृहे उभारण्यात येणार आहेत.

संत भगवानबाबा वसतिगृह योजनेच्या अंतर्गत राज्यातील ऊसतोड कामगारांची जास्त संख्या असलेले 41 तालुके निवडून त्या प्रत्येक तालुक्यात 100 विद्यार्थी क्षमता असलेले मुला-मुलींसाठी मिळून दोन वसतिगृहे असे एकूण 82 वसतिगृहे उभारण्यात येतील. या ठिकाणी निवास, भोजन आदी सर्व सुविधा मोफत उपलब्ध करून देण्यात येतील. 

पहिल्या टप्प्यात 10 तालुक्यातील 20 वसतिगृहांना मंजुरी

या योजनेच्या पहिल्या टप्प्यात ऊसतोड कामगारांची जास्त संख्या असलेले 10 तालुके निवडून त्यामध्ये मुला-मुलींसाठी 2 असे एकूण 20 वसतिगृह उभारण्यास मंजुरी देण्यात आली आहे.  यामध्ये बीड जिल्ह्यातील परळी, केज, पाटोदा, गेवराई, माजलगाव, बीड, अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी व जामखेड तसेच जालना जिल्ह्यातील घनसावंगी व अंबड या दहा तालुक्यांची निवड करण्यात आली आहे. 

पहिल्या टप्प्यातील ही 20 वसतिगृहे या शैक्षणिक वर्षातच सुरू करावेत. या वसतिगृहाच्या इमारतीचे निर्माण होईपर्यंत भाड्याच्या इमारती मध्ये वसतिगृह सुरू करावेत असेही या निर्णयात नमूद करण्यात आले आहे. 

या निर्णयामुळे ऊसतोड कामगारांची पाल्य शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात येतील, हा अतिशय चांगला निर्णय घेतल्याबद्दल सामाजिक न्याय विभागाचे व पालकमंत्री धनंजय मुंडे यांचे बीड जिल्हा कमिटीच्या वतीने आभार व्यक्त करण्यात येत आहेत, ऊसतोड मजुरांच्या मुलांच्या वसतिगृहासाठी स्वतंत्र वसतिगृह स्थापन करावे अशी पहिली मागणी स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाने केली होती.

तत्कालीन संघटनेचे राज्य अध्यक्ष मोहन जाधव व वर्तमान राज्य सचिव रोहिदास जाधव यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुहास झोडगे, जिल्हा सचिव लहू खारगे, संतोष जाधव, संयोगिता गोचडे, विजय लोखंडे, अंकुश कोकाटे, दत्ता सोळंके, अभिषेक शिंदे, रामेश्वर आठवले, अशोक शेरकर, शिवाजी चव्हाण, अश्विनी चव्हाण, बाबासाहेब गायकवाड, रामेश्वर जाधव, विद्या सव्वाशे, ऋषिकेश कलेढोन, शरद कुरकुटे, निकिता गोचडे, बालाजी कुंडकर, विजय राठोड, हनुमान शिंदे, ज्योती दराडे, स्वाती घोडके आदी कार्यकर्ते व विद्यार्थी यांनी लढा दिला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा