Breaking


"शिक्षणाची वारी, विद्यार्थ्यांच्या दारी" कुंडल-सांगली येथील अभिनव प्रयोगसांगली, दि. ८ : कोरोनामुळे शिक्षण व्यवस्था पूर्णपणे कोलमडून गेली आहे. ऑनलाइन शिक्षण काही प्रमाणात सुरू असले तरी विशेषत: ग्रामीण भागात निम्मी मुलेही मोबाईल रेंज अभावी आणि स्मार्ट फोनची अनुपलब्धतेमुळे आॅनलाईन शिक्षणाचा लाभ घेऊ शकत नाहीत. त्यातच बहुजन शिक्षणाची परंपरा नसल्यामुळे, अनेक घरात बरे झाले; आयतेच कामाला दोन हात मिळाले, अशी भावना आहे. त्यामुळे बहुजन वर्गातील मुलांच्या शिक्षणाला कोरोनाचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. 


या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातील कुंडल येथील क्रांतीअग्रणी जी. डी. बापू लाड प्रणित महात्मा गांधी एज्युकेशन संस्थेच्या शिक्षक वर्गाने अनोखा मार्ग अवलंबीला आहे. पर्वत महमदाकडे येत नसेल, तर महमद पर्वताकडे जाईल, अशा आशयाचे एक विधान आहे. त्याचे अनुकरण करीत शाळांतील शिक्षकांनी विद्यार्थी शाळेत येऊ शकत नसल्याने स्वतः वाड्या-वस्त्यांवर जाऊन विद्यार्थ्यांना शिकवायला सुरुवात केली आहे. कुंडलचा परिसर हा बराचसा ग्रामीण आहे. त्या भागात संस्थेतर्फे चार शाळा चालविल्या जातात. तेथे सुमारे २५०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र कोरोनाची लाटा आल्यापासून या मुलांचे शिक्षण विस्कळीत किंबहुना थांबल्या सारखे झाले आहे. मुख्यतः रेंजचा अभाव व स्मार्टफोन नसणे त्यामुळे सर्वच मुलांना ऑनलाईन शिक्षण घेणे शक्य होत नव्हते. परिणामी बरीच मुले शिक्षणापासून दूर राहू लागली होती. हे लक्षात आल्यामुळे यंदाच्या वर्षी सुरुवातीपासूनच शाळेच्या शिक्षकांनी स्वतः वाड्या-वस्त्यांवर जाऊन शिकवायला सुरुवात केली आहे. यात त्रास आणि अडचणी येत असल्या तरी मुलांना शिकवण्याची संधी मिळत असल्याने शिक्षक आनंदाने या प्रक्रियेत सहभागी होत असल्याचे, या उपक्रमाची माहिती देताना अॅड. प्रकाश लाड यांनी सांगितले. 

 

राज्याच्या अन्य ग्रामीण भागातील शिक्षकांनी याच पद्धतीने शिक्षणापासून दूर राहणाऱ्या विद्यार्थ्यांना जोडून घ्यावे, असे आवाहन पुणे पदवीधर मतदारसंघातून अलीकडेच निवडून आलेले आमदार आणि क्रांती अग्रणी सहकारी साखर कारखान्याचे संचालक अरुण लाड यांनी यांनी केले आहे. 


हा काळ अडचणीचा आहे, परंतु विद्यार्थी शिक्षणापासून तुटता कामा नये ! त्यासाठी कुंडल परिसरात हा प्रयोग सुरू करण्यात आला. शिक्षक वर्गही यासाठी सहकार्य करीत असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा