Breaking
दोन आदिवासी मुलींच्या मृत्यू प्रकरणाची सीबीआय चौकशीची मागणी


रत्नागिरी : ठाणे जिल्ह्यातील केळणी (ता. कल्याण) येथील गरीब आदिवासी समाजाच्या दोन जिवलग मैत्रिणींच्या गूढ मृत्यची सीबीआय द्वारे तपास करून दोषींना फाशीची  शिक्षा करा, अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेच्या वतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या कडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. याबाबत सुशीलकुमार पावरा संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष, मनोज पावरा राज्याध्यक्ष, राजेंद्र पाडवी महासचिव, दादाजी बागूल कोषाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष ठाणे सतीश जाधव या बिरसा फायटर्स संघटनेच्या पदाधिकारी यांनी प्रशासनाला निवेदन पाठवली आहेत.


निवेदनात म्हटले आहे की, शारदा बूधाजी हंबीर (वय वर्ष १६) व शोभा पांडुरंग निरगुडा (वय वर्ष १८) मु.केळणी, पो.मामणोली, ता.कल्याण जि.ठाणे,महाराष्ट्र या दोघी जिवलग मैत्रिणी होत्या. शुक्रवार दि.०४ जून २०२१ रोजी सकाळी १०:३० च्या दरम्यान दोघी अल्पवयीन मुली राहत्या घरातून गायब  झाल्या. न सांगता कुठेही न जाणाऱ्या मुली अंधार पडूनही घरी न परतल्या कारणे खूप शोधाशोध करूनही त्या सापडल्या नाहीत.

सदर मुली नेहमीप्रमाणे एकमेकींच्या घरी असतील अशा भ्रमाने अगोदर हवी तशी शोधाशोध झाली नाही. रात्र होताच संपुर्ण नातेवाइकांना दूरध्वनीद्वारे संपर्क साधूनही त्यांचा थांगपत्ता लागला नसल्यामुळे कुटुंबीय चिंतेत होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी रविवारी ०६ जून २०२१ रोजी दुपारच्या दरम्यान मुरबाड पोलिस चौकीतून हरवलेल्या मुलींच्या घरी फोन केले असता, त्यांच्या कुटुंबाला घटनास्थळी मुरबाड तालुक्यातील पोटगावच्या जंगलात बोलावण्यात आले. 

सदर घटनास्थळी पोटगावच्या जंगलात दोन्ही मुली एका झाडाला गळफास घेऊन जमिनीवर पाय टेकलेल्या मृत अवस्थेत होत्या. घटनास्थळी मृत शारदा हंबीर यांची आई, बाबा आणि तिचा भाऊ गणेश उपस्थित होते, मृत शोभा निरगुडाचे आजी आणि तिचा भाऊ पंकजही हजर होता.

नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार दोन्हीं मैत्रिणी जिवाभावाच्या सख्या बहिणी सारख्या वागायच्या. एकमेकींच्या घरची घरातील कामे मिळून जुळून करायच्या. आज पर्यंत दोघीं कधीही जंगलात रान भाज्या वैगरे आणायला गेल्या नाहीत. त्या नंतर दोन्हीं मृतदेह जे.जे.हॉस्पिटल मुंबई येथे शवविच्छेदन अहवाल साठी घेवून गेले आणि दुसऱ्या दिवशी ०७ जून २०२१ रोजी सकाळी ११:०० च्या दरम्यान अंत्यसंस्कार साठी मृतदेह त्यांच्या कुटुंबाला स्वाधीन केले.

मुरबाड पोलिस चौकीत जावून शवविच्छेदन अहवाल आल्याची चौकशी केली असता पोलिस कर्मचारी बोलतात की हॉस्पिटल मधून शवविच्छेदन अहवाल आलेलाच नाही. अहवाल आले की तुम्हाला आम्ही कॉल करतो. आज एक महिना उलटूनही पोलिस प्रशासनाकडून प्रतिसाद मिळालेला नाही. शवविच्छेदन अहवाल मिळण्यास खरचं एक महिना पेक्षा अधिक कालावधी लागतो का दि.०५ जुलै २०२१ रोजी मुरबाड पोलिस चौकीत मृत शारदा हंबीरची आई आणि मृत् शोभा निरगुडा ची आजी शवविच्छेदन अहवाल मागणी केली. त्या वेळेस मुरबाड पोलिसांनी त्यांना उलट उत्तर दिलं की साहेब कामा निमित्त ठाण्याला गेले आहेत ! तुम्हाला रिपोर्ट ची काय गरज आहे. अशा वेळेस आपली लेकरं गमावलेली आई आणि आजी गप्प मन दाटून हुंदके देवुन पोलीस चौकी मधून बाहेर आल्या. आदिवासी समाजातील गरीब,अशिक्षित बंधू-भगिनी प्रशासनाला धारेवर धरणार नाहीत. याच भ्रमापोटी आदिवासी बांधवांच्या प्रकरणाकडे डोळेझाकपणा केला जातो. आणि आमच्या आदिवासी बांधवांची प्रकरणे दाबण्याचा प्रयत्न केला जातो, असा आरोप सुशीलकुमार पावरा यांनी केला आहे.

म्हणून या प्रकरण पोलीस प्रशासनाने सीबीआय कडे सुपूर्त करून किंवा तुमच्या मार्फ़त सदर घटनेचा तपास करून आदिवासी कुटुंबाला न्याय मिळवून द्यावी, अशी मागणी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा