Breaking


शेततळ्यात बुडून दोन सख्या भावांचा मृत्यू


केज / अशोक शेरकर : तालुक्यातील लाडेवडगाव येथील दोन सख्या चिमुकल्या भावांचा खेळताना शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी (२७ जुलै) दुपारी घडली. ही भावंडे आई-वडिलांसह शेतात गेली होती.


हर्षल माधव लाड (वय ७) आणि ओम माधव लाड (वय ५) अशी त्या दोन भावांची नावे आहेत. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी लाडेवडगाव येथील माधव लाड हे सर्व कुटुंबियांसह रोकडपट्टी शेतात गेले होते. सर्वजण कामात दंग होते आणि हर्षल आणि ओम शेतात खेळत होते. 

दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास ते दोघेही खेळत खेळत शेततळ्या जवळ गेले आणि पाण्यात पडले. हे पाहून त्यांच्या मातापित्यासह इतर नातेवाईकांनी त्यांच्याकडे धाव घेतली आणि त्यांना पाण्याबाहेर काढले. त्यांना तातडीने अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात दाखल केले असता तिथे डॉक्टरांनी तपासून त्या दोन्ही भावांना मयत घोषित केले.

सायंकाळी एकाच चितेवर दोन्ही भावांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे लाडेवडगाव गावावर शोककळा पसरली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा