Breaking
कोल्हापूरला पुन्हा पुराचा धोका, एनडीआरएफ पथक दाखल


कोल्हापूर : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. मुसळधार पावसामुळे धरण, नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. पंचगंगा नदीच्या पातळीत वाढ होऊ लागली असून आज नदी धोक्याची पातळी ओलांडण्याची चिन्हे दिसत आहेत. पूर परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता लक्षात घेऊन एनडीआरएफची दोन पथके कोल्हापुरात येत आहेत. पुण्याहून ही पथके निघाली असून दुपारपर्यंत दाखल होणार आहेत.


कोल्हापूर जिल्ह्याला गेल्या दोन दिवसांपासून पावसाने झोडपून काढलं आहे. धुवाधार पावसामुळे जिल्ह्याचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. गगनबावडा, शाहूवाडी, राधानगरी, भुदरगड, आजरा या तालुक्यात संततधार सुरू आहे. राधानगरी, काळम्मावाडी, चांदोली या धरणातील पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. पंचगंगा नदीची पाणीपातळी आज सकाळी सात वाजता ३५ फूट होती. इशारा पातळी ३९ फूट आहे. पावसाचा जोर पाहता आज सायंकाळपर्यंत पंचगंगा नदी इशारा पातळी ओलांडण्याची शक्यता आहे.

दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक प्रमुख मार्ग पावसामुळे बंद झाले आहेत. कोकणाकडे जाणाऱ्या गगनबावडा येथील मार्ग बंद करण्यात आला आहे. तसेच रत्नागिरीकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. जिल्ह्यातील अनेक नद्यांचे पाणी पुलावर आल्याने स्थानिक पातळीवरची वाहतूक बंद करण्यात आली आहे.ती वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर अजूनही कायम असल्याने या पाणीपातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देत स्थलांतरित होण्याचे आदेश देण्यात आले आहे. तसेच कुंभी नदीचे पाणी मांडुकली या ठिकाणी आल्याने कोल्हापूर गगनबावडा रोड वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. त्याच बरोबर जिल्ह्यातील 39 बंधारे देखील आता पाण्याखाली गेले आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा