Breaking


ब्रेकिंग : अकरावी प्रवेशासाठी सीईटीचे वेळापत्रक जाहीर, असा असेल अभ्यासक्रमपुणे : इयत्ता अकरावी प्रवेशासाठी राज्यात प्रथमच प्रवेशपूर्व परीक्षा (सीईटी) घेतली जाणार आहे, याबाबतचे वेळापत्रक महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने प्रसिध्द केले आहे. ही परीक्षा ऑफलाईन पध्दतीने होणार असून २१ ऑगस्ट रोजी घेण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे.


अकरावी प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी राज्य मंडळाच्या दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित इंग्रजी, गणित (भाग १ व २), विज्ञान आणि तंत्रज्ञान (भाग १ व २ ) सामाजिक शास्त्रे (इतिहास व राज्यशास्त्र, भूगोल) या प्रत्येक घटकावर प्रत्येकी २५ गुणांचे एकूण १०० बहुपर्यायी प्रश्न (एमसीक्यू) विचारले जाणार आहेत. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २५ टक्के अभ्यासक्रम वगळण्यात आला होता, त्यामुळे या अभ्यासक्रमावर सीईटीमध्ये प्रश्न विचारले जाणार नाहीत.


अकरावी प्रवेशपूर्व परीक्षा (सीईटी) साठी विद्यार्थ्यांना २० जुलै ते २६ जुलै या कालावधीत ऑनलाईन पध्दतीने अर्ज करता येणार आहे. तर सीईटी परीक्षा २१ ऑगस्ट रोजी सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत घेण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे.


विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी मंडळाने निश्चित केलेल्या परीक्षा केंद्रापैकी कोणतेही एक परीक्षा केंद्र दिले जाईल. विद्यार्थ्याने अर्जात नमूद केलेला पत्ता विचारात घेऊन त्याला परीक्षा केंद्र दिले जाणार आहे. तसेच, राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना अकरावी सीईटीसाठी परीक्षा शुल्क भरावे लागणार नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा