Breakingसांगलीला अलर्ट, पाणीपातळी धोक्याच्या दिशेने !


सांगली दि.२३ : कोयनेतून आज दुपारपर्यंत 50000 क्युसेस विसर्ग सोडण्यात येणार आहे. त्यामुळे कृष्णा नदीतील पाणी पातळी सध्याच्या पाणीपातळी पेक्षा दहा ते बारा फुटाने अधिक वाढू शकते. त्यादृष्टीने नागरिकांनी सतर्क राहून आवश्यक तेथे तात्काळ स्थलांतरण सुरू करावे, असा इशारा जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी यांनी दिला आहे. सांगलीमध्ये आयर्विन पूल येथे पाणीपातळी 50 ते 52 फुटापर्यंत वर जाऊ शकते याची नोंद घेऊन सखल भागातील नागरिकांनी,  नदीकाठच्या नागरिकांनी सुरक्षित स्थळी जावे. नदीपात्रात कोणीही जाऊ नये, यासाठी प्रशासनाने अतिदक्षतेचा इशारा दिला आहे.
सांगली मध्ये पाण्याची पातळी वाढली एका रात्रीत 20 फूट पाणी  

सांगली जिल्ह्यात गुरुवारी दिवसभर मुसळधार पाऊस पडला. कोयना, चांदोली धरण परिसरात अतिवृष्टी सुरू आहे. त्यामुळे दिवसभरात तब्बल दहा फूट पाणीपातळी वाढल्याने कृष्णा, वारणा नद्यांना पूर आला आहे.

अनेक बंधारे, पूल पाण्याखाली गेले आहेत. काही गावांचा संपर्क तुटला आहे. महापुराच्या धास्तीने काही गावांत स्थलांतर सुरू झाले आहे. तसेच कोयना व चांदोली धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. पाऊस व धरणांतून सोडलेल्या पाण्यामुळे शुक्रवारी दोन्ही नद्यांचे पाणी पात्राबाहेर पडणारआहे. सायंकाळपर्यंत पाणी सांगली शहरासह नदीकाठच्या अनेक गावांत घुसण्याचा धोका आहे.

जिल्ह्यात व पाणलोट क्षेत्रात गेले दोन दिवस सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील पाण्याची पातळी वाढते आहे.

जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 59.6 मिमी पावसाची नोंद झाली. शिराळा तालुक्यात 154.3 मिमी पाऊस पडला. मिरज तालुक्यात 36.2, जत तालुक्यात 11.1, खानापूर-विटा तालुक्यात 25.2, वाळवा-इस्लामपूर तालुक्यात 75.7, तासगाव तालुक्यात 35.6, आटपाडी तालुक्यात 7.4, कवठेमहांकाळ तालुक्यात 19.8, पलूस तालुक्यात 60.3, कडेगाव तालुक्यात 59.6 मिमी असा उच्चांकी पाऊस झाला.

याबरोबरच धरण परिसरात तुफानी पाऊस सुरू आहे. बुधवारी सकाळी ते गुरुवारी सकाळी आठ वाजेपर्यंत 24 तासात कोयना धरण भागात 347 तर गुरुवारी दिवसभरात 299 मिमी पाऊस पडला. तसेच नवजा आणि कोयना येथे अनुक्रमे 427 व 285, महाबळेश्वरला 424 व 260 असा विक्रमी पाऊस पडला आहे. कराड तालुक्यात गेल्या 24 तासात 85 मिमी पाऊस झाला. धोम धरण परिसरात बुधवारी 168 व आज 8 मिमी पावसाची नोंद झाली. कण्हेर धरणातही याचप्रमाणे अनुक्रमे 92 व 11 मिमी पाऊस पडला.

प्रतितास दोन लाख क्युसेक पाणी येत असल्याने कोयना धरण 76 टीएमसी भरले आहे. धरणातून प्रतिसेंकद 2100 क्युसेक पाणी सोडले जात आहे. कण्हेरमधूनही 1563 पाणी सोडले जात आहे.

वारणा नदीवरील चांदोली धरण परिसरातही बुधवारी 185 व गुरुवारी 75 मिमी पाऊस पडला. धरणात 30 टीएमसी पाणीसाठा आहे. धरण 82.57 टक्के भरले आहे. धरण भरू लागल्यामुळे सकाळी 4 हजार 883 विसर्ग सुरू केला होता. दुपारी तो 6 हजार करण्यात आला. रात्री आठ वाजता तो 22 हजार क्युसेक करण्यात आला.

मुसळधार पाऊस तसेच धरणातील विसर्गामुळे कृष्णा, वारणा नद्यांच्या पाणी पातळीत वेगाने वाढ झाली आहे. गुरुवारी सकाळपासून ते रात्री नऊ वाजेपर्यंत दोन्ही नद्यांचे पाणी सरासरी 15 ते 17 फूट वाढले. भिलवडीत सकाळी 11 फूट पाणी होते, ते सायंकाळी सात वाजता 32 फूट झाले. सांगलीत आयर्विन पुलाजवळ सकाळी 13 फुटावर असणारे पाणी रात्री नऊ वाजता 28 फुटांपर्यंत गेले. रात्री 11 वाजता पाणीपातळी 30 फूट झाली होती.

जोरदार पावसामुळे दोन्ही नद्या दुथडी भरून वाहत आहेत. काही ठिकाणी नदीचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. अनेक बंधारे, पूल पाण्याखाली गेले आहेत. शिराळा, वाळवा, पलूस, कडेगाव, सांगली, मिरज तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.

वाढीचा वेग पाहता उद्या ( शुक्रवारी) सायंकाळपर्यंत पाणी पातळीत आणखी दहा ते 12 फूट वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे वारणा, कृष्णा नदीकाठच्या काही गावांत पाणी घुसण्याची शक्यता आहे. सांगलीत कर्नाळ रोडवर पाणी येेण्याचा धोका आहे.

सांगलीत आज पाणी 35 ते 40 फुटांपर्यंत जाणार

गुरुवारी रात्री कृष्णा नदीवरील आयर्विन पुलाची पातळी 32 फुटांपर्यंत होती. शुक्रवारी सकाळपर्यंत ती 35 फुटांपर्यंत जाण्याची शक्यता पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता ज्योती देवकर यांनी वर्तविली आहे. शनिवारी सकाळी पाणी पातळी 35 तर रात्री 40 फुटांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांतही अशीच पाणीपातळी वाढणार आहे. त्यामुळे सतर्क राहावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

'या' भागाला सतर्कतेचा इशारा 

कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहेे. गुरुवारी रात्री सूर्यवंशी प्लॉटमध्ये पाणी घुसले. त्यानंतर 56 नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले. इनामदार प्लॉट, कर्नाळ रोड, शिवमंदिर परिसर, बायपास चौक, काकानगर, दत्तनगर, मगरमच्छ कॉलनी या भागात रात्री व पहाटेपर्यंत पुराचे पाणी येऊ शकते. या भागातील नागरिकांनी महापालिकेच्या निवारा केंद्रात अथवा सुरक्षित जागी स्थलांतर व्हावे, असे आवाहन आयुक्त नितीन कापडणीस यांनी केले आहे.

पावसाचा जोर कायम आहे. कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग शुक्रवारी होणार आहे. प्रशासन सतर्क झाले. सांगलीत आयर्विन पुलाजवळ गुरुवारी सायंकाळी 7 वाजता पूर पातळी 27 पर्यंत पोहोचली. पाणी पातळी 30 फुटांवर येताच नदीपात्रातील पाणी पूरपट्ट्यातील नागरी वस्तीत शिरते. त्यामुळे महापालिका प्रशासनाने तातडीची खबरदारी म्हणून पूर पट्ट्यात राहणार्‍या नागरिकांना स्थलांतर करण्याच्या सूचना दिल्या आहे.

रात्रीत पाणी पातळी वाढण्याची शक्यता आल्याने पुराच्या पाण्यामुळे बाधित होणार्‍या सूर्यवंशी प्लॉट, इनामदार प्लॉटमध्ये जाऊन उपायुक्त राहुल रोकडे व पथकाने नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित होणेचे आवाहन केले. मुख्य अग्निशामक अधिकारी चिंतामणी कांबळे, वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक अविनाश पाटणकर, स्वच्छता निरीक्षक धनंजय कांबळे, प्रणिल माने, किशोर कांबळे, गणेश माळी, प्रमोद रजपूत यांनी पूरपट्ट्यात फिरून नागरिकांना स्थलांतर करण्याचे आवाहन केले.

स्थलांतर करून अन्यत्र राहण्याची सोय नसलेल्या नागरिकांसाठी महापालिकेने साखर कारखाना शाळा क्रमांक 14 आणि शाळा क्रमांक 24 या दोन ठिकाणी तात्पुरता निवारा केंद्र सुरू केले आहे. पूरपट्ट्यातील जनावरे सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्याबाबत सूचना दिल्या आहेत. रात्रीत पाणी पातळी वाढणार असल्याने वैद्यकीय, आपत्कालीन तसेच अग्निशमन विभागाकडून पूर स्थितीवर लक्ष ठेवले जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा