Breakingकोरोनाची संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी आशा सेविकांची भूमिका महत्त्वाची - मुख्यमंत्री‘मुलांमधील कोरोना संसर्ग आणि आशा सेविकांची जबाबदारी’ या विषयावर बालरोग तज्ज्ञांच्या टास्कफोर्सने आशा सेविकांशी ई-संवाद साधला


मुंबई, दि. ७ : ‘आशा’सेविका लढवय्या आणि वीरांगणा असून कोरोनाची संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी त्यांची भूमिका महत्वाची असल्याचे सांगतानाच कोरोनाकाळात केलेल्या कामाबद्दल त्यांना मानाचा मुजरा करतो, अशी भावना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे व्यक्त केली.


मुलांमधील कोरोना संसर्ग आणि आशा सेविकांची जबाबदारी या विषयावर बालरोग तज्ञांच्या टास्कफोर्सच्या सदस्यांनी  आशा सेविकांशी संवाद साधला. दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या या वेबिनारचा शुभारंभ करताना मुख्यमंत्री बोलत होते. मुख्य सचिव सीताराम कुंटे, आरोग्य विभागाचे आयुक्त डॉ. रामास्वामी, बालरोग तज्ञांच्या टास्फोर्सचे अध्यक्ष डॉ. सुहास प्रभू, डॉ. विजय येवले, डॉ. समीर दलवाई, डॉ. आरती किणीकर आदी यावेळी उपस्थित होते.


या वेबिनारच्या शुभारंभ प्रसंगी मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, ‘आशा’हा शब्द ज्याप्रकारे तयार झाला आहे त्याला साजेस काम आशा ताई करीत आहेत. कोरोनाचं संकट अजुनही टळलेलं नाही. महाराष्ट्र करीत असलेल्या कामाचं देशात, परदेशात कौतुक होत आहे. त्यासाठी तुमच्या कामाचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.


एखाद्या बहरलेल्या झाडाला घट्ट उभ करण्याचं काम त्याची जमिनीत खोलवर गेलेली मुळं करतात त्याप्रमाणे आशाताईंचे काम असल्याचे कौतुकोद्गार मुख्यमंत्र्यांनी यावेळी काढले. मुख्यमंत्री म्हणाले, आशा, अंगणवाडी सेविका प्रशासनाचा पाठकणा असून स्वताची प्रकृती, कुटुंब याकडे लक्ष न देता ग्रामीण भागात आरोग्य सेवा देत आहात. त्यासाठी मी मानाचा मुजरा करतो, असे त्यांनी सांगितले.


आशा, अंगणवाडी सेविकांच्या ज्या व्यथा, अपेक्षा आहेत त्याची योग्य ती दखल घेण्यात आली आहे. आपले ऋण विसणार नाही. आपल्या व्यथांवर मार्ग काढला जात आहे त्याला थोडा अवधी द्या, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी आशाताईंना केले. महाराष्ट्राच कुटुंब आपण तळ हाताच्या फोडासारखं जपत आला आहात तज्ञांच्या मतानुसार कोरोनाची संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका मुलांमध्ये जाणवणार असून ती रोखण्यासाठी आशा ताईंची भुमिका महत्त्वाची असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा