Breaking
अकोले : घरगुती हॉटेल व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ, पर्यटन क्षेत्र सुरू करण्याची मागणी


अकोले : कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्य भंडारदरा परिसरातील अभयारण्य क्षेत्रात शनिवार रविवार पर्यटन बंद केल्यामुळे कोलटेंभे, मुतखेल, रतनवाडी, साम्रद, घाटघर, उडदावणे, पांढरे, मुरशेत, येथील गाईड्स व छोटे मोठे घरगुती हॉटेल व्यावसायिक यांवर आता उपासमारीची वेळ आली आहे. हे पर्यटन करोनाचे सर्व नियमांचे काटेकोर पालन करुन अभयारण्य क्षेत्रात ऑनलाईन पद्धतीने गर्दी होऊ नये यासाठी प्रत्येक तासाला मर्यादित पास व्यवस्था करावी अशी मागणी आज शेंडी येथील कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्य कार्यालय येथे नियोजित बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते अशोक भांगरे यांनी केली.


पर्यटन हा या परिसराचा आत्मा आहे. करोनामुळे बंद असलेले पर्यटन चालू झाले परंतु शनिवार रविवार बंद केल्यामुळे पुन्हा उपासमारीची वेळ आली आहे. खरं तर पर्यटक हे शनिवार रविवार आवर्जुन येत असतात‌. त्यामुळे मिळणारा ग्रामीण भागातील युवकांचा रोजगारही इतर दिवसांपेक्षा अधिक असतो.

त्यामुळे मर्यादित पास व्यवस्था करण्यात यावी. व अकोले तालुक्यातील नागरीकांना देखील अभयारण्याच्या चेक नाक्यावर खुप त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे तालुक्यातील नागरीकांना आपले आधारकार्ड दाखवुन प्रवेश देण्यात यावा, भंडारदरा धरणा जवळील व शेंडी गावातील दोन्ही चेक नाके हे अभयारण्य क्षेत्रात बसवावे, अशी मागणी करण्यात आली.

या वेळी शेंडी गावचे सरपंच दिलीप भांगरे, वन्यजीव अभयारण्य कार्यालयाचे आडे, वाकी गावचे सरपंच धिरेंद्र सगभोर, दशरथ झडे, गोरख बांडे, यशवंता बांडे, हरि बुळे, लालु सारुक्ते, ढवळा बुळे, पांडुरंग धोंगडे, पांडुरंग उघडे, जितेंद्र सगभोर यांसह अभयारण्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा