Breaking




प्राध्यापक भरती लक्ष्यार्थ आंदोलन संघटनेचे मुख्यमंत्र्यांना निवेदन, केल्या "या" मागण्या



मुंबई : महाराष्ट्र राज्यातील राज्य शासन अनुदानित सर्व महाविद्यालये, संस्था व विद्यापीठातील सहायक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक व प्राध्यापक पदांच्या भरतीवर बंदी घातलेली आहे. परिणामी राज्यातील वरिष्ठ महाविद्यालये, संस्था व विद्यापीठे येथील शिक्षक संवर्गातील हजारो पदे आज रिक्त आहेत ती पदे तात्काळ भरा अशी मागणी प्राध्यापक भरती लक्ष्यार्थ आंदोलन संघटनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.


या रिक्त पदांमुळे राज्यातील उच्च शिक्षणाचा दर्जा खालावत चालला असून गेल्या १० वर्षांपासून सलगरीत्या रिक्त प्राध्यापक पदांची भरती प्रक्रिया न झाल्यामुळे राज्यातील सेट, नेट व पीएच.डी. पात्रताधारकांच्या बेरोजगारीमध्येही मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. त्यांना कोणत्याही प्रकारचे उत्त्पनांचे साधन नसल्याने त्यांचे सामाजिक, आर्थिक व मानसिक जीवन अस्थिर बनलेले आहे. या सर्व परिस्थितीस महाराष्ट्र शासनाने राज्यातील सर्व अनुदानित महाविद्यालये व विद्यापीठातील प्राध्यापक पद भरती बंदीचा निर्णय कारणीभूत असल्याचे प्राध्यापक संघटनेने म्हटले आहे.


सध्या राज्यातील प्राध्यापक पदभरती बंदीच्या  निर्णयामुळे वरिष्ठ महाविद्यालये व विद्यापीठातील अध्यापन प्रक्रियेवर विपरीत परिणाम घडून येत आहे. विद्यार्थांना योग्य शिक्षण आणि मार्गदर्शन मिळणे अशक्य बनले आहे. शिक्षण व अध्यापन प्रक्रिया क्षीण बनलेली आहे. प्राध्यापकांच्या अभावामुळे विद्यार्थांच्या परीक्षा वेळेमध्ये घेणे, वेळेत निकाल लावणे इत्यादी बाबी अशक्य बनलेल्या आहेत. महाविद्यालये व विद्यापीठाच्या नॅक प्रक्रियेवर विपरीत परिणाम होत आहे. महाविद्यालये व विद्यापीठामध्ये प्राध्यापकांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त असल्यामुळे नॅक मूल्यांकनामध्ये महाविद्यालये व विद्यापीठे यांना कमी दर्जाच्या श्रेणी प्राप्त होत आहेत. परिणामी विद्यापीठ अनुदान आयोग व इतर संस्था यांच्याकडून यांना मिळणारे अनुदान कमी होत आहे. त्यामुळे राज्य शासन अनुदानित सर्व महाविद्यालये, संस्था व विद्यापीठातील सहायक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक व प्राध्यापक पदांची भरती तात्काळ होणे आवश्यक असल्याचे संघटनेने निवेदनात म्हटले आहे.


प्राध्यापक भरती लक्ष्यार्थ आंदोलन संघटनेने केल्या "या" मागण्या


- महाराष्ट्र राज्य शासन अनुदानित सर्व महाविद्यालये, संस्था व विद्यापीठातील सहायक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक व प्राध्यापक यांची सर्व रिक्तपदांची (१०० टक्के) भरती तात्काळ सुरु करा


 - प्राध्यापक भरती करताना प्रचलित १०० बिंदू नामावाली (विभागवार रोस्टर) नुसार शिल्लक राखीव जागांचा अनुशेष तात्काळ भरा


- केंद्र शासनाने स्वीकारलेल्या २०० बिंदू नामावलीच्या अभ्यासासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून गठीत होण्याऱ्या समितीस स्थगिती द्या

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा