Breaking

अजित पवार यांच्यासोबत घेतलेल्या शपथविधीमुळे आपल्या प्रतीमेला तडा, पण आता पश्चाताप नाही - देवेंद्र फडणवीसमुंबई : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी भल्या पहाटे घेतलेल्या शपथविधी सोहळ्याची अद्यापही चर्चा होताना दिसते. त्या भल्या पहाटे शपथ घेऊन स्थापन केलेले सरकार अवघे काही तासच टिकले. राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन करणं हा चुकीचा निर्णय होता, यामुळे आपल्या प्रतिमेला तडा गेला असल्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.


राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी एकत्र येत शपथ घेत सरकार स्थापन केले होते, पुरेसं संख्याबळ नसल्यानं चार दिवसांत हे सरकार पडलं होतं. राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन करायला नको होतं. अजित पवार यांच्यासोबत घेतलेल्या शपथविधीमुळे आपल्या प्रतीमेला तडा गेला असं वक्तव्य माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. एका वेबिनारमध्ये विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना त्यांनी यावर भाष्य केलं आहे.


त्यावेळी फडणवीस म्हणाले की, ज्यावेळी तुमच्या पाठीत खंजीर खुपसला जातो तेव्हा राजकारणात तुम्हाला जिवंत राहावं लागतं. खंजीर खुपसणाऱ्याला आम्हाला उत्तर द्यायचं होतं. त्यावेळच्या भावना आणि राग होता. त्यातून आम्ही ते केलं. परंतु ते चुकीचं होतं आणि आमच्या समर्थकांनाही ते आवडलं नाही. त्यांच्यात माझी जी प्रतिमा होती त्याला काहीशा प्रमाणात तडा गेला. आपला तो निर्णय चुकीचाच होता, पण त्याचा आता पश्चाताप नाही, असेही भाजप नेते देवेंद्र फडणवीस म्हणाले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा