Breaking


म्युकर मायकोसिस बुरशींचा कर्दनकाळ ठरताहेत 'या' गोळ्या


सूक्ष्मजीव शास्त्रज्ञ डॉ. सुहास कुलकर्णी व संशोधिका अमृता शेटे मांडे यांच्या उपचार संशोधनातील निष्कर्ष


बार्शी, दि. १८ : देश कोरोनाच्या पहिल्या लाटे पेक्षा जास्त संसर्गजन्य असलेल्या दुसऱ्या लाटेतून सावरत असतानाच पोस्ट कोविड रुग्णांमध्ये वाढत असलेल्या म्युकर मायकोसिस या बुरशीजन्य आजारामुळे त्रस्त झालेला आहे. म्युकर मायकोसिस ची राज्यात ७००० पेक्षा वाढलेली रुग्णसंख्या, ९ % हून अधिक पोहोचलेला मृत्यूदर व खूप महागडी आणि जास्त कालावधीची उपचार पद्धती अशा भयग्रस्त वातावरणात एक अत्यंत सकारात्मक बातमी समोर आली असून ती म्हणजे बार्शी सारख्या ग्रामीण भागातून, सूक्ष्मजीव शास्त्रज्ञ डॉ. सुहास कुलकर्णी व सूक्ष्मजीवशास्त्र अभ्यासिका अमृता शेटे मांडे यांनी म्युकर मायकोसिस च्या उपचार पद्धतीवर केलेल्या संशोधनाची. संशोधनातून समोर आलेले निष्कर्ष उपचार पद्धतीला पर्याय उपलब्ध करून देणारे असल्याने म्युकर मायकोसिस झालेल्या रुग्णांना मोठा दिलासा देऊन मृत्यूदर कमी करण्यासाठी नक्कीच उपयोगी पडतील असा विश्वास डॉ. सुहास कुलकर्णी यांनी व्यक्त केला आहे 

म्युकर मायकोसिस हा रोग फक्त काळ्या बुरशी चा म्हणण्या पुरता राहिला नसून पांढरी, पिवळी व आता हिरवी बुरशीही रुग्णाला हानी पोहचविण्यासाठी कारणीभूत ठरू पहात आहे.साथीच्या काळातील रोगजंतू हे वेगळ्या प्रकारचे अर्थात व्हेरिएंट चे असू शकतात, त्यामुळे आधी पासून वापरात असलेली औषधे या जंतूंना मारण्यासाठी यावेळीही तितकिच प्रभावी ठरतील याची खात्री देता येत नाही. म्हणूनच अस्तित्वात असलेल्या औषधांची परिणामकारकता तपासणे गरजेचे असते.फंगल इन्फेक्शन पासून झालेल्या व्याधीतून मिळालेल्या क्लिनिकल  सॅम्पलमधिल नेमकी  बुरशी शोधून, वेगळी करून वाढवावी लागते व नंतर अँटिबायोटिक सेन्सिटिव्हीटी टेस्ट करणे उचित ठरते. अँटिबायोटिक बऱ्याच कालावधी साठी घेणे असल्याने प्रभावी अँटिबायोटिक शोधणे याला फार महत्व आहे.


आम्ही केलेल्या प्रयोगात फ्लूकानाझोल, इट्रकोनाझोल, टेरीबिनाफिन हायड्रोक्लोराइड, ग्रीसोफुलविन हे स्वतंत्र चार केमिकल्स असलेल्या  आठ ब्रँडच्या गोळ्या तसेच केटोकोनाझोल व ल्युलिकोनाझोल हे स्वतंत्र दोन केमिकल्स असलेले दोन ब्रँडचे मलम यांची म्युकर मायकोसिसच्या बुरशींचा नाश करण्याच्या क्षमतेची अँटिबायोटिक  सेनसिटीव्हीटी टेस्ट करून तपासणी केली असता टेरीबिनाफिन हायड्रोक्लोराइड व ग्रीसो फुलविन हे केमिकल असलेल्या गोळ्या म्युकर मायकोसिस या रोगावर सर्वात जास्त प्रभावी व फ्लूकोनाझोल हे   केमिकल असलेल्या गोळ्या मध्यम प्रभावी आढळलेल्या असून केटोकोनाझोल हे केमिकल्स असलेले मलम खूपच उपयुक्त असल्याचे अमृता शेटे मांडे यांनी सांगितले.

म्युकर मायकोसिस रोगात बुरशी मुळे झालेले ब्लॉकेज ऑपरेशन करून काढणे अपरिहार्य असून नंतर  प्रभावी असे एम्फोटेरेसीन हे इंजेक्शन वापरले जाते.प्रत्येक रुग्णाला रोज सहा इंजेक्शन याप्रमाणे १५ ते २५ दिवस या इंजेक्शन ची गरज असते. परंतु या इंजेक्शन ची निर्मिती, पुरवठा,उपलब्धता व गरज यामध्ये फार मोठी तफावत जाणवत आहे.जर काही कारणामुळे इंजेक्शन उपलब्ध झाले नाही तर प्रभावी ठरलेल्या गोळ्या देणे क्रमप्राप्त असते त्यामुळे आम्ही केलेल्या प्रयोगात उपयुक्तता सिद्ध झालेल्या गोळ्यांचा वापर इंजेक्शन उपलब्ध होईपर्यंत त्वरित पर्याय म्हणून वापरल्यास रुग्णांना फार मोठा दिलासा मिळू शकतो असे डॉ. सुहास कुलकर्णी यांनी सांगितले.


कोण आहेत संशोधक :

● डॉ. सुहास कुलकर्णी हे निवृत्त प्रोफेसर असून सूक्ष्मजीवशास्रज्ञ आहेत. दोन संशोधकांची एम फील, सात जणांची पीएचडी, १४ पुस्तकातील लिखाण, ५०पेक्षा अधिक रिसर्च पेपर्स व १५  शोध त्यांच्या नावावर जमा आहेत.

● अमृता शेटे मांडे या सूक्ष्मजीव शास्त्राच्या अभ्यासिका असून पीएचडी करत आहेत. तसेच त्या नर्गिस दत्त मेमोरियल कॅन्सर हाॅस्पिटल (NDMCH), बार्शी, सोलापूर या ठिकाणी कार्यरत आहेत.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा