Breaking


माकप प्रणित ट्रान्सजेंडर जनआंदोलनाचे न्याय भवन येथे धरणे आंदोलन


समाज कल्याण सहाय्यक आयुक्त तेजस माळवदकर यांच्याकडून आशादायी आश्वासने


नांदेड, दि. १६ : तृतिय पंथीयांच्या जीवनावश्यक मागण्या घेऊन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष प्रणित ट्रान्सजेंडर महाविकास जनआंदोलन (लाल बावटा) च्या वतीने मागील सहा महिन्या पासून पाठपुरावा व निवेदने तसेच वरिष्ठांसोबत बैठका असे सकारात्मक कार्यक्रम चालू आहेत. ट्रान्सजेंडर पर्सन्स (प्रोटेक्शन आॕफ राईट) बिल 2019 नुसार तृतिय पंथीयांना सामाजिक,आर्थिक,शैक्षणिक मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रावधान करण्यात आले आहे. त्या कायद्याची योग्य अमलबजावणी व्हावी यासाठी माकप सचिव तथा जनआंदोलनाचे अध्यक्ष कॉ.गंगाधर गायकवाड व तृतिय पंथीयांच्या गुरू गौरी अहमद नायक (बकश) आणि त्यांचे सहकारी योग्य पध्दतीने लढा देत आहेत.

दिनांक 11 मे 2021 रोजी नांदेड जिल्हाधिकारी डॉ.विपीन ईटनकर यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या कक्षात बैठक आयोजित करून तृतीय पंथीयांच्या संदर्भात शासनाच्या मार्गदर्शक सुचना प्रमाणे तातडीने अमलबजावणी करून प्रश्न सोडवावेत अशा सुचना जिल्हास्तरीय तक्रार निवारण समितीस दिल्या होत्या. त्या अनुषंगाने काही प्रमाणात जिल्हा समितीच्या वतीने कारवाई करण्याच्या हालचाली सुरू आहेत तीन ठिकाणी स्मशानभूमिसाठी जमीन पाहणी केल्याचे सदस्य सचिव तथा समाज कल्याण सहाय्यक आयुक्त तेजस माळवदकर यांनी सांगितले. परंतु जनआंदोलनाचे प्रतिनिधी या संदर्भात अनभिज्ञ होते.


दिनांक 11 मे ची बैठक लाल बावटा जनआंदोलनाच्या पत्राचा हवाला देऊन जिल्हाधिकारी यांनी लावली होती परंतु समितीचे काही अधिकारी जाणीवपूर्वक जनआंदोलन च्या पदाधिका-यांना विश्वासात घेऊन कारवाई करण्याचे टाळत आहेत असे आज स.आयुक्तांच्या निदर्शनास तृतीयपंथीयांनी आणून दिले व पुढील बैठकीत तुम्हाला बोलावून केलेल्या कारवाईचा इतिवृतांत देण्यात येईल, असे सांगण्यात आले.

मागील अनेक महिन्या पूर्वी 28 तृतीय पंथीयांना नांदेड मनपा हद्दीमध्ये घरकुले मंजूर झालेली आहेत.काहींनी लोकसहभागाचे पैसे देखील भरले आहेत परंतु घरकुलाचा ताबा देण्यात प्रशासनाच्या वतीने दिरंगाई होत आहे.

तृतीय पंथीयांनी व प्रतिनिधींनी जमीन पाहणी करून सुचविण्याच्या सूचना जिल्हाधिका-यांनी दिल्या होत्या त्या अनुषंगाने कामठा टी पॉईंट म्हैस बाजार येथील सरकारी जमिनी पैकी दोन एकर जमीन किन्नर भवनसाठी देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. त्यावर शासनाच्या निदर्शनास आणून देऊन ती जमीन देण्यासाठी सहकार्य करणार असल्याचे माळवदकर म्हणाले. जिल्हाधिकारी यांनी तृतीय पंथीयासाठी दोन सुविधा केंद्रे मंजूर केली असून लवकरच चालविण्याची जबाबदारी तृतीय पंथी घेणार आहेत. आधार कार्ड, निवडणूक कार्ड, रेशन कार्ड सह इतरही दहा मागण्या आजच्या धरणे आंदोलनात करण्यात आल्या आहेत.


पुढील बैठक लवकरच घेऊन अत्यावश्यक मागण्या तात्काळ सोडविल्या जातील असे सहाय्यक आयुक्त माळवदकर यांनी आश्वासन दिले असून ह्या मध्ये दुर्लक्ष झाल्यास आक्रमक आंदोलन होऊ शकते असा इशारा शिष्ठभंडळातील पदाधिका-यांनी दिला आहे.

आंदोलनामध्ये कॉ.गंगाधर गायकवाड, गुरू गौरी अहमद नायक, बिजली अहमद नायक, कॉ.मारोती केंद्रे, कॉ.शेख मगदूम पाशा, सैजल गौरी बकश, कॉ.दतोपंत इंगळे सह अनेक तृतीय पंथी सामील झाले होते. विमानतळ पोलीसांनी समाज कल्याण कार्यालयात चोख बंदोबस्त लावला होता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा