Breaking
आंबेगाव : कातकरी मुलांची शाळा बंद करू नये, एसएफआय विद्यार्थी संघटनेची मागणी

आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे कार्यालयीन अधिक्षक खंडारे यांना निवेदन देताना एसएफआय संघटनेचे पदाधिकारी. 

आंबेगाव : आघाणे ता.आंबेगाव जि.पुणे येथे शाश्वत संस्थेच्या वतीने २१ वर्षापासून कातकरी मुला-मुलींसाठी सुरु असलेली शाळा संस्थेने बंद करू नये व ती सुरु रहावी यासाठी आदिवासी विभागाने लक्ष घालावे, यासाठी स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (SFI) या विद्यार्थी संघटनेने प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, घोडेगाव यांना निवेदन दिले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, तालुक्यात आदिवासी मुला - मुलींसाठी वेगवेगळ्या ठिकाणी शासकीय आदिवासी आश्रमशाळा व वसतिगृहे सुरु केलेली आहेत. हि चांगली बाब असुन जमेची बाजू आहे. परंतु, या ठिकाणी कातकरी जमातीची मुले इतर आदिवासी जमातींच्या मुलांसोबत फार काळ शिक्षण घेऊ शकत नाहीत, असा अनुभव आहे. 

आंबेगाव तालुक्याच्या भागातील महादेव कोळी समाज व कातकरी समाज यांच्यातील सामाजिक व सांस्कृतिकदृष्ट्या वेगळेपणा असल्या कारणाने, कातकरी मुलांना महादेव कोळी समाजातील मुलांच्या सोबतीने शिक्षण घेण्यामध्ये काही अडचणी निर्माण होतात. हि सर्व परिस्थिती लक्षात घेऊन संस्थापक व कार्यकर्त्यांनी कातकरी मुलांसाठी वेगळी शाळा असावी. हि गरज लक्षात घेऊन शाश्वत संस्थेच्या वतीने मागील २० वर्षापूर्वी  कातकरी मुलांच्या शिक्षणासाठी इ.१ ली. ते इ.६ वी. पर्यंतची कायमस्वरूपी निवासी विनाअनुदानित शाळा आघाणे येथे सुरु करण्यात आली होती. या शाळेच्या माध्यमातून अनेक कातकरी समाजाची मुले हि शिक्षणाच्या प्रवाहात आलेली आहेत.   

कातकरी मुलांसाठी स्वतंत्र शाळा सुरु केली होती. हि अत्यंत चांगली बाब होती व कातकरी मुलांसाठी स्वतंत्र शाळा सुरु करणे, किती उपयुक्त होत हे काळाच्या कसोटीवर खरे ठरले आहे. त्याबद्दल शाश्वत संस्थेचे एसएफआय संघटनेने आभार देखील व्यक्त केले आहेत.

परंतु अलीकडील काळात शाश्वत संस्थेच्या आर्थिक व इतर काही अडचणींमुळे या संस्थेने हि शाळा बंद करण्याचे ठरवले आहे. हे अत्यंत धोकादायक व कातकरी समाजाच्या विकासाला हानिकारक ठरणारी बाब असल्याचे ही एसएफआय ने म्हटले आहे.
नायब तहसीलदार एस. बी. गवारी यांना निवेदन देताना एसएफआय संघटनेचे पदाधिकारी.

■ एसएफआय च्या मागण्या पुढीलप्रमाणे : 

● आघाणे गावातील कातकरी मुलांसाठी सुरु केलेली स्वतंत्र शाळा हि पुढे सुरु ठेवावी, यासाठी प्रकल्प कार्यालयाने मध्यस्थी करावी. तसेच संस्थेला हि शाळा सुरु ठेवण्यासाठी लागणारे यथोचीत अनुदान द्यावे किंवा हि शाळा प्रकल्प कार्यालयाने ताब्यात घेऊन शासकीय अनुदानाच्या व शासकीय पद्धतीने  शासनाच्या वतीने कायमस्वरूपी सुरु ठेवावी. 

● या शाळेमध्ये ८० % मुले हि कातकरी व ठाकर समाजाची असतील व २० % मुले हि इतर सर्व स्थानिक भागातील जातीधर्मातील शिक्षण घेतील. अश्या प्रकारची व्यवस्था या शाळेत असावी. 

● हि शाळा इयत्ता १ ली. ते पुढे हळू हळू वाढ करत इयत्ता १० वी पर्यंत करण्यात यावी. 

● सदरील शाळेवर ज्या स्थानिक शिक्षकांनी वर्षानुवर्षे काम केले आहे त्या शिक्षकांनाच शासनाने वा संस्थेने ही शाळा सुरू केल्यावर नेमणूक करावी. 

● शासनाने ही शाळा ताब्यात घेतल्यास या शाळेचे व्यवस्थापन कामात स्थानिक परिसरातील एक-दोन सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी व्यवस्थापन समितीवर घ्यावेत. याचे मुख्य कारण म्हणजे ही शाळा अत्यंत संवेदनशीलपणे व कातकरी समाजाच्या प्रती बांधिलकीने चालवणे गरजेचे आहे.

● कातकरी या आदिम जमातीच्या विकासासाठी शिक्षण हे अत्यंत प्राथमिक गोष्ट आहे आणि त्यामुळे सुरु केलेली हि शाळा कातकरी मुलांना डोळ्यांसमोर ठेऊन पुढे अविरतपणे सुरु राहील, अश्या पद्धतीने हस्तक्षेप आपण त्वरित करावा. व कुठल्याही प्रकाराचे कातकरी समाजाचे नुकसान करू नये.

वरील मागण्यांचे निवेदन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, घोडेगाव चे कार्यालयीन अधीक्षक खंडारे, निवासी नायब तहसीलदार एस.बी.गवारी, सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू थाटे यांना देण्यात आले आहे व जिल्हाधिकारी, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना ई-मेल करण्यात आले आहे. 

निवेदन देतेवेळी एसएफआय चे तालुका सचिव समीर गारे, कोषाध्यक्ष दिपक वाळकोळी, सदस्य गणेश पोखरकर, माजी अध्यक्ष महेश गाडेकर हे उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा