Breaking


आरोग्य खात्यातील अंशकालीन स्त्री परिचरांना जिल्हा परिषदेच्या सेवेत कायम करण्याची मागणी


नाशिक : आरोग्य खात्यातील अंशकालीन स्त्री परिचरांना जिल्हा परिषदेच्या सेवेत कायम करा, आरोग्य विभाग ने घेतलेल्या निर्णयाप्रमाणे 10 हजार रुपये मानधन त्वरित लागू करा या मागण्यांसाठी अंशकालीन स्त्री परिचर संघटना आयटक च्या वतीने राज्यभर आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर यांना निवेदन देण्यात आले.निवेदनात म्हटले आहे की, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्राच्या ठिकाणी नर्सेसना मदत करणाऱ्या अंशकालीन स्त्री परिचरांना त्यांच्या कामाच्या तुलनेत मिळणारे एकत्रित वेतन फक्त राज्य सरकार दरमहा 2900 रुपये व केंद्र सरकार 100 रुपये एकूण 3 हजार रुपये दरमहा निव्वळ तुटपुंजे असल्यामुळे त्यांच्यावर वेठबिगाराचे जीवन जगण्याची वेळ आली आहे. याचे विरोधात आज २६ जुलै २०२१ रोजी जिल्हा परिषदेवर राज्यभर आंदोलन  करण्यात आले.

■ अंशकालीन स्त्री परिचरांच्या मागण्या पुढीलप्रमाणे : 
 
● अंशकालीन स्त्री परिचरांना रुपये १८,००० वेतन मिळावे. दि. २० ऑगस्ट २०१४ रोजी आरोग्य संचालक मुंबई यांनी स्त्री परिचरांना रुपये १०,००० एकत्रित वेतन देण्यात यावे अशी शिफारस केलेली आहे. मात्र सरकार याकडे दुर्लक्ष करीत आहे. आरोग्य खात्यात अन्य कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी सहित बरेच आर्थिक लाभ मिळतात पण समान कामाला समान वेतन हे सूत्र स्त्री परिचरांना डावलले जाते.  

● जिल्हा परिषद सेवेत कायम करा.

● कोविडचा कामाचा प्रोत्साहन भत्ता देण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करा, प्रोत्साहन भत्ता द्या.

● अंशकालीन स्त्री परिचर च्या वारसांना सेवेत घ्या 

● पेन्शन योजना लागू करा.

● अंशकालीन स्त्री परिचर यांना गणवेश द्या.

● अंशकालीन स्त्री परिचर यांना दीपावली, भाऊबीज भेट द्या.

● अंशकालीन स्त्री परिचर चे नाशिक जिल्ह्यातील फरक रक्कम त्वरित खात्यावर जमा करा, तसेच थकीत मानधन त्वरित द्या.

यावेळी महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते अंशकालीन स्त्री परिचर संघटना (आयटक) चे राज्य सचिव कॉम्रेड राजू देसले, जिल्हा सचिव चित्रा जगताप, सहसचिव हसीना शेख, अंजना काळे, रंजना आहेर, शांता बागुल, वेणू दरोडे, मीरा गोसावी, विटा धुळे, कोंदन बाई ढगे, मंगला जाधव, कुसुम काळे, शालिनी बागुल, सुशीला सोनवणे, तुलसा निकम, माधुरी मेटकर, उषा जोशी, शाबु गायकवाड, सुनीता सोनवणे, मनोहर गायकवाड, अलका बस्ते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा