Breaking
प्राकृतिक सौंदर्याचा आविष्कार : भंडारदरा परिसर

विल्सन डॅम: भंडारदरा 

भंडारदरा : अकोले तालुक्याच्या पश्चिम भागातील सह्याद्री पर्वत रांगेतील उंच शिखरे व भंडारदरा धरणाचा विस्तीर्ण जलाशय यामुळे येथील प्राकृतिक सौंदर्य पर्यटकांना नेहमीच भुरळ घालत असते. प्राकृतिक सौंदर्याचे अनेक चमत्कार या भागात आपल्याला दिसतात. प्रकृतीने येथे भरभरून दिले आहे. त्यातच भर ब्रिटिशकालीन विल्सन डॅम ची. विल्सन डॅममुळे तर या भागाला बाराही महिने पर्यटकांचा ओघ सुरूच असतो. 

अकोले शहरापासून राजुर च्या पुढे वीस किमी अंतरावरील भंडारदरा हे ब्रिटिशकालीन बहुउद्देशीय धरण पर्यटकांना नेहमीच खुणावत असते. येथून वाहणारी अमृतवाहिनी नदी पुढे प्रवरासंगमा पर्यंतचा परिसर सदन बनवत जाते. 
सुप्रसिद्ध न्हाणी फॉल
याच भंडारदरा परिसरात अहमदनगर जिल्ह्याला वरदान ठरलेले भंडारदरा धरण, महाराष्ट्रातील सर्वात उंच कळसुबाई शिखर, आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाची खोल संदन दरी, आशिया खंडातील पहिला उदंचन घाटघर जलविद्युत प्रकल्प, प्राचीन स्थापत्याची ओळख करून देणारे अमृतेश्वराचे मंदिर व आदिवासी पराक्रमाचा इतिहास सांगणारा रतनगड यामुळे हा परिसर अधिक संपन्न आणि परिणूर्ण आहे. येथील प्राकृतिक भूरूपे, ऐतिहासिक व प्राचीन स्थापत्य, उंचावरून कोसळणारे पांढरेशुभ्र धबधबे, काजवा महोत्सव व नवरात्रीतील सोनकी महोत्सव यामुळे हा परिसर म्हणजे धरतीवरचा स्वर्ग भासतो. यामुळेच याला अहमदनगरचे काश्मीर म्हणूनही ओळखतात. 
महाकाल धबधबा : कोलटेंभे
भंडारदरा परिसर पहावयाचा असल्यास भंडारदरा धरणाच्या डावीकडील बाजूने प्रवास सुरू करावा. या प्रवासात पंधरा वीस मिनिटानंतर कोलटेंभे शिवारातील दोन धबधबे आपल्याला अचंबित करून टाकतात. उंच अर्धवर्तुळाकार कड्यावरून कोसळणारा अक्राळ-विक्राळ धबधबा आपले लक्ष वेधून घेतो. त्याच्या या अक्राळ-विक्राळ पणामुळे त्याला स्थानिक महाकाल धबधबा या नावाने ओळखतात. 
पुष्करणी : रतनवाडी 
धबधब्याच्या प्रवाहातील कोसळणारे पाणी एका मोठ्या कातळावर कोसळते त्यातून पाण्याचे उडणारे तुषार पर्यटकांना मंत्रमुग्ध करून टाकतात. याच पाण्यात उभे असलेले झाड कवी मनांना जागृत करते. याच धबधब्याच्या पश्चिम दिशेला पाण्याचा मोठा प्रवाह कातळ कड्यावरून धो-धो वाहताना दिसतो. हाच तो बाहुबली धबधबा. कातळ कड्यावर जणूकाही तो वार्‍याच्या वेगाने नृत्य करताना दिसतो. येथून पुढे थोड्याच अंतरावर असणारा न्हाणी धबधबा सर्वांचेच लक्ष वेधून घेतो. उंचावरुन कोसळणारा हा धबधबा तितकाच सुंदर व मनाला मोहित करणारा आहे. रस्त्याच्या कडेलाच असलेला व वन पर्यटन विभागाने सुविधा निर्माण केलेला हा धबधबा सहकुटुंब जवळ जाऊन बघणे सहज शक्य होते. हा धबधबा पाहत पंधरा वीस मिनिटाच्या अंतरावर असलेल्या गळ्यातील हारा प्रमाणे दिसणारा नेकलेस फॉल दुरूनच बघावा. येथून पुढे प्रवास करत असताना निसर्ग आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची रुपे दाखवतो. 
अमृतेश्वर मंदिर : रतनवाडी 
मात्र काही वेळाने हे निसर्ग सौंदर्य न्याहाळत आपण प्राचीन स्थापत्य शैलीचे झंझ राजाने बांधलेले अमृतेश्वराचे मंदिरा जवळ जाऊन पोहोचतो. अप्रतिम कोरीव काम असलेले हे मंदिर आपल्या प्राचीन स्थापत्याची ओळख करून देते. या मंदिरा शेजारी असलेली पुष्करणी तर अवर्णनीय आहे. याच मंदिराच्या पश्चिमेकडे दिसणारा उंच डोंगरी किल्ला म्हणजे रतनगड होय. रतनगडावरील नवरात्रीतील पर्यटन म्हणजे सुवर्णयोग होय. कारण यावेळी हा परिसर सोनकीच्या पिवळ्या फुलांची सोनेरी सादर पांघरल्या सारखा भासतो. 
सांदन दरी : साम्रद
रतनवाडी च्या पुढे आपल्याला आशियातील दुसऱ्या क्रमांकाची खोल सांदन दरी अचंबित करून टाकते. पावसाळ्यातील या दरीतून वाहणारे पाणी व दरीच्या दोन्ही कातळ कड्यांवरून कोसळणारे असंख्य धबधबे आपल्याला मंत्रमुग्ध करून टाकतात. सांदण दरी च्या पुढे साम्रद गावाच्या नंतर डावीकडील रस्त्याने पुढे गेल्यास आपल्याला अकोले तालुक्याच्या शेवटच्या टोकापर्यंत पोहोचता येते. येथून खाली चोंढा जलविद्युत प्रकल्प बघत माघारी फिरावे. आशिया खंडातील पहिला उदंचन प्रकल्प म्हणून हा प्रकल्प वैशिष्ट्यपूर्ण आहे. तसेच भंडारदारा जलाशयाला वर्तुळाकार प्रदक्षिणा घालण्यासाठी उत्तरेकडील बाजूने पुढे जावे. येथूनच डावीकडे दिसणारी अलंग-मदन-कुलंग ही बलाढ्य किल्लारांग आपल्या नजरेत येते. 
बाहुबली धबधबा : कोलटेंभे
येथून पुढे निघाल्यावर आदिवासी रत्न ठकाबाबा गांगड यांचे गाव लागते. पशुपक्ष्यांची भाषा बोलणारे व त्यांच्या भावना समजून घेणारे असे बहुआयामी व्यक्तिमत्त्व असलेले ठकाबाबा गांगड यांना राष्ट्रपतींनी सन्मानित करणे. हा या भागाचा एक मोठा बहुमान आहे. पुढे आपण पुन्हा भंडारदरा धरणाच्या भिंतीच्या दक्षिणेकडील बाजूला पोहोचतो. मात्र या अगोदर डावीकडे दिसणारी उंच डोंगररांग म्हणजे कळसुबाई शिखर होय. पावसाळ्या अगोदर येथील प्रकृतित चमचम चमकणारे असंख्य काजवे यामुळे येथे साजरा होणारा काजवा महोत्सव हा तर येथील पर्यटनाला हातभार लावणारा एक मोठा उत्सवच आहे.

या भागाला प्रकृतीने खूप दिले आहे. प्रकृती बरोबरच येथील प्राचीन स्थापत्य ही निर्माण झाले आहे. आदिवासींच्या पराक्रमाचा प्रथम साक्षीदार असलेले गड किल्ले येथे आजही त्याच दिमाखात उभे आहेत. येथील आदिवासी रत्नांनी दिल्लीला गवसणी घातली आहे. या भागातील आदिवासी निसर्गपूजक संस्कृती आजही निसर्गाला दैवत मानून निसर्ग जतनाचे कार्य अविरतपणे करत आहे. असा आहे वैभवसंपन्न भंडारदरा परिसर.

- अरविंद सगभोर   
    ८०५५३३३९३६
    ७२१८६६३३७७

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा