Breaking
आंबेगाव : कातकरी मुलांसाठीची शाळा बंद करण्याचा संस्थेचा निर्णय, मुलांचे भवितव्य टांगणीला

संग्रहित छायाचित्र

ग्रामस्थांचा शाळा बंदला तीव्र विरोध

आंबेगाव : आदिवासी अतिदुर्गम भागातील आघाणे, ता.आंबेगाव, जिल्हा पुणे, या ठिकाणी आदीम जमातीतील कातकरी समाजातील, मुलांना शिक्षण देणारी वनदेव विद्या मंदिर, आघाणे ही विशेष शाळा शाश्वत संस्थेने सुरू केली होती. या शाळेमध्ये पहिली ते सहावी या वर्गात साधारणपणे ६० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. परंतु ही शाळा बंद करण्याचा निर्णय संस्थेने घेतला आहे.

शाश्वत संस्थेचे विश्वस्त अशोक आढाव, प्रतिभा तांबे, सुला गवारी यांनी १६ जुलै रोजी आपल्या सहकाऱ्यांच्या सोबतीने येऊन, वनदेव विद्या मंदिर,आघाणे या ठिकाणी जाऊन, तसेच पोलिस प्रशासनाला सोबत घेऊन या शाळेतील सर्व साहित्य ट्रक भरुन घेऊन गेले. 

शाळा बंदच्या निर्णयाला आघाणे ग्रामस्थांसह ग्रामपंचायतीने ही विरोध केला आहे. "२१ वर्षापासून ही शाळा संस्थेने गावच्या ग्रामसभेशी चर्चा करून व ग्रामस्थांच्या सहकार्याने सुरू केली होती. परंतु संस्थेने आता शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे व याबाबत ग्रामसभेला व स्थानिक ग्रामस्थांशी कोणताही संवाद न साधता शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

"संस्थेच्या विश्वस्त मंडळाची बैठक झाल्यानंतर शाळा बंदी मागील भूमिका स्पष्ट केली जाईल, असे संस्थेचे विश्वस्त अशोक आढाव यांनी 'महाराष्ट्र जनभूमी'शी बोलताना सांगितले.

आज कातकरी समाजातील पहिली पिढी शिक्षण प्रवाहात येत असताना, त्यांच्यासाठी सुरू असलेली शाळा बंद करणे म्हणजे या समाजाचे भविष्य धोक्यात आणणे आहे. जर ही शाळा बंद झाली तर कातकरी मुले शाळेच्या बाहेर फेकली जातील. त्यामुळे याची आदिवासी विकास विभागाने गंभीर दखल घ्यावी, असे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

तसेच पेसा कायदयानुसार ग्रामसभेशी चर्चा- विनिमय न करता शाळा आमच्या मालकीची आहे, आम्ही वाटेल ते करू, या प्रवृत्तीतून संस्थेचे पदाधिकारी जे आज वर्तन करत आहेत व आम्हाला पेसा कायदा माहीत नाही. असे म्हणणे अत्यंत चुकीचे असल्याचेही सरपंच चिंतामण वडेकर म्हणाले.

तसेच ग्रामस्थांचे म्हणणे आहे, "शाश्वत संस्थेकडे ही शाळा सुरू ठेवण्यासाठी आर्थिक अडचणी असेल तर आदिवासी विकास विभागाने, त्यासाठी संस्थेला मदत करावी अथवा शाळा ताब्यात घ्यावी परंतु शाळा बंद करु नये." 

कातकरी मुलांची शाळा बंद करू नये,  एसएफआय ची मागणी

आघाणे ता.आंबेगाव जि.पुणे येथे शाश्वत संस्थेच्या वतीने २१ वर्षापासून कातकरी मुला-मुलींसाठी सुरु असलेली शाळा संस्थेने बंद करू नये व ती सुरु राहावी यासाठी आदिवासी विभागाने लक्ष घालावे यासाठी एस.एफ.आय. या विद्यार्थी संघटनेने प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, घोडेगाव यांना निवेदन दिले आहे.

यावेळी संघटनेचे तालुका सचिव समीर गारे, कोष्याध्यक्ष दिपक वाळकोळी, सदस्य गणेश पोखरकर, माजी अध्यक्ष महेश गाडेकर हे उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा